चिखली :- अखंड भारतालाच नव्हे तर अखिल विश्वाला मानवीय विचार प्रदान करणारे तथा सामाजिक, शैक्षणिक, वैचारिक तथा मानसिक गुलामीच्या वर्णाश्रमी अमानवी शृंखलातून कोट्यावधींच्या अवघ्या शुद्रातिशुद्र मानव समूहाला मुक्त करून, संविधानाच्या रूपाने समता, स्वातंत्र्य बंधुतेचा संदेश देणाऱ्या भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३४ व्या जयंती निमित्त आज दि. १४-०४-२०२५ रोजी, एकता नगर, चिखली, जिल्हा बुलढाणा येथील सर्व धर्म समभाव तथा सामाजिक ऐक्याची अंदाजे सहा दशकांची परंपरा असणाऱ्या व विविध जाती धर्माच्या जनतेच्या सामंजस्य पूर्ण सहकार्य तथा सहभागातून हर्षोल्हासाने साजऱ्या होणाऱ्या भीमजयंती सोहळ्याच्या निमित्ताने बोलत असताना, या अभिनव पारंपारिक कार्यक्रमाचे प्रणेते व सूत्र संचालक तथा ज्येष्ठ विधिज्ञ व साहित्यिक कवी डॉ. विजयकुमार कस्तुरे यांनी, महापुरूषांची जयंती म्हणजे केवळ दरवर्षी ठरलेल्या तारखेला फक्त विशिष्ट जात समाजाच्याच मंडळींनी त्या महापुरुषांच्या प्रतिमेला, घोषणा देत हार घालून आपल्याच वाहनांची मोठमोठ्या झेंड्यांसह रॅली काढून, संध्याकाळी-रात्री बेधुंद डीजेंच्या कर्णकर्कश डरकाळ्यांच्या तालावर नाचून, बहुतांश ठिकाणी जर आपण या पध्दतीने जयंती साजरी करण्यात धन्यता मानणार असलो तर, त्याला जयंती साजरी करणे म्हणता येणार नाही, तर जयंती महापुरुषांचा वैचारिक वारसा जपणारी व सर्वधर्म समभावाने सामाजिक समरसता जोपासणारी असावी असे- बाबा तुमची शिकवण आम्हा, अजून कळली नाही.
सांगा पुन्हा एकदा
या ना पुन्हा एकदा !
नाचावे की वाचावे
हे अजून ठरले नाही.
सांगा पुन्हा एकदा
या ना पुन्हा एकदा !!
या आपल्या गीतांमधून
आवर्जून आवाहन केले.
सुरूवातीला चिखली शहरातील दातृत्वशील सामाजिक कार्यकर्ते मा. अशोक अग्रवाल व मा. कादरसेठ गादीवाले यांच्या तसेच उपस्थित सर्व मान्यवर आबालवृद्धांच्या हस्ते तथागत गौतम बुद्ध तसेच भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रतिमांचे दीप-धूप-पुष्पपूजन करून पंचशील धम्म ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी ज्येष्ठ पत्रकार महेश वाधवाणी, अशोक अग्रवाल, संजीवनी संस्था अध्यक्ष डॉ. निवृत्ती जाधव, सामाजिक कार्यकर्ते गोपालभाऊ जाधव इ. नी, एकता नगर सारखी सामाजिक जाण व भान जपणारी महापुरुषांची जयंती सर्वत्र साजरी होण्यावर भर देणारे व सर्व नागरिकांना तसा नम्र संदेश देणारे विचार व्यक्त केले. नंतर सर्वांनी धम्म वंदना घेऊन सालाबादप्रमाणे अशोक अग्रवाल यांच्या वतीने भोजन दान अर्थात खिचडी वाटपाच्या उपक्रमास महेश वाधवाणी यांच्या हस्ते बालिकेस भोजन देऊन सुरूवात करण्यात आली.
याप्रसंगी सिंधी समाज मंडळाचे मा. नागवाणी, माजी नगरसेवक दिपक काळे, बडगुजर समाज संघटनेचे रविंद्र शालेशा, रणजीत शालेशा, विश्वकर्मा व जांगीड ब्राम्हण मंडळाचे मनोज शर्मा, व्यापारी मंडळाचे सलमान खान, मा. बबन हाके महाराज, खोर, सामाजिक कार्यकर्ते रामदास ठोंबरे, एकता नगर मधील या पारंपारिक कार्यक्रमाचे सुरूवातीपासूनचे सक्रिय कार्यकर्ते विश्वनाथ बावस्कर, एकता नगर चे पुरोगामी विचाराचे ऊगवते तरूण नेतृत्व शिवा इंगळे तसेच त्यांचे मित्र मंडळ, राहूल गायकवाड, जितू साळवे, आठवडी बाजार परिसरातील विविध व्यापारी व व्यवसायी मंडळी तसेच स्थानिक कार्यकर्ते सुभाष ठोंबरे, भारत इंगळे, शेख रऊफ, संतोष धांडे, भगवान बावस्कर, अनिल धांडे, ओम नेमाडे, विजय गायकवाड, पवन मस्के, शुभम इंगळे, धीरज वानखेडे, अविनाश मोरे, सुरेश मोरे, जय खाजेकर, बंटी इंगळे, राजू गायकवाड, राम बावस्कर, रमेश ठोंबरे, ओम इंगळे, सिद्धार्थ धांडे, अभिजीत धांडे, निलेश जाधव, विशाल पवार, शेख समीर, यश बावस्कर लखन बावस्कर, श्रेयस इंगळे, शुभम नेमाडे, संकेत ठोंबरे, शैलेश पवार, मंदाबाई मस्के, शांताबाई बावस्कर, सुमनबाई धांडे, जनाबाई वाघमारे, सखुबाई आराख, लक्ष्मी ठोंबरे, मंगला ठोंबरे, नंदा धांडे, रक्षा इंगळे, अनिता मोरे, सीमा मोरे, शोभा जाधव, अनिता खाजेकर, बेबी गोफणे, ताराबाई नाडे, सुनिता नेमाडे, धृपदाबाई घेवंदे, अनिता बावस्कर, सुरेखा गायकवाड, रेखा पवार, सविता पवार, जय दानोदिया, आकाश रोकडे, निखिल दानोदिया इ. सह शेकडो नागरिक बंधूभगिनिंच्या सहभागाने हा अद्वितीय सोहळा संपन्न झाला. या अभिनव कार्यक्रमाचे आयोजन तथा सूत्र संचालन डॉ. विजयकुमार कस्तुरे यांनी केले तर संयोजन व यशस्वितेसाठी शिवा इंगळे तथा त्यांच्या सहकारी मंडळींनी कठोर परिश्रम घेतले.
________________________
Post a Comment