विद्यार्थी, पालक, शिक्षक आणि नागरिकांना इशारा
जिल्ह्यात कॉपीमुक्त अभियानाची कडक अंमलबजावणी
बुलढाणा :- राज्यात इयत्ता बारावीच्या परीक्षेला ११ फेब्रुवारीपासून सुरुवात झाली असून, जिल्ह्यात परीक्षा प्रक्रियेत शिस्त आणि पारदर्शकता राखण्यासाठी प्रशासनाकडून कडक उपाययोजना केल्या जात आहेत. परीक्षा केंद्र परिसरात गैरप्रकार रोखण्यासाठी कॉपीमुक्त अभियानाची प्रभावी अंमलबजावणी केली जात असून, गैरप्रकार करताना आढळणाऱ्या विद्यार्थी, पालक, शिक्षण, कर्मचाऱ्यांविरुद्ध गुन्हा दाखल केला जाईल, याशिवाय मुख्यमंत्र्यांच्या निर्देशानुसार सामूहिक कॅापी आढळलेल्या परीक्षा केंद्राची मान्यता रद्द करण्याचा इशारा जिल्हा परिषद शिक्षण विभाग आणि जिल्हा प्रशासनाने दिला आहे.
परीक्षांमध्ये गैरप्रकारांना रोखण्यासाठी जिल्हा प्रशासनामार्फत 'कॉपीमुक्त अभियान' राबविले जात आहे. दहावी, बारावीची परीक्षा सुरळीतपणे पार पडाव्या यासाठी पालकांना व विद्यार्थ्यांना आवाहन करण्यात येत आहे. तसेच परीक्षेत गैरप्रकार करताना आढळल्यास गुन्हा दाखल करण्यात येत आहे. अशा प्रकारांना प्रोत्साहन व मदत करणाऱ्यावरही थेट कारवाई करण्याचा निर्देश राज्य शिक्षण मंडळाने दिले आहे.
परीक्षांवर प्रशासनाचा वॅाच
बुलढाण्यात बारावी परीक्षा ११ ते १८ मार्च दरम्यान होणार असून, ३४,५३५ विद्यार्थ्यांची परीक्षा घेतली जात आहे. तर दहावीची परीक्षा २१ फेब्रुवारी ते १७ मार्चदरम्यान होणार असून, ४०,९१४ विद्यार्थी परीक्षेला बसणार आहेत. जिल्ह्यात बारावीचे ११६ व दहावीचे १५९ परीक्षा केंद्र असून या केंद्रांवर ही परीक्षा सुरळीत पार पाडण्यासाठी जिल्हास्तरावर एकूण सहा भरारी पथके तसेच प्रत्येक तालुक्यातील तहसीलदार यांचे एकूण १३ भरारी पथके तसेच पाच उपविभागीय अधिकारी यांची भरारी पथके असे एकूण २४ भरारी पथक कार्यरत असून बारावीच्या ११६ केंद्रावर ११६ बैठे पथक तसेच दहावीच्या १५९ केंद्रावर १५९ बैठे पथक नियुक्त करण्यात आलेले आहेत. या परीक्षांवर कडक लक्ष देण्यासाठी सीसीटीव्हीद्वारे निगराणी ठेवली जात आहे. परीक्षा कक्षामध्ये मोबाइल फोन आणि इलेक्ट्रॉनिक उपकरणांवर बंदी घातली आहे. परीक्षा केंद्रात विद्यार्थ्यांना शांततेत परीक्षा देता यावी यासाठी हे कॅापामुक्त अभियान राबवले जात आहे. या अभियानांतर्गत केंद्रावर कॅापी पुरविणाऱ्या पालक, अधिकारी, कर्मचारी आणि शिक्षकांवर कारवाई केली जाणार आहे. मुख्यमंत्र्यांच्या निर्देशानुसार बुलढाण्याच्या कॅापीमुक्त अभियानाची प्रभावीपणे अंमलबजावणी केली जात आहे, अशी माहिती शिक्षणाधिकारी (मा) यांनी दिली आहे.
संशयित विद्यार्थ्यांची होणार तपासणी
परीक्षेदरम्यान संशयित विद्यार्थ्यांची तपासणी केली जाणार आहे. परीक्षेत कॉपी अथवा अन्य कुठलाही गैरप्रकार आढळल्यास गुन्हा दाखल करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. परीक्षेच्या पारदर्शकतेस बाधा आणणाऱ्या विद्यार्थी, पालक किंवा अन्य व्यक्तींवर कठोर कारवाई केली जाणार आहे.
आत्मविश्वासाने परीक्षा द्या
विद्यार्थ्यांनी परीक्षेची योग्य तयारी करून आत्मविश्वासाने परीक्षा द्यावी. गैरप्रकार न करता प्रामाणिकपणे यश मिळवावे. पालक आणि शिक्षकांनीही विद्यार्थ्यांना कॅापी न करता परीक्षा देण्यास प्रवृत्त करावे. विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी परीक्षेतील गैरप्रकार रोखणे ही सर्व नागरिकांची जबाबदारी आहे. या कॉपी मुक्त अभियानात पालकांनी विद्यार्थ्यांना योग्य रित्या परीक्षा देण्यासाठी प्रोत्साहित करुन सहकार्य करावे, असे आवाहन देखील जिल्हा प्रशासनाने केले आहे.
_________________________
Post a Comment