कुंडलवाडी|गंगाधर दुसलवाड :- कुंडलवाडी पोलीस स्टेशन अंतर्गत असलेल्या मांजरा नदी काठावरील पाच गावांना पूर परिस्थिती निर्माण झाल्यामुळे या गावातील नागरिकांना एनडीआरएफ टीम, महसूल व पोलीस प्रशासनाच्या माध्यमातून सुरक्षित स्थळी स्थलांतर करण्यात आल्याची माहिती साहय्यक पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर शिंदे यांनी दिली आहे.
कुंडलवाडी शहर व परिसरात गेल्या दोन दिवसापासून मुसळधार पाऊस पडत असल्यामुळे राज्य सीमेवर असलेल्या मांजरा नदीला मोठ्या प्रमाणात पूर आल्यामुळे पुराचे पाणी नदीकाठच्या नागणी, मनुर, संगम, बामणी थडी, विळेगाव थडी आदी गावामध्ये शिरल्यामुळे नागरिकांच्या जीविताला धोका निर्माण झाला होता, याबाबतीत महसूल प्रशासन व पोलीस प्रशासनाने नागरिकांना संभाव्य धोक्याची माहिती देऊन एनडीआरएफ टीमच्या मदतीने या गावातील सर्व नागरिकांना रेस्क्यू करून सुरक्षित स्थळी हलवण्यात आले आहे. नागणी व हरनाळी येथील नागरिकांना कुंडलवाडी येथील के रामलु मंगल कार्यालय येथे ठेवण्यात आले आहे तर मनूर, संगम, विळेगाव, विळेगाव थडी आदी गावातील नागरिकांना के रामलू पब्लिक स्कूल, व मिलिंद शाळा कुंडलवाडी या ठिकाणी ठेवण्यात आले आहे. आतापर्यंत या पूर परिस्थितीत कुठलीही जीवित हानी झाली नसल्याची माहिती सहाय्यक पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर शिंदे यांनी दिली आहे. यावेळी उपविभागीय अधिकारी बिलोली कांती डोंबे , उपविभागीय अधिकारी धर्माबाद स्वाती दाभाडे, तहसीलदार धर्माबाद सुरेखा स्वामी , नायब तहसीलदार आर जी चव्हाण ,मंदार इंदुरकर,मिठेवाड, सहाय्यक पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर शिंदे , पोलीस उपनिरीक्षक गजेंद्र मांजरमकर, मंडळ अधिकारी अनिता गोरदिनकर, पवन ठकरोड,बी जे कांबळे, रघुवीर चव्हाण ,गाडेकर, वाघमारे आदी आदी उपस्थित होते.
________________________

Post a Comment