एरंडोल :- येथील प्रसिद्ध कवी तथा वक्ता प्रा. वा. ना. आंधळे यांची काव्यलेखन-प्रकाशन साधना साडेतीन दशकांपासून सुरु असून त्यांच्या या साधनेनं त्यांची ओळख संपूर्ण महाराष्ट्रातला होत असतांना गुजरात राज्य शालेय अभ्यासक्रम मंडळानेही त्यांच्या सृजनाचे स्वागत व कौतुक केले आहे.
शैक्षणिक वर्ष सन २०२४-२५ पासून गुजरात राज्य प्राथमिक शालेय अभ्यासक्रमात इयत्ता ६वी च्या पाठ्यपुस्तकात 'गणराया' या शीर्षकाची कविता दहा वर्षांसाठी स्वीकारण्यात आली आहे. प्रा.आंधळे यांची कविता यापूर्वीही गुजरात शालेय अभ्यासक्रमात इयत्ता ४थी साठी प्रकाशित असून महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती मंडळाने इयत्ता ३री बालभारती व इयत्ता ११वी युवकभारती च्या पाठयपुस्तकातून प्रकाशित केलीय. क.ब.चौ. उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या एम.ए. द्वितीय वर्षाकरिता, मुंबई विद्यापीठाच्या एफ.वाय.बी.ए. करिता, संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठाच्या एस.वाय.बी.कॉम करिता, डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या एफ.वाय.बी.ए, एफ.वाय.बी.कॉम, एफ.वाय.बी.एस्सी करिता विविध कविता अभ्यासक्रमात समाविष्ट करण्यात आलेल्या आहेत. त्यांची 'आई! मला जन्म घेऊ दे!' ही मैलाचा दगड ठरलेल्या कवितेचा इंग्रजीसह ४५ भारतीय भाषेत अनुवाद झालेला असून त्यांच्या 'फर्मान आणि इतर कविता' या मराठी काव्यसंग्रहाचे देखील इंग्रजी भाषेत भाषांतर झाले आहे.
त्यांच्या या यशदायी वाटचालीचे गुजरात राज्य शाळा पाठयपुस्तक मंडळाचे नियामक : शैक्षणिक डॉ. कमलेशभाई एन. परमार, विषय संयोजक डॉ. निरालीबेन मैयाणी तसेच विषय सल्लागार श्रीमती सुदेष्णा मुरलीधर कदम यांनी अभिनंदन केले आहे. तसेच महाराष्ट्रातूनही त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
__________________________________
Post a Comment