नांदेड | पंकज गादेकर :- नांदेडच्या नल्लागुटा चाळ परिसरात झालेल्या मुसळधार पावसामुळे संपूर्ण परिसर जलमय झाला असून, येनागणटी व्यंकटेश सावित्री जनार्दन यांच्या घरांमध्ये पाणी शिरल्याने नागरिकांचे मोठे नुकसान झाले आहे.
स्थानीय नागरिकांच्या मते, महानगरपालिकेच्या ढिसाळ कारभारामुळे ही परिस्थिती उद्भवली आहे. वेळेत आणि व्यवस्थित नालेसफाई न केल्यामुळे पावसाचे पाणी निचरा होऊ शकले नाही आणि रस्ते ओसंडून वाहू लागले. परिणामी, घरात पाणी शिरले, घरगुती साहित्याचे नुकसान झाले आणि जनजीवन विस्कळित झाले.
नागरिकांच्या मुख्य तक्रारी:
नालेसफाई केवळ कागदोपत्री झाली, जलनिकासी व्यवस्थेचा पूर्णत: बोजवारा, आपत्ती व्यवस्थापनाची कोणतीही मदत अद्याप उपलब्ध नाही, महापालिकेकडून कोणतीही पाहणी नाही, "प्रत्येक वर्षी हीच परिस्थिती उद्भवते. किती वेळा तक्रार करायची? यंदा पाण्यामुळे घरातलं अन्न, कपडे, टीव्ही आणि फ्रिजसुद्धा खराब झाले," असे संतप्त नागरिकांनी सांगितले.
नागरिकांची मागणी:
तात्काळ नुकसानग्रस्त नागरिकांना आर्थिक मदत, नालेसफाईची प्रभावी आणि पारदर्शक व्यवस्था, दीर्घकालीन जलनिकासी उपाययोजना, जबाबदार अधिकाऱ्यांवर कारवाई.
प्रशासनाने याकडे गांभीर्याने लक्ष देण्याची गरज आहे. अन्यथा अशा प्रकारच्या आपत्तींना तोंड देण्यासाठी नागरिक पूर्णपणे एकटे पडतील.
________________________

Post a Comment