लोकनेता न्युज नेटवर्क
शिरवळ : शंकर मुकादम हे शिकलेले नसले तरी चाणाक्ष बुद्धी व स्वकष्टाच्या जोरावर ते खडकी, पुणे येथील किर्लोस्कर ऑइल इंजिन्स लिमिटेड या प्रसिद्ध कंपनीत नोकरीला लागले व अल्पावधीतच त्यांचा प्रामाणिकपणा व कष्टाळुवृत्तीमुळे त्यांची ओळख कंपनीत कुशल कामगार म्हणून निर्माण झाली. त्यांचे काम पाहुन व्यवस्थापनाने त्यांना मुकादम पदावर बढती देऊन त्यांच्या सचोटी व मेहनतीचे फळ दिले. कंपनीचे मालक असलेले शंतनुराव किर्लोस्कर यांचा मुलगा चिरंजीव चंद्रकांत किर्लोस्कर हे परदेशातून शिक्षण घेऊन आल्यानंतर शंकर मुकादम यांच्या हाताखाली हेल्पर म्हणून काम करत होते. त्यांना सर्वजण शंकर मुकादम या टोपन नावाने ओळखत होते. वरिष्ठांनी विशेषतः कंपनीचे मालक तत्कालीन प्रसिद्ध उद्योजक मा. शंतनुराव किर्लोस्कर यांनी दाखविलेल्या विश्वासाची जाणीव ठेवून दिलेली जबाबदारी त्यांनी निष्ठेने पार पाडत त्यांनी आपल्या कर्तृत्वात कसर ठेवली नाही. तसेच मुकादम झाले तरी त्यांनी आपल्यातील कारागिरीला जिवंत ठेवले. कंपनीत मोठ्या अधिकारी व अभियंता यांना न जमणारी यांत्रिक कामे त्यांनी आपल्या अनुभव व कौशल्याने सहज करुन दाखवली. याबाबत त्यांना कंपनीचे मालक तत्कालीन प्रसिद्ध उद्योजक मा. शंतनुराव किर्लोस्कर यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले. हाताखालील कामगारांना कामे शिकवण्या बरोबरच त्यांना कामे वाटून देणे, त्यांच्यावर परिक्षण करणे, याबरोबरच वरिष्ठांना देखील सल्ला देत मदत करण्याचे काम केले. या सर्व गोष्टींमुळे व व्यवस्थापनाने टाकलेल्या विश्वासाच्या जोरावर ते शतंनुराव किर्लोस्कर यांचे निकटवर्तीय म्हणून ओळखले जाऊ लागले. या ओळखीचा फायदा त्यांनी स्वतःसाठी न करता शिरवळ गावातील तसेच खंडाळा, भोर, वेल्हा, पुरंदर या तालुक्यातील कित्येक शिक्षित, होतकरू, गरीब तरुणांना कंपनीत नोकरी मिळवून देण्यासाठी केला. त्यांच्यामुळे अनेकांना रोजगार मिळाला. खडकी येथील किर्लोस्कर कंपनी आणि दापोडी यांच्या मध्यभागी असलेल्या नदीच्या अलीकडे बोपोडी ही वसाहत शंकर मुकादम यांच्यामुळेच येथील कामगारांसाठी निर्माण झाली.
हे सर्व करताना त्यांनी सामाजिक क्षेत्रात देखील योगदान दिले. खंडाळा येथील तहसीलदार कार्यालयाला समोरील असलेल्या बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यासाठी त्यांचे मोलाचे योगदान होते. त्यांनी डाॅ. बाबासाहेब आंबेडकरांचे शिरवळ नगरीत भव्य स्मारक उभे राहण्यासाठी भरीव कार्य करण्याचा प्रयत्न केला. शिरवळचे पहिले सरपंच कै. पांडुरंग बाळाजी तांबे, कै. हरीभाऊ भापकर, कै. रामनाना कांबळे, कै. ईश्वर तारू, कै. डाह्याबाई जोशी, कै. शरीफ भाई फरास, कै. विनायकराव गोलांडे, कै. माहमूद काझी मास्तर, कै. नारायणराव राऊत, कै. शंकरराव राऊत, कै. विठ्ठलराव शेटे, कै. रामचंद्रराव शेटे, कै. पांडुरंग कांबळे, कै. गेनबा वैद्य व शिरवळचे इतर जुने-जाणते ज्यांनी ऐतिहासिक शिरवळच्या विकासासाठी अत्यंत अनमोल असे योगदान दिलेले आहे अशा व्यक्तींबरोबर त्यांचे मैत्रीपूर्व स्नेह-संबंध होते.
खंडाळा, भोर, वेल्हा, पुरंदर या तालुक्यातील कित्येक तरुणांना रोजगार देऊन त्यांची कुटुंबे उभी केली अशी महान व्यक्ती स्मृतीशेष शंकर मुकादम तथा शंकर भैरू कांबळे हे शिरवळकरांसाठी गौरवास्पद आणि अभिमानास्पद आहेत. शेकडो कुटुंबांना आधार देणारे, जगण्यासाठी प्रेरणा देणारे कालकथीत शंकर मुकादम तथा शंकर भैरू कांबळे यांना विनम्र अभिवादन.
शब्दांकन :-
श्री. संदेश यादव, शिरवळ
________________________

Post a Comment