तालुक्यातील पेट्रोल पंपांची तहसीलदार अजित दिवटे यांच्या कडून पाहणी; शेतकऱ्यांना प्राधान्याने इंधन देण्याचे निर्देश
लोकनेता न्युज नेटवर्क
सिंदखेड राजा | सुरेश हुसे :- तालुक्यात पेट्रोल-डिझेल टंचाईबाबत सोशल मीडियावर पसरत असलेल्या अफवांच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने सक्रिय भूमिका घेत सिंदखेडराजा परिसरातील पेट्रोल पंपांची पाहणी केली. जिल्हाधिकारी डॉ. प्रवीणकुमार देवरे यांच्या आदेशानुसार आणि उपविभागीय अधिकारी प्रा. संजय खडसे यांच्या मार्गदर्शनाखाली तहसीलदार अजित दिवटे व नायब तहसीलदार डॉ. प्रवीणकुमार वराडे यांनी विविध पेट्रोल पंपांना भेट देत इंधन साठा आणि पुरवठा व्यवस्थेचा आढावा घेतला.
पेट्रोल पंपांवर वाढती गर्दी, संभाव्य वाहतूक कोंडी आणि कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न लक्षात घेऊन प्रशासनाने प्रतिबंधात्मक उपाययोजना राबविण्यास सुरुवात केली आहे. तालुक्यातील प्रत्येक पेट्रोल पंपावर महसूल विभाग आणि पोलीस प्रशासनाची संयुक्त पथके तैनात करण्याचे निर्देश देण्यात आले असून, इंधन वितरण प्रक्रियेवर थेट नियंत्रण ठेवले जाणार आहे.
सोशल मीडियावर दिशाभूल करणाऱ्या अफवा पसरविणाऱ्यांवर माहिती तंत्रज्ञान कायदा तसेच भारतीय न्याय संहितेनुसार कठोर कारवाई करण्यात येणार असल्याचा इशारा प्रशासनाने दिला आहे. नागरिकांनी अफवांवर विश्वास न ठेवता अधिकृत माहितीवर भरोसा ठेवावा, असे आवाहनही करण्यात आले आहे.
तहसीलदार अजित दिवटे यांनी दिवसभर सिंदखेडराजा व परीसरातील विविध पेट्रोल पंपांना भेटी देऊन पेट्रोल व डिझेल साठ्याची माहिती घेतली. यावेळी नायब तहसीलदार डॉ. प्रवीणकुमार वराडे, मंडळ अधिकारी, तलाठी तसेच पोलीस कर्मचारी उपस्थित होते.
“प्रशासनाला सहकार्य करणे आवश्यक” — प्रा खडसे
उपविभागीय अधिकारी प्रा. संजय खडसे यांनी सांगितले की, पेट्रोल पंपांवर महसूल व पोलीस विभागाची संयुक्त यंत्रणा सतर्क असून परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवले जात आहे. सोशल मीडियावर अफवा पसरविणाऱ्यांवर तातडीने गुन्हे दाखल करण्यात येतील. नागरिकांनी वस्तुस्थिती समजून प्रशासनाला सहकार्य करावे, असे त्यांनी आवाहन केले.
“शेतकऱ्यांना इंधनासाठी प्राधान्य” — तहसीलदार दिवटे
पावसाळ्यापूर्वी शेतीच्या कामांना वेग आला असल्याने शेतकऱ्यांना इंधनाचा तुटवडा भासू दिला जाणार नाही, अशी ग्वाही तहसीलदार अजित दिवटे यांनी दिली. इंधनाचा साठा उपलब्ध होताच शेतकऱ्यांना प्राधान्याने डिझेल व पेट्रोल देण्याचे निर्देश संबंधित पेट्रोल पंप चालकांना देण्यात आल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
________________________

Post a Comment