लातूर :- सध्याच्या डिजिटल युगात सायबर सुरक्षा ही काळाची गरज बनली आहे. याच उद्देशाने राजर्षी शाहू महाविद्यालय (स्वायत्त), लातूर व क्विक हिल फाऊंडेशन, पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने राबविण्यात येणाऱ्या “सायबर शिक्षा फॉर सायबर सुरक्षा” या उपक्रमाअंतर्गत श्री शिवाजी माध्यमिक विद्यालय, सरस्वती कॉलनी, लातूर येथे सायबर सुरक्षा विषयक मार्गदर्शन कार्यशाळा उत्साहात पार पडली.
हा उपक्रम मागील तीन वर्षांपासून लातूर जिल्ह्यात सातत्याने राबविला जात असून विद्यार्थ्यांमध्ये डिजिटल सुरक्षिततेबाबत जागृती निर्माण करणे हा त्यामागील प्रमुख हेतू आहे. वाढत्या सायबर गुन्ह्यांच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांनी तंत्रज्ञानाचा योग्य व जबाबदारीने वापर करण्यासाठी आवश्यक खबरदारीची माहिती या कार्यशाळेत देण्यात आली.
या कार्यशाळेत राजर्षी शाहू महाविद्यालयाच्या माहिती तंत्रज्ञान विभागातील विद्यार्थिनींनी विद्यार्थ्यांना सोशल मीडियाचा जबाबदारीने वापर, इंटरनेटच्या अति व अयोग्य वापराचे दुष्परिणाम, तसेच डिजिटल फसवणुकीपासून कसे सावध राहावे याविषयी उदाहरणांसह सविस्तर मार्गदर्शन केले. सायबर सेल, गुन्हा नोंदणी प्रक्रिया, राष्ट्रीय हेल्पलाईन क्रमांक (1930) आणि सायबर पोर्टल याबद्दल देखील माहिती देण्यात आली.
या कार्यशाळेत विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवत विविध शंकांचे समाधान केले, शिक्षकांनीही या उपक्रमाचे कौतुक केले
या प्रसंगी संस्था संचालक सौ. मेघाताई जाधव यांनी आपल्या मार्गदर्शनपर भाषणात विद्यार्थ्यांना डिजिटल जगात जबाबदारीने व सुरक्षिततेने वावरावे, सोशल मीडियावर अनावश्यक माहिती शेअर करू नये आणि शंका आल्यास त्वरित पालक व शिक्षकांचा सल्ला घ्यावा असे आवाहन केले. त्यांनी विद्यार्थ्यांमध्ये सायबर साक्षरता वाढविण्यासाठी अशा उपक्रमांची गरज अधोरेखित केली.
यावेळी शाळेचे मुख्याध्यापक श्री. आर. एम. कटके, उपमुख्याध्यापक श्री. बी. आर. गुरमे, पर्यवेक्षक श्री. ए. पी. तोगरे, श्री. भोपे व्ही. एस., व डॉ. उमाकांत जाधव उपस्थित होते. या कार्यशाळेच्या यशस्वी आयोजनासाठी ‘सायबर वॉरियर्स’ मानसी कापसे व साक्षी सोमवंशी यांनी महत्त्वपूर्ण योगदान दिले.
या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये सायबर जागरूकता, जबाबदार डिजिटल नागरिकत्व, आणि सुरक्षित इंटरनेट वापर याबाबत दृढ संकल्प निर्माण झाला. भविष्यात अशा कार्यशाळांमुळे सायबर गुन्ह्यांपासून बचाव करण्याची क्षमता विद्यार्थ्यांमध्ये अधिक वाढेल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला.
________________________

Post a Comment