महाराष्ट्रात सर्वार्थाने विचारांनी मोठी क्रांती घडवून आणली आहे. चक्रधर स्वामी पासून ते आजतागायत अनेक धुरिणांनी आपल्या क्रांतिकारी विचारांना कृतीची जोड देऊन विश्वविचार जागृत ठेऊन प्रबोधन केले. विविध सुधारणावादी चळवळीद्वारा महाराष्ट्रात मूलगामी प्रबोधन करण्याचे कार्य अनेकांनी केले. त्यात धर्म अनुषंगाने जागृती करतांना सामान्य लोकांना धर्म म्हणजे काय हे समजावून सांगण्याचा प्रयत्न झाला. धर्म म्हणजे गुणधर्म. धर्म म्हणजे माणसाने माणसासोबत माणसासारखे वागणे. हिंदू, मुस्लीम, बौद्ध, सिख, इसाई, ख्रिश्चन मर्यादित राहणे म्हणजे धर्म नव्हे. धर्म ही आकाशासारखी विशाल संकल्पना आहे. सिंधू संस्कृतीपासून सूर्य, वृक्ष, बैल, डोंगर, नदी पूजनाचे दाखले असतांना जाणीवपूर्वक सामान्य माणूस निसर्ग पूजेकडून मुर्तीपुजेकडे आणला गेला. धर्मात कर्मकांड, देवभोळेपणा आणून धर्माचा गाभा बदलण्याचे दुष्कृत्य केले गेले. देवाची निर्मिती करून धर्माने माणसाला भावनिक, भित्रा बनवले. माणूस धर्माशिवाय जगू शकत नाही, आणि शेवटी "अफूच्या गोळी" सारखा धर्म खोलवर रुजवला गेला. धर्मातील दर्शन कमी आणि प्रदर्शन वाढले. कर्म कमी आणि कांड वाढत गेले. भक्ती कमी आणि शक्ती वाढली. शांती संपून अवडंबर वाढले. आनंद संपून भीती वाढली. स्वतः शोध सोडून प्रार्थना स्थळाकडे माणूस पिटाळला गेला. धर्म मार्तंडांनी मुळ धर्म विचार पूर्णतः बदलून टाकला.
कमी अधिक फरकाने धर्माची ही परिस्थिती बाराव्या शतकापर्यंत चालूच होती. त्यानंतर महात्मा बसवेश्वरांनी लिंगायत धर्माच्या अनुभव मंटपमातून समतेचा संदेश रुजवतांना आंतरजातीय आणि आंतरधर्मीय विवाह घडवून आणतांना समतेचा कृतीशील संदेश दिला. तेराव्या शतकात नामदेव-जनाबाई-ज्ञानदेव-चोखोबा-सावतोबा आदि विभिन्न जात-वर्गातील वारकरी संतानी सामान्य लोकांच्या सहाय्याने प्रस्थापित वर्णव्यवस्था झुगारून देत नव्याने समता-ममतेचा वारकरी संप्रदाय सक्षम केला. धर्माचे नव्याने परिशीलन झाले आणि सामान्य लोकांच्या मनातील थोतांड, कर्मकांडयुक्त धर्माची भीती कमी करण्याचे काम या धुरिणांनी केले. यासाठी या क्रांतिकारी संतांना फार मोठी किंमत मोजावी लागली. त्यानंतर संत एकनाथांनी गोदावरीच्या पात्रात देवपूजेला जातांना पूजेचे पाणी तहानेने व्याकूळ गाढवाला पाजले; वाळवंटातील रडणारे अस्पृश्य मुल कडेवर घेऊन आपल्या कृतीतून ईश्वराचे अस्तित्व प्रत्येक जीवात आहे हे दाखवून दिले. वर्ण-धर्म भीतीची चाकोरी मोडली. हेच काम सतराव्या शतकात संत तुकारामांनी करतांना सामान्य लोकांना "तीर्थी धोंडा पाणी। देव रोकडा सज्जनी॥" लिहून देव कुठे आहे(?) हे सांगितले.
आज तुकाराम बीज! तुकारामांना आपल्यातून जाऊन आज तब्बल ३७५ वर्षे होत आहेत. जसा काळ जात आहे तसे समाजमनावरील तुकोबांचे गारुड वाढतेच आहे. तुकोबांच्या निर्वाणाविषयी संशोधक-अभ्यासक आणि वारकरी सांप्रदायिक मंडळी यांच्यात अनेक मतमतांतरे आहेत. श्री तुकारामांचे पुत्र नारायण बुवा यांनी इसवी सन १६८० साली ताराबाई पुत्र शिवाजी दुसरे यांना लिहिलेल्या पत्रात “तुकोबा गोसावी देहू येथे भागवत कथा (कीर्तन) करताना अदृश्य झाले ही गोष्ट विख्यात आहे”, असे लिहून कळविले. तुकाराम महाराजांचे पणतू गोपाळबुवा देहूकर यांनी आपल्या तुकाराम चरित्रात "श्री तुकारामांचे वैकुंठगमन देहासहित गुप्त होणे हा योगशास्त्राचा पुढचा टप्पा आहे" असे लिहिले आहे. तुकारामांचे वंशज श्रीधर महाराज देहूकर तुकाराम महाराज चरित्रात लिहितात “इंद्रायणी काठी तुकोबांचे कीर्तन सुरू होतं. त्यांनी सर्वांना आम्ही वैकुंठाला जात आहोत तुम्ही माझ्यासोबत चला असे सांगितलं. १४ टाळकरी यांनी क्षेमालिंगन दिले. सकळही माझी बोळवण करा। परतुनी घरा जावे तुम्ही॥” अशी सूचनाही केली आणि भागवत कथा करीत असता तुकोबा अदृश्य झाले.” वारकरी फडकरी दिंडी समाज संघटना अध्यक्ष ज्ञानेश्वर महाराज जळगावकर म्हणतात, “प्रयाणकाळी देवे | विमान पाठविले | कलीच्या काळामधी | अद्भुत वर्तविले || मानव देह घेऊन | निजगामा गेले। निळा म्हणे सकल संता तोषविले || वचन वारकऱ्यांमध्ये प्रचलित आहे. तुकाराम महाराज सदेह वैकुंठास गेले यावर वारकऱ्यांची नितांत श्रद्धा आहे.” डॉ.शं.दा.पेंडसे यांनी ‘साक्षात्कारी संत तुकाराम’ ग्रंथात अभंगाधारे तुकाराम तीर्थयात्रेस गेले असता त्यांनी त्रिवेणी संगमी देह विसर्जन केले असावे असा तर्क केला. विचारवंत डॉ. रावसाहेब कसबे यांनी जगभरातल्या अनेक संतांमध्ये तुकाराम हे सर्वश्रेष्ठ संत असल्याचं मान्य करतांना कसबे बीबीसीशी बोलताना म्हणतात, "तुकारामांचा मृत्यू नेमका कसा झाला हे कोणालाच सांगता आलेलं नाही. उपलब्ध साधनसामुग्रीवरून मंबाजी गोसावी त्यांना छळत होता, हे उघड आहे. तसंच तुकारामांचं लेखन संपवण्याचं काम काही शक्ती काम करत होत्या. जोपर्यंत त्यांच्या मृत्यूचं गूढ उलगडत नाही तोपर्यंत तुकारामांची हत्याच झाली असं माझं मत आहे." अशी भिन्न मतमतांतरे असतांना एका विशिष्ट निष्कर्षाप्रत येणे कठीण वाटते. याचे उत्तर साहीर लुधीयान्वी यांच्या ओळीत "वो अफ़्साना जिसे अंजाम तक लाना न हो मुमकिन, उसे इक ख़ूबसूरत मोड़ दे कर छोड़ना अच्छा" लिहून तुकोबांच्या अभंगांचे तत्व आपल्या जीवनात उतरवण्याचे कार्य आपण करत राहूया.
माय-बाप वाचकहो, आज वाचन-लेखन संस्कृती मृतप्राय होत असतांना जगद्गुरू संत तुकाराम महाराजांचा अभंग गाथा खऱ्या अर्थाने अनेक मानसिक, कौटुंबिक चिंता रोगांवर रामबाण औषध आहे. आज आपल्या दैनंदिन धावपळीत तुकाराम गाथाच आपला खरा पथदर्शी होईल यात तिळमात्र शंका नाही. तेंव्हा आज बिजेच्या मुहूर्तावर गाथा वाचन आणि त्यावर चिंतन करण्याचा संकल्प करूया आणि तुकोबांना निरंतर स्मरुया! जय तुकोबाराय!
•प्रा.डॉ.विठ्ठल खंडुजी जायभाये
कै.रमेश वरपुडकर महाविद्यालय, सोनपेठ
जि. परभणी (महाराष्ट्र)
मो. 9158064068
(टीप: लेखक हे व्याख्याता, कवी, किर्तनकार, समीक्षक, योग-प्राणायाम प्रशिक्षक आहेत.)
________________________
Post a Comment