ओल्या दुष्काळाला कोरडाच आधार ; आर्थिक मदत जाहीर होऊनही शेतकऱ्यांत नाराजीचा सूर

लोकनेता न्युज नेटवर्क

शिराढोण (दौलत पांडागळे) :- शिराढोण परिसरातील हजारो हेक्टरवरील शेतकऱ्यांच्या जगण्याचा आधार ठरणारी खरिपातील नगदी पिके ओल्या दुष्काळामुळे मोठ्या प्रमाणात नासाडी होऊन हातची गेल्यामुळे आर्थिक कचाट्यात अडकलेल्या बळीराजास बाहेर पडण्यासाठी भरीव आर्थिक मदतीची अपेक्षा होती परंतु नुकतीच जाहीर झालेली आर्थिक आकडेवारी पुरेशी नसून दुष्काळी अपेक्षावर मदतीचे पांघरून घालण्याचा प्रयत्न केला असला तरी मदत जाहीर होऊनही शेतकऱ्यांतून नाराजीचा सूर ऐकावयास मिळत आहे.

    उस्माननगर महसूल मंडळात 100002 हेक्टर लागवडीलायक भुक्षेत्र असून मुख्यतः खरिपाच्या उत्पन्नावरच कौटुंबिक प्रपंचाची भिस्त असल्याने नगदी पिके म्हणून जादा प्रमाणात सोयाबीन ,कापूस आणि ज्वारीची लागवड केली जाते.यंदाच्या हंगामातही कापूस आणि सोयाबीन पिकाच्या लागवडीचे क्षेत्र जास्त होते.पेरणीनंतर पावसाने ओढ दिल्याने उत्पनात घट होणार आणि निम्मा का होईना धान्याचा पसा घरी येणार अशी शेतकऱ्यांची धारणा होती परंतु पिके काढणीस आल्यानंतर परतीच्या अवकाळी अनपेक्षित पावसाने नवा उच्चांक गाठत पिकांचे व धान्याचे अतोनात नुकसान केले.काही ठिकाणी गंजीच्या स्वरूपात साठवलेले सोयाबीन बुरशी वाढून सडले तर काही उभ्याच अवस्थेत मातीमोल झाले.दरम्यानच्या काळात महसूल मंडळाकडून थेट बांधावर जाऊन पंचनामे करण्यात आले.शेतकऱ्यांच्या आशा पल्लवित झाल्या किमान एकरी झालेला खर्च तरी निघेल या आशेपोटी शेतकऱ्यांनी पंचनाम्यासाठी आवश्यक बाबीची पूर्तता करत धावपळ केली परंतु जाहीर केलेली नुकसानभरपाई म्हणून तुटपुंजी रक्कम जाहीर केली असली तरी शेतकऱ्यातुन याविषयी तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. पेरणीसाठी नातेवाईकांकडून घेतलेली उसनवारी रक्कम कशी परत करावी वर्षभराचा प्रपंच कसा चालवावा असा यक्षप्रश्न सद्यस्थितीत शेतकऱ्यांसमोर उभा आहे.

_________________________

पीकविम्यासाठी प्रशासनाला साकडे

    गत हंगामात विमा मिळाला नाही. गत हंगामातील झीज भरून निघणार अशी अपेक्षा शेतकऱ्यांना होती परंतु अतिवृष्टीने अतोनात नुकसान होऊन शेतकऱ्यांचा भ्रमनिरास झाला अशा परिस्थितीत किमान यंदाचा तरी पीकविमा मिळून जगण्यासाठी आर्थिक आधार व्हावा अशी शिराढोण परिसरातील शेतकऱ्यांची अपेक्षा आहे.

_________________________

0/Post a Comment/Comments