माझ्या बाळाचा श्रावण
कसा दुडूदुडू आला
येता येता ओला झाला
आणि नाचाया लागला
माझ्या बाळाचा श्रावण
आल्या आल्या बोलू लागे
म्हणे ये ना सोबतीला
नको राहू मागे मागे
माझ्या बाळाचा श्रावण
लडीवाळ होता होता
किती चुंबतो बाळाला
मिठी मारता मारता
माझ्या बाळाचा श्रावण
तालावर ताल धरी
कशी धमाल करीतो
जमवून पोरं पोरी
माझ्या बाळाचा श्रावण
भूक तहानं हरतो
प्रेम वाटे दारोदारी
सारे पोटाशी धरतो
--- डॉ. विजयकुमार कस्तुरे, ॲडव्होकेट, चिखली.....
दि. ३०-०६-२०२५,
स. १०-२२
________________________
Post a Comment