घाटाचा उतार ठरला जीवघेणा! ट्रॅक्टरखाली दबून दोन तरुणांचा मृत्यू
सिंदखेडराजा / प्रतिनिधी :- सोयाबीनचा भुसा आणण्यासाठी आलेल्या दोन तरुणांवर काळाने झडप घातली. सेलू-भोसा मार्गावरील सेलू गावाजवळील घाटाच्या उतारावर भुसाची वाहतूक करणारा ट्रॅक्टर अचानक उलटल्याने ट्रॅक्टरखाली दबून दोघांचा जागीच दुर्दैवी मृत्यू झाला. मंगळवारी (दि. १० नोव्हेंबर) सकाळी घडलेल्या या भीषण दुर्घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली असून सिंदखेडराजा तालुक्यात हळहळ व्यक्त होत आहे.
या अपघातात माऊली अनंत दवणे (वय २७) आणि महेश प्रकाश रणवीर (वय १५, दोघेही रा. केहाळ वडगाव, ता. मंठा, जि. जालना) यांचा मृत्यू झाला आहे. तरुण वयातील दोघांचा अशा प्रकारे दुर्दैवी अंत झाल्याने त्यांच्या कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, माऊली दवणे हे स्वतःचा ट्रॅक्टर (क्रमांक एमएच-२१-सीए-४४१८) घेऊन सोयाबीनचा भुसा आणण्यासाठी सेलू-भोसा परिसरात आले होते. त्यांच्यासोबत महेश रणवीर हा अल्पवयीन मुलगाही होता. सोयाबीनचा भुसा घेऊन सेलू गावाजवळील घाटाचा उतार उतरून जात असताना अचानक ट्रॅक्टरचा तोल गेला आणि ट्रॅक्टर उलटला. या भीषण दुर्घटनेत ट्रॅक्टरखाली दबून माऊली दवणे आणि महेश रणवीर या दोघांचाही जागीच मृत्यू झाला.
प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार, घाटाचा उतार उतरत असताना ट्रॅक्टरचा गिअर न्यूट्रल करण्यात आला होता. त्यामुळे ट्रॅक्टरवरील चालकाचे नियंत्रण सुटले आणि काही क्षणांतच ट्रॅक्टर उलटल्याचे सांगण्यात येत आहे. मात्र, अपघाताचे नेमके कारण अधिकृत तपासानंतरच स्पष्ट होणार आहे.
मराठवाड्यात दुष्काळाची तीव्रता सातत्याने वाढत असल्याने शेतकरी आणि पशुपालकांसमोर जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. जनावरांसाठी वैरण उपलब्ध व्हावी, या उद्देशाने मराठवाड्यातील शेतकरी विदर्भातील लगतच्या तालुक्यांमध्ये सोयाबीनचा भुसा व अन्य चारा घेण्यासाठी येत आहेत. याच पार्श्वभूमीवर माऊली दवणे आणि महेश रणवीर हे सेलू-भोसा परिसरात भुसा आणण्यासाठी आले होते. मात्र, चाऱ्याच्या शोधात आलेल्या या दोघांवर काळाने घाला घातल्याने या घटनेने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.
अपघाताची माहिती मिळताच सिंदखेडराजा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. ट्रॅक्टरखाली दबलेल्या दोघांना बाहेर काढल्यानंतर त्यांचे मृतदेह स्थानिक ग्रामीण रुग्णालयात हलविण्यात आले. तेथे पुढील वैद्यकीय प्रक्रिया सुरू होती. वृत्त लिहिपर्यंत या प्रकरणी गुन्हा दाखल झाल्याची माहिती उपलब्ध नव्हती.
घाटाच्या उतारावर घडलेल्या या भीषण अपघाताने दोन कुटुंबांचा आधार हिरावला आहे. विशेषतः अवघ्या १५ वर्षांच्या महेशचा मृत्यू मन हेलावून टाकणारा आहे. एका बाजूला जनावरांच्या चाऱ्यासाठीची धडपड आणि दुसऱ्या बाजूला रस्त्यावरील निष्काळजीपणातून घडणाऱ्या संभाव्य दुर्घटना, या घटनेने सुरक्षित वाहतुकीचे महत्त्व पुन्हा अधोरेखित केले आहे.
________________________

Post a Comment