अहिल्यानगरात उद्या साहित्यिकांची मांदियाळी
साहित्य म्हणजे वाङ्मय समाजाचा आरसा असते! आत्तापर्यंत जगात अनेक क्रांती घडून आल्या आहेत, त्या केवळ शस्त्रांनीच नाही तर शास्त्रांनी म्हणजेच लेखनींनी सुद्धा घडून आल्या आहेत. जगाचा इतिहास मोठा प्रवाही आणि प्रभावी आहे. त्यात लेखणीचे, ज्ञानाचे काम महत्वपूर्ण आहे. इसविसनपूर्व काळातील पुरुषोत्तम तत्वज्ञ श्री कृष्ण-तथागत गौतम बुद्ध-सॉक्रेटिस-विविध कोरीव लेणीपासून ते आजतागायत हे सर्व अजरामर आहे ते केवळ आणि केवळ अक्षरांच्या माध्यमातून! विश्वात केवळ अक्षरेच जिवंत आहेत आणि त्या आधारे अनंत माणसांचा सर्वार्थाने उद्धार झाला आहे. श्रीमंत, शक्तिशाली, समृद्ध, महाल, किल्ले, लेणी, नाणी इत्यादी उभी करणारी माणसे आणि वास्तू कालौघात नामशेष झाल्या आहेत, मात्र त्या त्या कालखंडातील अक्षर-लेखन मात्र अजूनही जगाला पथदर्शी होत आहे. आजच्या घडामोडी उद्याचा इतिहास असतो, परंतु वाङ्मयाचे तसे मुळीच नसते. ते रोजच नित्य नूतन आणि नवनवोन्मेष शालिनी प्रभा, सूर्यासारखे देदीप्यमान असते. वाङ्मय कधीच शिळे अथवा जुने होत नाही; उलट त्यामुळेच आपल्या जीवनाला नवता प्राप्त होते. आद्यकवी रामायणरचिता वाल्या कोळी असो की डॉ.ए.पी.जे. अब्दूल कलाम, आजही ते तेवढ्याच ताकदीने आपल्यासोबत आहेत. माणसांकडे सर्व सुविधा असतांना त्याला सुमधुर संगीताचे दोन बोल किंवा आईचे प्रमाचे दोन शब्द कानावर पडताच सर्वांग तृप्त होते आणि क्षणार्धात निद्रेला स्वाधीन होतो. शब्दांची शक्ती गहन आणि महान आहे. त्यांना देश, प्रदेश, जात, धर्म, पंथ, लिंग, गरीब, श्रीमंत इत्यादी भौतिक बाबींचे बंधन नसते. सूर्यप्रकाश, वारा, सुगंधासारखे शब्द संपूर्ण विश्वात मुक्त विहार करत असतात. याच न्यायाने माणसाने हे अनमोल शब्दरत्ने हृदयात जपण्याचे महत्कार्य केले आहे. प्रतिभा कुणालाही लाभत नसते. चक्रधर, महदंबा, जनाई, नामदेव, ज्ञानदेव, मुक्ताई, सावतोबा, चोखोबा, एकोबा, तुकोबा सारखी शब्दरत्ने कधीतरी प्रकट होत असतात. हा अनमोल ठेवा जपणे आणि त्यांचा सतत गौरव होणे हे क्रमप्राप्त असते, याच न्यायाने माणसाने शब्द आणि शब्द निर्मात्यांचे सोहळे, उत्सव करायचे ठरवले आणि त्यातूनच साहित्य संमेलन संकल्पना उदयास आली.
आज जगभर साहित्यिकांचे सोहळे संपन्न होत आहेत. महाराष्ट्रात साहित्य संमेलनाची परंपरा फार जुनी आहे. अलीकडच्या काळात विविध क्षेत्रातील साहित्यिक मंडळींची साहित्य संमेलने होत आहेत. दरवर्षी हजारो ग्रंथ प्रकाशित होत असून लाखो ग्रंथांची विक्री होत आहे. याच अनुषंगाने मागील तीन वर्षांपासून वंजारी महासंघ, महाराष्ट्र साहित्य आघाडी वंजारी समाजाचे दुसरे एकदिवशीय राज्यस्तरीय मराठी साहित्य संमेलन घेत आहे. यावर्षीचे दुसरे मराठी साहित्य संमेलन अहिल्यानगर(अहमदनगर) येथे दिनांक २५ ऑगस्ट रविवार रोजी संपन्न होत आहेत. अहिल्यानगरचे आमदार मा.श्री संग्रामभैय्या जगताप यांच्या शुभहस्ते आणि मा.ना.राधाकृष्ण विखे पाटील, मा.आ.किशोर दराडे, मा.शिवाजीराव गर्जे, मा.शिवाजीराव कर्डिले, उद्योजक मा.श्री बुधाजीराव पानसरे, वंजारी महासंघ, संस्थापक अध्यक्ष श्री गणेश खाडे, श्री प्रतापकाका ढाकणे, श्री रामदास आंधळे, प्राचार्य डॉ.नवनाथ आघाव, आनंद लहामगे, सुधीर पोटे, युवराज ढाकणे, निमंत्रक मा.श्री मल्हारी खेडकर आदि मान्यवरांच्या उपस्थितीत या संमेलनाचे उदघाटन संपन्न होणार आहे. या संमेलनाचे स्वागताध्यक्ष जागतिक कुस्ती विजेता श्री राजकुमार आघाव, श्री घनश्याम बोडखे, सौ.रेणुकाताई वराडे-सानप, श्री अर्जुन वायभासे इत्यादी मंडळी मागील दोन महिन्यांपासून तयारी करत आहेत. दुसऱ्या वंजारी समाजाच्या राज्यस्तरीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध कवयित्री तथा समीक्षक सौ.संगीता घुगे असून या प्रसंगी डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, संभाजी नगरचे राज्यपाल नियुक्त व्यवस्थापन परिषद सदस्य, प्रा.डॉ.गजानन सानप यांची विशेष उपस्थिती लाभणार आहे.
एकूण पाच सत्रात संपन्न होणाऱ्या साहित्य संमेलनात दुपारी १ ते २.३० वेळात परिसंवादाचे आयोजन केले असून त्यामध्ये सुसंकृत समाज, वंजारी समाजाचे राष्ट्र निर्माणातील योगदान आणि सामाजिक समता काळाची गरज या महत्वपूर्ण विषयावर महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध लेखक, कवी, व्याख्याते सर्वश्री प्रा.डॉ.शिवाजी हुसे, प्रा.डॉ.रामकिसन दहिफळे (छ.संभाजी नगर), श्रीमती रेखा शेळके-संख्ये(मुंबई), श्रीमती प्रीती बेटकर(पुणे) आणि ह.भ.प.प्रा.डॉ.विठ्ठल जायभाये(परभणी) आदि मान्यवर आपले विचार व्यक्त करणार असून प्रा.डॉ.शिवाजी नागरे अध्यक्षस्थान भूषवतील. भोजनावकाशानंतर दुपारी ३.३० ते ५.३० दरम्यान कथाकथन सत्र श्री तुळसीराम बोबडे(अकोला) यांच्या अध्यक्षतेखाली होत असून सौ.अलकनंदा आंधळे-घुगे, प्रा.सुवर्णा कराड, सौ.रंजना सानप, नीता सानप-घुले आदि कथाकार आपल्या कथा सादर करतील. त्यानंतर ५.३० ते ७.०० काळात मा.प्रा.मनोहर आंधळे यांच्या अध्यक्षतेखाली कविसंमेलन होत असून यात श्री चंद्रकांत धस, श्री रमेश आव्हाड, सौ.विद्या लटपटे, सौ.छाया जायभाये-वाघ, सौ.सविता ढाकणे, सौ.जयश्री वाघ, सौ.द्वारका मुंडे-गित्ते, सौ.अलका सानप, श्री जयदीप विघ्ने आदि मान्यवर कवी-कवयित्री आपल्या कविता सादर करतील. संमेलनाच्या पाचव्या समारोपीय सत्रात रात्री ७ ते ८.०० वेळात वंजारी समाजातील मान्यवर लेखक, कवी, संपादक, पत्रकार आदि मान्यवर मंडळींचे संत भगवानबाबा साहित्यरत्न, संत भगवानबाबा समाज प्रबोधन, महाराष्ट्रभूषण आदि पुरस्कार देऊन मान्यवरांच्या हस्ते गौरव करण्यात येणार आहे. दिवसभर चालणाऱ्या विचार मंथन-चिंतन सोहळ्यास महाराष्ट्रातील तमाम साहित्य रसिकांनी उपस्थित राहण्याचे कळकळीचे आवाहन वंजारी महासंघ, महाराष्ट्र संस्थापक अध्यक्ष, लेखक, विचारवंत, साहित्यिक तथा अध्यात्मिक मार्गदर्शक श्री गणेश खाडे तथा वंजारी महासंघ संपूर्ण साहित्यिक आघाडीच्या वतीने करण्यात आले आहे.
प्रा.डॉ.विठ्ठल खंडुजी जायभाये
कै.रमेश वरपुडकर महाविद्यालय, सोनपेठ
जि. परभणी (महाराष्ट्र)
मो. 9158064068
(टीप: लेखक हे व्याख्याता, कवी, किर्तनकार, समीक्षक, योग-प्राणायाम प्रशिक्षक आहेत.)
__________________________________
Post a Comment