लोकनेता न्युज नेटवर्क
नांदेड (गोविंद पाटील मोरे) :- आपल्या शेतकरी बापाच्या वाट्याला आलेलं वेदनादायी जगणंं आपल्या तरी वाट्याला येऊ नये म्हणून असंख्य शेतकरी कुटुंबातील विद्यार्थी स्पर्धा परीक्षांची तयारी करत असतात. शासकीय नोकरी मिळवून आनंदाने आयुष्य जगावं अशी त्यांची रास्त अपेक्षा असते. स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये सर्वाधिक विद्यार्थी तुम्हाला शेतकरी पार्श्वभूमी असणारे आढळतील. त्याचं कारण असं आहे मेडिकल, इंजिनिअरिंग असेल किंवा व्यावसायिक शिक्षणासाठीचा खर्च शेतकरी पालकांच्या खिशाला परवडत नाही.
खेड्यापाड्यातून नांदेडसारख्या शहरात येऊन माझ्यासारखे असंख्य विद्यार्थी अभ्यास करतात. प्रामाणिकपणे प्रचंड मेहनत घेतात. सरकारी नोकऱ्यांचे प्रमाण कमी झाले आहे. ज्या काही जागांसाठी भरती होते, तिथे खूप मोठी स्पर्धा आहे. नोकरीची अजिबात शाश्वती नाही. परीक्षा घेण्याच्या बाबतीत, निकालाच्या बाबतीत शासन उदासीन आहे. अशाही परिस्थितीत सकारात्मक राहत हे सगळे विद्यार्थी अभ्यासात सातत्य ठेवून आहेत.
मराठवाड्यात अतिवृष्टीमुळे शेतकरी संकटात सापडलेला आहे. नांदेडमध्ये स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या शेतकरी पुत्रांशी संवाद साधला असता हे सगळे विद्यार्थी प्रचंड निराश दिसून येत आहेत. ज्या पिकांच्या भरवशावर आपल्या शेतकरी बापाने आपल्या शैक्षणिक खर्चाचे नियोजन केलं होतं, ते सगळं कष्टाने पिकवलेलं पीक पाण्यात गेलंय. स्पर्धा परीक्षांची तयारी आपल्याला सोडावी लागेल की काय ही चिंता अनेकांना सतावत आहे. शेतीचं प्रचंड मोठं नुकसान झाल्यामुळे अभ्यासामध्ये मन लागत नसल्याचे अनेकजण सांगत आहेत.
अतिवृष्टीमुळे निर्माण झालेल्या या संकटाच्या परिस्थितीत शासनाने शेतकऱ्यांना भरीव आर्थिक मदत दिलीच पाहिजे, त्याशिवाय शेतकरी कुटुंबातील विद्यार्थ्यांचे सर्व शैक्षणिक क्षुल्क माफ करण्याची नितांत गरज आहे.
------------------------------------------
🪀 सर्व महत्त्वाच्या बातम्या मिळवा WhatsApp वर लोकनेता न्यूज ला जॉईन व्हा व शेअर करायला विसरू नका👉 https://lokneta.in/

Post a Comment