भंडारा (ज्ञानेश्वर बुधवत) :- जागतिक मानवाधिकार दिन निमित्ताने स्थानिक जिल्हा परिषद सभागृहामधे दि. १०-१२-२०२४ रोजी, जागतिक मानवाधिकार दिनाचे औचित्य साधून, केंद्रीय मानवाधिकार संगठन नई दिल्ली च्या सौजन्याने, स्थानिक जिल्हा कार्यकारिणी तर्फे भारतीय संविधानाच्या अमृतमहोत्सवी पर्वावर आयोजित, भारतीय संविधान दिन, जागतिक मानवाधिकार दिन व अमृतमहोत्सवी संविधान सन्मान प्रतियोगिता पुरस्कार २०२४ मधील गुणवंत विद्यार्थ्यांना पुरस्कार वितरण अशा बहुआयामी सोहळ्यामधे विशेष निमंत्रित प्रमुख अतिथी या नात्याने, ज्येष्ठ विधिज्ञ, साहित्यिक, कवी, गायक कलावंत तथा केंद्रीय मानवाधिकार संगठन नई दिल्ली चे राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्ष व आपल्या सात दशकीय प्रदिर्घ समर्पित सामाजिक सेवेस्तव साऊथवेस्टर्न अमेरिकन विद्यापीठातर्फे मानद डॉक्टरेट पदवी प्राप्त, डॉ. विजयकुमार कस्तुरे, ॲडव्होकेट, चिखली यांनी आपल्या वक्तृत्वातून वरीलप्रमाणे विचार व्यक्त केले तथा भारत खंडातील युगायुगांच्या सामाजिक गुलामगिरीत खितपत पडलेल्या लाखो जीवांच्या उध्दार व विकासासाठी, इतिहासात पहिल्यांदाच आरक्षणाची घोषणा व व्यवस्था आपल्या शासन प्रशासनातून प्रस्थापित करणारऱ्या व त्याद्वारे मानवाधिकाराची मुहूर्तमेढ रोवणाऱ्या जाणता राजा राजर्षी छत्रपती शाहू महाराजांवरील स्वयंरचित भावपूर्ण गीत गाऊन माहोल मंत्रमुग्ध केला. भंडारा जिल्ह्याचे ( आय्. ए. एस्. ) जिल्हाधिकारी मा. डॉ. संजय कोलते यांच्या अध्यक्षतेखाली तथा केंद्रीय मानवाधिकार संगठन नई दिल्ली चे संस्थापक अध्यक्ष तथा माजी शांती समिती सदस्य,दिल्ली अल्पसंख्याक आयोग,भारत सरकार,दिल्ली मा.डॉ.मिलींद दहिवले, न्यायाधीश तथा जिल्हा सचिव, विधी व न्याय प्राधिकरण, भंडारा मा. विजू गवारे, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी ( भा. प्र. से. ) मा. समीर कुर्तकोटी, जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समिती अध्यक्ष, भंडारा ( भा. प्र. से. ) मा. महेश आव्हाड, जिल्हा उपवनसंरक्षक, भंडारा ( आय्. एफ्. एस्. ) मा. राहूल गवई तथा के. मा. सं., न. दि. चे राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्ष मा.डॉ. विजयकुमार कस्तुरे यांच्या प्रमुख उपस्थितीत भंडारा जिल्ह्याचे ( आय्. पी. एस्. ) पोलीस अधीक्षक मा. नुरूल हसन यांच्या शुभ हस्ते उदघाटन होऊन संपन्न झालेल्या या अभिनव समारंभामधे, सर्वप्रथम भारतीय संविधान शिल्पकार भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर तथा अन्य महापुरुषांच्या प्रतिमांची दीप-धूप-पुष्प-पूजा मान्यवरांच्या हस्ते करण्यात येऊन, संविधान दिनाच्या अमृतमहोत्सवी पर्वावर संविधान जागृती निमित्ताने हर घर संविधान अभियानांतर्गत, कें. मा.सं.,
न. दि. च्या भंडारा जिल्हा कार्यकारिणीचे वतीने आयोजित संविधान जागृती प्रतियोगिता पुरस्कार २०२४ च्या सर्व मानकरी गुणवंत विद्यार्थ्यांसह शैक्षणिक, स्पर्धा परीक्षात्मक, सामाजिक, सांस्कृतिक व खेळ इ. विविध क्षेत्रातील नैपुण्य प्राप्त विद्यार्थ्यां समवेत शिक्षक-प्राध्यापक व पालकांनाही पुरस्कार तथा रोख बक्षिसे, सन्मानपत्र, स्मृती चिन्ह तथा गुलाबपुष्पासह भारतीय संविधानाची प्रत देऊन आगळ्यावेगळ्या पध्दतीने मान्यवरांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले. एवढेच नाही तर या सोहळ्यानिमित्त विशेष निमंत्रित डॉ.डी.व्ही.खरात सर, चिखली,भावकवी आयुष्मान अंकुश पडघान, बोरगाव काकडे, बुलढाणा तथा इतरही मान्यवरांसोबतंच सहभागी कलावंतांचाही सत्कार करण्यात आला. तसेच सुरूवातीलाच सादर झालेल्या बाल-विद्यार्थिनी व कलावंतांच्या स्वागतगीताने तसेच सांस्कृतिक कार्यक्रमांतर्गत आपल्या अद्वितीय नृत्य कलाविष्काराने सबंध भारतभर लोकप्रियता मिळविणारे कलासाधक मा. प्रियदर्शन सोनटक्के, नागपूर यांच्या शास्त्रीय तसेच लावणी नृत्याने व शाहीर गायकांच्या गीत गायनाने तर ज्येष्ठ साहित्यिक व परकायाप्रवेशी कथाकथनास्तव अमेरिकन विद्यापीठातर्फे मानद डॉक्टरेट पदवी प्राप्त डॉ.बबनराव महामुने यांच्या प्रादेशिक बोलीभाषाविष्कारकथाकथनाने वातावरणात चैतन्य निर्माण केले. याप्रसंगी मान्यवरांची प्रसंगोपात्त प्रबोधनपर भाषणे झाली. त्यात त्यांनी शासन-प्रशासन सदैव नागरिकांच्या मानवाधिकार संरक्षणासाठी सज्ज असल्याचे विषद करून त्यास्तव हमी दिली तसेच अधिकारांच्या जाणीवेसोबतंच कर्तव्यपरायणता जोपासण्याचेही आवाहन केले. या ऐतिहासिक सोहळ्याचे आयोजन, नियोजन तथा प्रास्ताविक संगठनचे राज्य पदाधिकारी मा. देवानंद नंदागवळी सर यांनी केले तर संपूर्ण समारंभाच्या यशस्वीतेसाठी संगठनचे पदाधिकारी सर्व सन्माननीय शेखर बोरकर ( पत्रकार ), सोपान रंगारी, जयेंद्र देशपांडे, महेंद्र तिरपुडे, नाशिक चवरे, प्रवीण भोंबे इ. कार्यकर्त्यांनी अथक परिश्रम घेतले. कर्यक्रमात शेकडो विद्यार्थी व महिला-पुरूष नागरिकांची उल्लेखनीय उपस्थिती होती. वैशिष्ट्य म्हणजे आबालवृध्दांनी या समारंभात सहभागी होऊन सोहळ्याच्या सर्वांगीण संपन्नतेची जणू साक्षच दिली. राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.
_______________________________
Post a Comment