मराठवाड्याच्या नशिबी पुन्हा भकास अवकळा!
केवळ घोषणांचा पाऊस, प्रत्यक्षात निधीचा दुष्काळ; प्रकल्प पूर्ण होईपर्यंत परभणीसह विभागाचा घसा कोरडाच राहण्याची भीती
परभणी / दत्तात्रय कराळे :- मराठवाड्याच्या कायमस्वरूपी दुष्काळमुक्तीसाठी ज्या नदीजोड प्रकल्पाचे (वैनगंगा-नळगंगा आणि पश्चिमेकडील नद्यांचे पाणी गोदावरी खोऱ्यात वळवणे) स्वप्न दाखवले गेले, त्याच प्रकल्पाला आता बोलघेवड्या शासनाने ठेंगा दाखवला आहे. निवडणुका जवळ आल्या की मोठ्या प्रकल्पांच्या घोषणा करायच्या, मात्र सत्ता मिळताच त्या फायली लाल फितीत बंद करायच्या, या सरकारी धोरणामुळे संपूर्ण विभागाची अवस्था अधिकच दयनीय होत चालली आहे.
कागदावरच राहिलेले कोट्यवधींचे प्रकल्प :
पश्चिम महाराष्ट्रातून वाहून समुद्राला मिळणारे अतिरिक्त पाणी मराठवाड्याच्या हक्काच्या गोदावरी खोऱ्यात आणण्यासाठी नदीजोड प्रकल्प हा एकमेव रामबाण उपाय आहे. मात्र, शासनाच्या उदासीन धोरणामुळे हा प्रकल्प केवळ बैठका आणि आश्वासनांपुरताच मर्यादित राहिला आहे. तांत्रिक मान्यता, निधीची तरतूद आणि प्रत्यक्ष कामाची गती शून्य असल्यामुळे हा प्रकल्प नेमका कधी पूर्ण होणार, हा प्रश्न सर्वसामान्यांना सतावत आहे.
प्रकल्प रखडल्याचे गंभीर परिणाम :
शेतीचे वाळवंट होण्याची भीती :
जोपर्यंत नदीजोड प्रकल्प पूर्णत्वास जाऊन हक्काचे पाणी धरणांमध्ये येत नाही, तोपर्यंत परभणीसह मराठवाड्यातील शेती पूर्णपणे निसर्गाच्या लहरीपणावर अवलंबून राहील. दरवर्षी पडणाऱ्या दुष्काळामुळे सुपीक जमिनी ओसाड पडू लागल्या आहेत.
स्थलांतराचा वाढता वेग :
शेतीला पाणी नसल्यामुळे रोजगार बुडला जात असून, ग्रामीण भागातील तरुण आणि कष्टकरी वर्गाला पोटाची खळगी भरण्यासाठी मोठ्या शहरांकडे स्थलांतर करावे लागत आहे. गावेच्या गावे ओस पडण्याची अवकळा विभागावर ओढवली आहे.
आर्थिक कणा मोडला :
पाण्याअभावी कृषी आधारित उद्योगधंदे ठप्प झाले असून, शेतकरी कर्जाच्या विळख्यात अडकला आहे. ज्यामुळे संकटग्रस्त शेतकऱ्यांचा आर्थिक कणाच मोडला आहे.
जनतेचा तीव्र इशारा :
"आम्हाला केवळ भाषणे आणि आश्वासने नकोत, तर शेतीसाठी आणि पिण्यासाठी शाश्वत पाणी हवे आहे," अशी संतप्त भावना शेतकऱ्यांमधून व्यक्त होत आहे. बोलघेवड्या शासनाने आता तरी जागे होऊन नदीजोड प्रकल्प युद्धपातळीवर पूर्ण करावा, अन्यथा येणाऱ्या काळात मराठवाड्याला अधिक भयावह अवकळा लागली जाऊन प्रसंगी त्याचा सामना करावा लागेल, असा इशारा मराठवाडा विधायक विकास परिषदेने दिला असून जनतेतून पूरती साथ मिळू शकेल असा विश्वास व्यक्त केला जात आहे.
________________________

Post a Comment