मुदखेडसह अनेक गावांत ढगफुटीमुळे मोठे नुकसान

लोकनेता न्युज नेटवर्क

मुदखेड|किशोर पाटील मुंगल :- मुदखेडसह पिंपळकौठा (मगरे) राजवाडी, डोणगाव, ईजळी गावात झालेल्या ढगफुटीसदृश्य पावसाने हाहाकार माजवला असून या पावसामुळे नदी नाल्यांना पूर आला असल्यामुळे अनेक गावातील घरांमध्ये पाणी शिरले गेले आहे. पुराच्या पाण्याने शेकडो एकर मधील पिके पुरात वाहून गेली असून अनेक गावांना पुराच्या पाण्याने वेढा दिला आहे.
       दि. २८,29,ऑगस्ट रोजी गुरुवारी सकाळपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे मुदखेड, पिंपळकौठा (मगरे) डोणगाव, न्याहळी, चिलपिपरी शिवारात परिस्थिती अत्यंत गंभीर बनली असून मुदखेड शहरातील सखल भाग गुजरी, अमीर कॉलनी, भीमनगर, मदिनानगर, नंदिनगरमधील अनेक घरे पाण्याखाली गेली आहेत. नंदीनगर भागातील दहा ते बारा घरांमध्ये पाणी शिरले असून गरीब कुटुंबांचे मोठे नुकसान झाले असून त्या कुटुंबीयांना जिल्हा परिषद प्राथमिक शाळा येथे स्थलांतरित करण्यात आले आहे. या भीषण परिस्थितीमुळे हातावरचे पोट असणारा सर्वसामान्य मजूर, कामगार तसेच जगाचा पोशिंदा असलेला बळीराजा कोलमडून पडला असून शेकडो एकर जमिनीवरील अनेक पिके पूर्णतः पुरात वाहून गेली आहेत. शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास या प्रलयात वाहून गेल्याने बळीराजा पूर्णपणे कोलमडून पडला आहे.गुरुवारी व शुक्रवारी झालेल्या मुसळधार पावसामुळे नदी, नाले दुथडी भरून वाहू लागले. पावसाचा जोर वाढत गेल्याने सीता नदीवरील पुलावरून पाणी वाहू लागल्याने नांदेड-मुदखेडचा संपर्क तुटला तर पुराचे पाणी आजूबाजूच्या शेतात शिरल्याने शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. ४५० नागरिकांच्या घरात पाणी शिरल्याने मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.
        तालुक्यातील अंदाजे २१ हजार हेक्टर शेतीचे नुकसान झाले आहे. शासनाकडून पूरग्रस्त कुटुंबीयांना ४५ लाख रुपयांची मदत दिली जाणार असल्याचे तहसीलदार आनंद देऊळगावकर यांनी सांगितले तरी मुदखेड तालुक्यातील शेतकऱ्यांना सर सगट नुकसान भरपाई द्यावी असे मुदखेड तालुक्यातील शेतकऱ्यांचे म्हणणे आहे.
________________________

0/Post a Comment/Comments