कंधार तालुक्यात उलट सुलट चर्चेला उधाण
लोकनेता न्यूज नेटवर्क
कंधार । धोंडीबा मुंडे :- कंधार तालुक्यातील फुलवळ पासून ५ किलोमीटर अंतरावर असलेल्या दत्त टेकडी समोरील टोल नाक्याजवळ तांदळाने भरलेल्या ट्रक शुक्रवारी दि.१२ सप्टेंबर रोजी पहाटे ५ च्या सुमारास पलटी झाला,सुदैवाने यामध्ये कोणतीही जीवितहानी झाली नाही. या ट्रकमध्ये अंदाजे ५० किलोचे ६२० पोते साध्या पद्धतीने बारदान्यात बांधलेला तांदूळाचे पोते ट्रकमध्ये आढळून आले सदरील माल रेशनचा असल्याची उलट सुलट चर्चेला कंधार तालुक्यात उधाण आले होते. ट्रक पलटी झाल्यानंतर चालक घटनास्थळावरून प्रसार झाल्याचे कळते.
या बाबत घटनास्थळातून मिळालेली माहिती अशी की फुलवळ येथील टोलनाक्यावर अपघाताचा सत्र चालूच आहे,या ठिकाणी अनेक अपघात झाले त्यात अनेकांनी जीव ही गमावला. तेव्हा कोणत्या ना कोणत्या कारणाने येथील टोलनाका हा चर्चेचा विषय ठरलेलाच असतो. त्यातच दि.१२ सप्टेंबर रोज शुक्रवारी पहाटेच्या सुमारास ट्रक गाडी क्रमांक (पी.बी.०४ ए.एफ.८४४८) मध्ये प्रति ५० किलो वजनाचे अंदाजे ६२० पोते तांदूळ भरून कर्नाटक वरून नांदेड मार्गे गोंदियाकडे जात असताना चालकाच्या अनावधानाने ट्रक वरील ताबा सुटल्याने ट्रक पलटी झाला. ट्रक चालक नामे रामेश्वर उर्फ परमेश्वर बालबाल बचावल्याची माहिती घटनास्थळावरून मिळाली.
तांदूळ भरून सदर ट्रक बीदर वरून नांदेडला जात होता असे सांगण्यात येत असले तरी दबक्या आवाजातली चर्चा मात्र काहीशी वेगळीच आहे.
एका राजकीय पुढाऱ्याचा हा माल असून, अनाधिकृत पद्धतीने पळवला जात होता अशी चर्चा ऐकायला मिळत आहे.कारण गाडी पलटी होताच चालक पसार होणे, गाडीतून वाहतूक करत असलेल्या मालाचे कुठलेच कागदोपत्री पुरावे नसणे,ना कोणती खरेदी - विक्रीची पावती,ना बिल त्यामुळे शंकाकुशंकेला वाव मिळत आहे. एवढेच नाही तर गाडी वाहतुकीच्या मार्गाबद्दल ही वेगळीच चर्चा होत आहे.
जर खरच सदरचा ट्रक बीदर वरून निघालेला असेल तर राष्ट्रीय महामार्ग क्र ५० वर ज्या ज्या ठिकाणी टोलनाके आहेत, तेथील सीसीटीव्हीचे फुटेज घेतले तर नक्कीच सत्यता समोर येईल असेही बोलले जात आहे. सदर प्रकरणाची सत्याच्या मार्गाने चौकशी होईल का..? आणि खरच दोषींवर योग्य ती कार्यवाही होईल का..? असे अनेक प्रश्न जनमाणसातून उपस्थित केले जात असून सत्यता समोर येईल का सदर प्रकरण जागेच्या जागी दाबले जाईल असेही बोलले जात आहे.
गुन्हा नोंदविण्यास कंधार तहसील प्रशासनाची दिरंगाई
घटनास्थळी कंधार महसूल विभागाने भेट देऊन पंचनामा केला असल्याचे समजते या घटनेविषयी पुरवठा विभागाचे नायब तहसीलदार व तलाठी यांना तीन ते चार वेळा भ्रमणध्वनीद्वारे संपर्क केला,असता त्यांनी फोन उचलण्यास जाणीवपूर्वक टाळाटाळ केली.तसेच सदरील प्रकरण मोठ्या राजकीय पुढाऱ्याचे असल्यामुळे घटना घडून १२ तास होऊनही कोणत्याही प्रकारची कारवाई केली नसल्याने महसूल प्रशासनाविरुद्ध शंका निर्माण होत आहेत. तसेच कंधार पोलिस ठाण्यात संपर्क साधला असता सदरील घटनेची महसूल प्रशासनाकडून कोणती तक्रार अद्याप आम्हाला मिळाली नसल्यामुळे अजून आम्ही कोणतीही कार्यवाही केली नसल्याचे माहिती पोलीस निरीक्षक चंद्रकांत जाधव यांनी दिली.
________________________
Post a Comment