जळगाव (पू. खा.) :- नुकत्याच दि. २९-०६-२०२५ रोजी स्थानिक अभियंता भवनाच्या दैदिप्यमान सभागृहात, ज्येष्ठ कवयित्री गझलकार ज्योती वाघ बाविस्कर यांच्या ओसंडले शब्दकण या काव्य संग्रहाच्या डॉ. मिलिंद बागुल यांच्या अध्यक्षतेखाली व कवयित्री माया धुप्पड तथा गझलकार ज्ञानेश पाटील यांच्या शुभहस्ते संपन्न झालेल्या प्रकाशन सोहळ्यामधे प्रासंगिक निमंत्रित वक्ते या नात्याने,
भावनाशील, सडेतोड तर कधी बंडखोर, विद्रोही अशा विविध रूपाने आपल्या ओसंडल्या शब्दकणातून व्यक्त झालेल्या चिंतनशील कवयित्री ज्योती वाघ बाविसकरांच्या काव्याविष्काराचे सारांशिक विश्लेषण करताना
माझ्याच घराला मी
लावीन आग जेव्हा !
हिरोशिमा कधीही
तुमचे करीन तेव्हा !!
या स्वलिखित चारोळीचा उल्लेख करून सुप्रसिद्ध साहित्यिक कवी ॲड. डॉ. विजयकुमार कस्तुरे, चिखली यांनी,
अशा कडाडणाऱ्या स्वरूपात व्यक्त होणाऱ्या ज्योती वाघ बाविसकरांसारख्या साहित्यिकांचीच आज आत्यंतिक गरज असल्याचे सांगून, पाश्चात्य विद्वान जॉन ड्रेडन च्या - दि बॅलन्स्ड माईंड इज नेसेसरी टु बॅलन्स दि माईंड्स ऑफ अनबॅलन्स्ड पर्सन्स -
ची संतुलित वैचारिक भूमिका सुध्दा कवी साहित्यिकांनी ठेवणे किती आवश्यक आहे हे ही स्पष्ट केले. तसेच आजच्या दोलायमान तथा संक्रमणकालीन राजकीय भयावह स्थितीमधे समाजाला वाचविण्यासाठी साहित्यिकांनी जागृत राहण्याबाबत इतर साहित्यिक विद्वत्जनांनी आपल्या भाषणातून केलेल्या आवाहनाचा विशेष उल्लेख करून,
आये है तेरे दरपे
कुछ करके उठेंगे !
या तो वस्ल हो जायेगा
या फिर मरके उठेंगे !!
या सर्वविदीत उर्दू शायराच्या उग्र आत्मनिर्धारासह आपले लिखाण करावे असा
भावनिक आग्रह करीत,
यावे तसेच जावे
जीवन असे नसावे !
विश्वात या व्यथांच्या
मातीत नीर व्हावे !!
अशा समर्पित भावनेतून
कवितांच्या रूपाने अभिव्यक्त होणाऱ्या कवयित्री ज्योती ताईंना अशाच भावी वाटचालीसाठी शुभेच्छा देवून सर्व मान्यवरांनी समाजप्रबोधनाचा साहित्यिक वसा निरंतर पुढे चालविण्याचे नम्र आवाहन केले. अध्यक्ष मा. डॉ मिलिंद बागुल यांनी भारतीय सामाजिक वास्तवाला जगासमोर आणण्यामध्ये दलीत साहित्याचा, आंबेडकरी साहित्याचा व स्त्री साहित्याचा मोलाचा वाटा असल्याचे विषद केले. तर
एस्.डी. इव्हेंटचे दिनेश थोरात यांनी आपल्या प्रास्ताविकाने आणि वर्षा पगारे, प्रवीण लोहार, मंजुषा पाठक, शीतल पाटील, सुधीर महाजन, अशोक पारधे, आशा साळुंखे, चित्रा पगारे इ. नी काव्यवाचनातून वेगळीच रंगत आणली.
या समारंभाला प्रमुख अतिथी या नात्याने डॉ. जगदीश पाटील, प्रा. डॉ. जयेंद्र लेकुरवाळे, प्रा. डॉ . सत्यजित साळवे, उपशिक्षणाधिकारी प्रतिमा सानप, शिक्षण विस्तार अधिकारी विजया पवार इ. मान्यवरांनी आपले विचार मांडले. सुप्रसिद्ध कथाकार डॉ. बबनराव महामुने, छत्रपती संभाजीनगर, ज्येष्ठ कवी डॉ. डी. व्ही. खरात, चिखली, भावकवी अंकुश पडघान, युवराज माळी, गौतम बाविस्कर, अनिता परमार, संध्या महाजन इ. ची प्रमुख उपस्थिती होती. आभार सुधीर महाजन यांनी मानले तर सूत्रसंचालन ज्योती राणे यांनी केले.
________________________
Post a Comment