पत्रास कारण की.... निरोप समारंभ!!

प्रिय,
श्री .राजेश प्रधान सर,

       पत्र लिहिण्यास कारण की तुम्ही सेवा निवृत्त होऊ जाणार हिच गोष्ट मनाला खुप चटका लावुन जात आहे पण पर्याय नाही. एका गोष्टीच दुःख होत आहे की आता तुम्ही कंपनी मध्ये नसाल तुमच्या विणा आम्हाला एकही क्षण करमनार नाही. आम्हाला दैनंदिन कामात येणाऱ्या अडचणी सोडवण्यासाठी मदत मिळायची. तुमचा सहवास अजुन लाभला असता तर अजुन खुप काही शिकता आलं असतं आणि आनंद या गोष्टीचा होईल की आतापर्यंत कुटुंबासाठी जास्त वेळ देता आला नाही तो देता येईल.
      सर मी सण २०१५ पासुन आपल्या रिसिव्हिंग मध्ये कामावर रुजु झालो तेंव्हापासुन पाहतो आहे की तुमची कंपनीप्रती अन् कामाप्रती प्रामाणिक, निःस्वार्थी,निष्ठा अपार आहे याबद्द्ल खुपचं कौतुक वाटत आलंय सर. स्वतःला झोकुन देऊन प्रत्येक काम, जीव तोडून अगदी तळमळीने करत आलाय तुम्ही. पायाला भिंगरी बांधुन सतत प्रयत्नशील राहिलात. कधीच क्षणभर विसावा घेतला नाही तुम्ही.

 कंपनीप्रति निःस्वार्थ भावना व सत्कार्य 

तुमच्यातील प्रामाणिकपणा , निःस्वार्थ भावना , निर्णय क्षमता आणि तुम्ही घडवलेले अमुलाग्र बदल हे रिसिव्हिंग डिपार्टमेंट च्या इतिहासात कायम अजरामर राहील.
नव नवीन कल्पना आणुन आपलं काम सुखकर कसं करता येईल व आपली कंपनी कशी पुढे जाईल याचाच विचार करत आलात. जास्तीत जास्त वेळ देऊन कंपनी च्या समस्या कायमस्वरूपी सोडवण्यासाठी प्रयत्नशील राहिलात.

 सहकाऱ्यांप्रति आपुलकी आणि जिव्हाळा 

कसलाही संकुचित दृष्टिकोन न ठेवता निर्मळ मनाने आपण माणस जपलीत सर,
माणुसकी कमावलीत तुम्ही तुमच्या आचरणातून.
प्रथम प्राधान्य कामगारांच्या आरोग्याकडे देत आलात.कामगारांविषयी तळमळ, निष्ठा, प्रेम जिव्हाळा जपत आलात.
प्रत्येक सहकाऱ्यांच्या सुख दुःखाचे भागीदार झालात. प्रत्येक व्यक्तीच्या दुःखाच्या खडतर प्रवासात तुम्ही दिलेला आधार न विसरण्यासारखा आहे.

 बहुआयामी व्यक्तिमत्त्व 

बहुआयामी व्यक्तिमत्त्व असलेल्या प्रधान सरांकडून डिपार्टमेंट मधली मुलं शिकतं आलीत, घडत आलीत, स्वतःला सावरत आलीत. सरांनी घडवलेली मुले जगाच्या पाठीवर कुठेही तग धरून खंबीरपणे उभी राहतील. तो कणखर बुलंद आवाज, बोलण्याची प्रभावी शैली , अतिशय सोप्या भाषेत उदाहरणासह स्पष्टीकरण देण्याची उत्तम कला. अचुक निर्णय क्षमता, आत्मविश्वास, न खचणारं न डगमगणारं निडर व्यक्तिमत्त्व.
  तुमच्यातील हातोटी,सचोटी आणि कसोटी या त्रिवेणी विचारांचा वारसा आम्हाला लाभत आलाय सर.

"शिकलो सावरलो आम्ही 
घडलो सुधारलो आम्ही 
सुखी निरोगी राहो तुम्ही 
हिच प्रार्थना करितो आम्ही"

       खरंच एक बॉस म्हणुन नाही तर एक जिवलग मित्राप्रमाणे माझ्यासहीत सगळ्या सहकाऱ्यांना सांभाळून घेतलं. कधी खडसावलो असाल तुम्ही ते ही आमच्या भल्यासाठी. 

    गुरुजी कुठे नकळत चुकलो असेल तर उदार अंतःकरणाने माफ कराल.

ईथुन पुढंच आयुष्य सुखी, समाधानी, आनंदाने जावो व तुमच्या परिवारात
आनंदी आनंद नांदो हिच ईश्वर चरणी प्रार्थना. उतारवयाकडे जाणाऱ्या आयुष्यात येणारे सगळेच सोहळे आनंदाचे जावो. सर्वच मनातल्या इच्छा पूर्ण होवोत.

लिहिण्यासारखं खुप आहे,
थांबतो इथेच.
तुमच्या कर्तृत्वाला अन् नेतृत्वाला माझा मानाचा सलाम.

आपलाच 
संतोष दौलतराव कदम 
शेकापुरकर
________________________

0/Post a Comment/Comments