धारूरlप्रदीप मुंडे :- बीड जिल्ह्यात पावसाने अद्यापही दडी मारल्याने शेतकऱ्यांची स्थिती अतिशय भीषण झाली आहे. महिनाभरापासून पावसाची वाट पाहून थकलेल्या धारूर तालुक्यातील चोंडी येथील गोविंद भागवत घुले या शेतकऱ्याने शेवटी स्वतःच्या कापसाच्या शेतात दोन एकर मध्ये नांगर लावण्याचा टोकाचा निर्णय घेतला.
कापसाची पेरणी झाल्यानंतर वेळेत पाऊस न आल्याने नुसता कोंब उगवून उगमावस्थेतच रोपे सुकू लागली. एकीकडे वाढत्या तापमानाने मातीत उष्मा वाढला असून दुसरीकडे काळ्या ढगांनी फसवणूक केली आहे. यामुळे वैतागलेल्या घुले यांनी "कष्टाचे चीज नाही, सरकार फक्त घोषणा करतं" असा संतप्त सूर लावत नांगर कापसात घालून पुन्हा जमिनीची मशागत सुरू केली.
शेतकऱ्यांचे हाल... सरकार गप्प!
घुले यांच्यासारख्या अनेक शेतकऱ्यांनी बँकेचे कर्ज, खतांची उधारी आणि बियाण्यांची गुंतवणूक केली आहे. मात्र पाऊस नाही, विम्याची खात्री नाही आणि सरकारकडून कोणतीही तातडीची मदतही नाही. पेरणीनंतर पाऊस नाही म्हणून शेतकऱ्यांच्या डोळ्यांत अश्रू, हातात फक्त नांगर.
स्थानिक प्रशासनाचा ठोस पाठपुरावा नाही
चोंडी गावातील अनेक शेतकरी आज चिंता, हतबलता आणि असहाय्यतेच्या गर्तेत आहेत. प्रशासनाकडून कुठलाही मदतीचा हात पुढे आलेला नाही. हवामान खात्याच्या अंदाजाने अनेक वेळा फसवले असून शेतकरी दररोज आकाशाकडे डोळे लावून बसले आहेत.
"आमचं भविष्य पावसावर नाही, पण सरकारवरही नाही!" – गोविंद घुले
“दरवर्षी हेच संकट. आम्ही पिकं पेरतो, निसर्ग फसवतो आणि सरकार डोळे झाकून बसतं. आम्ही पावसावर विश्वास ठेवतो, पण सरकारच्या वचनांवर आता नाही,” असे घुले यांनी सांगितले.
_________________________

Post a Comment