केंद्रीय राज्यमंत्री यांच्या हस्ते लोकार्पण
47 दिव्यांगांना 3 लाख 51 हजारांचे साहित्य वाटप
बुलढाणा(ज्ञानेश्वर बुधवत) :- दिव्यांगांना आवश्यक असलेल्या उपकरण, साहित्यासाठी मुंबई, नागपूर अशा ठिकाणी जावे लागत असे. आता दिव्यांगाना आवश्यक साहित्य दिव्याशा केंद्राच्या माध्यमातून जिल्ह्यातच सहज आणि कमी वेळेत उपलब्ध होणार असून दिव्याशा केंद्र हे दिव्यांगांसाठी पर्वणी ठरणार असल्याचे प्रतिपादन केंद्रीय आयुष, आरोग्य व कुटुंब कल्याण राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांनी केले.
प्रधानमंत्री दिव्याशा केंद्राचा लोकार्पण सोहळा धाड रोड स्थित असलेल्या अपंग निवासी शाळा आणि पुनर्वसन केंद्र येथे आयोजित करण्यात आला होता. त्याप्रसंगी ते बोलत होते. यावेळी आमदार संजय गायकवाड, भारतीय कृत्रिम अंग निर्माण निगमचे उपव्यवस्थापक के.डी. गोते, दिव्यांग कल्याण व पुनर्वसन संस्थाचे अध्यक्ष जयसिंग जयवार, संस्थेचे विश्वस्त गजानन कुलकर्णी, ओमसिंग राजपूत, देशोन्नतीचे सहसंपादक राजेंद्र काळे आदी उपस्थित होते.
केंद्रीय राज्यमंत्री श्री. जाधव म्हणाले की, केंद्र व राज्य शासनाच्यावतीने दिव्यांग बांधवांसाठी विविध योजना राबविण्यात येतात. या योजनेअंतर्गत दिव्यांगाना आवश्यक असलेले उपकरणे, साहित्य सहज आणि कमी वेळेत मोफत उपलब्ध व्हावेत यासाठी प्रधानमंत्री दिव्याशा केंद्र बुलढाणा येथे सुरू करण्यात आले आहे. या केंद्राचा बुलढाणा जिल्ह्यासह इतर जिल्ह्यातील दिव्यांगांना लाभ होणार आहे. या केंद्रामुळे दिव्यांगांना साहित्य मिळविण्यासाठी होणारा त्रास कमी होणार असून त्यांची क्षमता वाढविण्यास मदत होणार आहे. सर्वसामान्य नागरिकाप्रमाणेच त्यांनाही सन्मानाने जगणे सोपे होणार आहे. दिव्यांगाना जास्तीत जास्त सोईसुविधा, साहित्य वाटप व आरोग्याच्या मुलभूत सुविधा उपलब्ध होण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.
प्रधानमंत्री दिव्याशा केंद्र मुंबई, नागपूर नंतर राज्यातील तिसऱ्या क्रमांकाचे व देशातील 67 वे केंद्र बुलढाणा जिल्ह्यात सुरू झाले आहे. ही बाब जिल्ह्यासाठी अभिमानास्पद आहे. दिव्यांगाप्रमाणे दारिद्र रेषेखालील वयोवृद्ध नागरिकांनाही त्यांच्या आवश्यकतेनुसार साहित्य या केंद्रातून देण्यात येणार आहे. तसेच दिव्यांग व वयोवृद्धावर आधुनिक पद्धतीने उपचार करुन आवश्यक साहित्य कमी वेळेमध्ये उपलब्ध होतील. जिल्ह्यातील गरजू दिव्यांग आणि वयोवृद्ध नागरिकांनी दिव्याशा केंद्रात भेट देवून लाभ घ्यावा, असे आवाहन केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांनी केले.
कार्यक्रमाच्या शेवटी केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांच्या हस्ते 47 दिव्यांगांना 3 लक्ष 51 हजार रुपयांचे साहित्य वाटप करण्यात आले. यामध्ये व्हील चेअर, श्रवण यंत्र, ट्र्राय साईकल, कुबड्या, अंधकाठी अशा विविध प्रकारचे साहित्य वाटप करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक एलिम्कोचे उपव्यवस्थापक के.डी. गोते यांनी तर संचालन रमेश आराख यांनी केले.
_____________________________________

Post a Comment