जिजाऊंच्या मातृतीर्थ जिल्ह्यात शेकडो प्रश्नांची जणू जत्राच भरलीय.
मा. जिल्हाधिकारी, मा. जिल्हा पोलिस अधीक्षक यांची उत्तरे देतील का?
मास्तरानं शेण खाल्लं.
बहुचर्चित बदलापूर नंतर मातृतीर्थ सिंदखेड राजा तालुक्यातील वर्डदी बु. येथे विद्यार्थिनींवर लैंगिक अत्याचार.
शिक्षकी पेशाला काळीमा..
याला शिक्षक म्हणावं तरी कसे,
सिंदखेड राजा (ज्ञानेश्वर बुधवत) :- मातृतीर्थ सिंदखेड राजा माता जिजाऊंची जन्म भूमी. १६ व्या शतकात अन्याय अत्याचार थांबवण्यासाठी छत्रपतींना घडवणाऱ्या माता जिजाऊंचे माहेर घर म्हणून महाराष्ट्रातंच नव्हे तर देशात एक वेगळी ओळख निर्माण करून असलेला जिल्ह्याचा एक भाग. परंतु दि. २३ रोजी समोर आलेल्या प्रकारामुळे तालुक्यालाच नव्हे तर जिल्ह्यालाच कलंक लागला आहे.
काहीच दिवसा अगोदर बदलापूर येथे घडलेल्या नृशंस प्रकरणामुळे सर्वांचे लक्ष तिकडे वेधले गेले असतांना त्या नंतर जवळ जवळ ९-१० अल्पवयीन मुलींवर लैंगिक अत्याचार झाल्याचं समोर आले आहे.
तालुक्यातील वर्दर्डी बू. येथील जिल्हा परिषदेच्या शाळेतील हा धक्कादायक प्रकार पुढे आला आहे. सदरील प्रकार असा की, जिल्हा परिषदेच्या शाळेतील वर्ग ४ चा शिक्षक खुशालराव उगले, वय ५६ वर्ष, याने वर्गातील मुलींवर लैंगिक अत्याचार केल्याची तक्रार किनगाव राजा पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली आहे . अप. क्र. 183/2024 कलम 64(2) (f) (1) (m),65(2), 76(1) (1)B.N. 5. सह कलम 4, 6,8,10,12 का.से.अ.प्र.अधि. 2012, सहजम 3(1) (w) (1) (1) (2) (v).3 (1) (R) (s) (w), अ.जा.अ.ज.अ. प्र.का. अन्वये आरोपीवर गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. व पुढील तपास उप विभागीय पोलिस अधीक्षक मनिषा कदम या करत आहेत.
जिजाऊंच्या जन्मभूमी मध्ये हे जे प्रकार घडत आहेत ते अतिशय लांच्छनास्पद आहेत. कायदा व सुव्यवस्थेवर प्रश्न चिन्ह उमटलेच आहे, परंतु शालेय विश्वात सुद्धा अविश्वासाचे वातावरण निर्माण होऊ लागले आहे. त्यामुळे पालकांच्या मनात भीती निर्माण झाली तर त्याचे परिणाम गंभीर होऊ शकतात. मुलांच्या, मुलींच्या शिक्षणाचे काय ? हा प्रश्न उपस्थित होऊ शकतो, त्यामुळे गृह खात्याने गंभीर पाऊलं उचलणं तर आवश्यक आहेच, पण शिक्षण खात्यान सुद्धा या बाबती शाळा-महाविद्यालयां मध्ये आश्र्वस्त वातावरण कसे निर्माण होईल या वर भर देणारी पावलं उचलावीत. गृह खात्यावर तर प्रश्न चिन्ह उमटलेच आहेत.
जिजाऊच्या जिल्हा हा मातृतीर्थ, म्हणजे महिलांचा सन्मान करणारे तीर्थ. अन् त्याच जिल्हामध्ये चिमुरड्यांवर अत्याचाराचे प्रकार वाढत असल्याचे अचानक स्पष्ट होऊ लागले तर या जिल्ह्यात काय घडतं आहे? गृहखाते काय करत आहे ? हा प्रश्न तर येतोच परंतु शैक्षणिक खातं सुद्धा झोपलेलं आहे का ? हाही प्रश्न येतोच. शैक्षणिक खात्यात असे प्रकार घडत असताना कोणालाच हे माहिती नाही असं कसं म्हणता येईल ? शिक्षक अस करतोय तर हेडमास्तरला का माहिती नाही ?
आमच्या माहिती प्रमाणे मा. जिल्हा पोलिस अधीक्षक सेवा निवृत्त होण्याचा शेवटचा आठवडा आहे. आणि त्यांच्या कार्यकाळाच्या या अंतिम टप्प्यात बुलढाणा जिल्ह्यातील गृहखात्यात येवढे मोठे प्रश्न चिन्ह उपस्थित होतात ही सुद्धा विचार करण्याची गोष्ट आहे. सेवा निवृत्त होत असताना किती प्रश्न उपस्थित करून जाणार ? त्यांच्या कार्यक्षमतेवर असे प्रश्नचिन्ह उपस्थित झालेलं आहे. जिल्ह्याचं संतुलन सांभाळण्यासाठी, कायदा व शांतता सुव्यवस्थित ठेवण्यासाठी त्यांची बुलढाणा जिल्ह्यात पोस्टिंग करण्यात आली असताना किती संतुलन झालं हे आजच्या या घटनांवरून स्पष्ट होत आहे.
तसेच मा. जिल्हाधिकारी साहेब, आपल्या या मातृतीर्थ जिल्हात काय चाललं आहे ? आपणास याच्या गांभीर्याची कल्पना आहे का ? आमचे गुरुवर्य असे म्हणतात की, संतुलित विचाराची व्यक्ती, असंतुलित लोकांना संतुलित करण्यासाठी आवश्यक असते ! त्यामुळे असंतुलित विचारांच्या लोकांना संतुलित करण्यासाठी, संतुलित विचारांचे जिल्हाधिकारी इथे आणलेत ! तसेच एक संतुलित विचारांचे जिल्हा पोलिस अधीक्षक सुध्दा इथे आणलेत. पण ते हे संतुलन कायम करू शकले का ? अन् ते जर हे कायम करू शकले अस म्हणायचं असेल तर मग ही परिस्थिती का निर्माण झाली ? तेही शालेय - शैक्षणिक सारख्या पवित्र खात्यामध्ये ? याचे उत्तर कोणी द्यावे ? पालकमंत्र्यांनी द्यावे ? पालकमंत्री देतील का ? याचे उत्तर कोणी द्यावे ? खासदार देतील का ? याचे उत्तर कोणी द्यावे ? आमदार देतील का ? मा. जिल्हाधिकारी, मा. जिल्हा पोलिस अधीक्षक या परिस्थिती पासून स्वतःला वेगळं करू शकतात का ? ते काहीच जबाबदार नाहीत असं म्हणू शकतात का ?
मग पालक वर्गानं आपल्या मुलाच्या सुरक्षेच्या बाबती मध्ये कुणाकडे पाहायचे ? असे जर घडत असेल तर महाराष्ट्रामध्ये राष्ट्रपती राजवट लागू करण्याची वेळ तर आलेली नाही ना ? असाही प्रश्न उपस्थित होतो. पालकांनी आपली मुले शाळेत पाठवायची की नाही याची उत्तरे मा. जिल्हाधिकारी, मा. जिल्हा पोलिस अधीक्षक देतील का? प्रत्येक रस्त्यावर वाहने अडवून त्यांच्या कडून वसुली करणारे पोलीस अधिकारी याची संख्या थोडी जास्त दिसते. मग बंदोबस्त, शांतता व सुव्यवस्था ठेवण्यासाठी आवश्यक असलेले कर्मचारी का दिसू नयेत ? जर सडकांवरील वसुली वरंच जास्त लक्ष केंद्रित असेल तर अस घडणार नाही तर काय घडेल ? हे आंधळ्या बहिऱ्यासही कळते. त्यामुळेच हे निष्काळजी व्यवस्थापन बदलण्याशिवाय पर्याय दिसत नाही. मोठे चाक फिरते तेव्हा छोटे चाक फिरते, हा विज्ञानाचा सर्वश्रुत नियम आहे !
त्यामुळेच थोड्या जास्त कर्तव्यतत्पर अधिकाऱ्यांची येथे गरज आहे, याकडे शासनाने तातडीने लक्ष देण्याची आवश्यकता आहे हे वेगळे सांगण्याची गरज नसावी.
नागरिक व पालक वर्गामधील भिती कमी करून सुरक्षित व आश्वासक वातावरण निर्माण होणे गरजेचे आहे. मात्र त्यासाठी अत्यंत सक्षम अधिकाऱ्यांची नियुक्ती बुलढाणा जिल्ह्यात त्वरित होणे आवश्यक आहे. अन्यथा शाळा ओस पडू लागल्यास नवल वाटू नये. सूज्ञास सांगणे नलगे.
__________________________________
Post a Comment