गोळेगाव : बोदवड - दि. १५-०३-२०२५ रोजी मौजे गोळेगाव, तथा. बोदवड, जिल्हा जळगाव पू. खा. शेजारील श्री.गजानन महाराज मंदिर परिसरातील उद्यानात आयोजित केंद्रीय मानवाधिकार संगठन, नई दिल्ली च्या प्रादेशिक अधिवेशन - २०२५ तथा पुरस्कार वितरण सोहळ्यामध्ये, चिखली (खडकपुरा ), ता. चिखली, जि. बुलढाणा येथील, वयाच्या पाचव्या वर्षापासून शिक्षणाबरोबरच कलेच्या क्षेत्रात आपल्या इवल्याशा बोटांनी तबल्याशी जोडलेले नाते जोपासत तथा फुले - आंबेडकरी विचारधारेच्या व संवैधानिक स्वरूपाच्या कार्यक्रमांमधून प्रबोधन व जनजागृतीचे पवित्र राष्ट्रीय कार्य करणाऱ्या बाल कलावंत मास्टर अश्विनकुमार अविनाश वेंडोले यास बहुमानाच्या संविधान गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात. संगठनचे राष्ट्रीय अध्यक्ष मा. डॉ. मिलींद दहीवले, नई दिल्ली यांच्यासह राष्ट्रीय कार्याध्यक्ष तथा सामाजिक सेवाभावी कार्यास्तव अमेरिकेतील विद्यापीठाकडून मानद डॉक्टरेट प्राप्त डॉ.ॲड. विजयकुमार कस्तुरे, चिखली, राष्ट्रीय संगठन सचिव तथा साहित्यिक प्रभावी कथाकथनास्तव अमेरिकन विद्यापीठातर्फे मानद डॉक्टरेट पदवीने सन्मानित डॉ. बबनराव महामुने, छ. संभाजीनगर, उपाध्यक्ष जनाब बशीर शेख, मुंबई, महाराष्ट्र राज्य पदाधिकारी डॉ. पंकज इंगळे, जळगाव, डॉ. अमर कुमार तायडे, नवनिर्वाचित वरिष्ठ उपाध्यक्ष मा. रविंद्र काशिनाथ सोनार, गोळेगाव आणि डॉ. डी.व्ही. खरात इ. मान्यवरांच्या हस्ते सदर पुरस्कार सन्मानपत्र, शाल व पुष्पगुच्छ प्रदान करून कुमार अश्विनचा गौरव करण्यात आला. महत्त्वाचे म्हणजे कुमार अश्विनच्या वडीलांची आजी दिवंगत सोनाबाई वेंडोले यांचेही नांव त्यांच्या भजन-दिंडी- वारी मध्ये तसेच मुक्ताई नगरहून पंढरपूरला तत्कालीन जाणाऱ्या पालखी सोबत खंजिरी व झ्यांज ही पारंपारिक वाद्ये वाजवीत भजने,अभंग तथा भक्ती गीते गाण्यासाठी व पंचक्रोशीतील सर्व जनतेच्या सुखदु:खात मदत व सहकार्य करण्यासाठी प्रसिद्ध होते. विशेष म्हणजे गेली पासष्ट वर्षे ॲड. विजयकुमार कस्तुरे यांच्या अध्यक्षतेखाली भजन गीताद्वारे अविरत प्रबोधनाचे कार्य करणाऱ्या चिखली येथील सुप्रसिध्द पंचशील भजनी मंडळाच्या त्या एक सदस्य होत्या. तसेच त्यांचे चिरंजीव अर्थात अश्विनचे आजोबा नारायण वेंडोले सुध्दा भजनी मंडळ गायक कलाकार होते. असा कौटुंबिक वारसा घेऊन या बाल कलावंताने संवैधानिक प्रबोधन क्षेत्रात मारलेल्या या यशस्वी भरारीमुळे सर्व स्तरांमधून त्याचे हार्दिक अभिनंदन होत असून पुढील यशवंत वाटचालीसाठी त्याच्यावर शुभेच्छांचा सुध्दा वर्षाव होत आहे.
________________________
Post a Comment