लातूर :- राजर्षी शाहू महाविद्यालय (स्वायत्त), लातूर व क्विक हिल फाऊंडेशन, पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने “सायबर शिक्षा फॉर सायबर सुरक्षा” हा उपक्रम लातूर जिल्ह्यामध्ये मागील तीन वर्षांपासून राबविला जात आहे. या उपक्रमाअंतर्गत शाळा व महाविद्यालयातील विद्यार्थ्यांसाठी व तसेच शेतकऱ्यांसाठी, शासकीय कार्यालये, बँका, ग्रामपंचायत, महिला बचत गट, दवाखाने, साखर कारखाने, इत्यादी ठिकाणी या कार्यशाळेचे आयोजन केले जात आहे. याचाच भाग म्हणून डॉ. बाबासाहेब आंबेडकर मागासवर्गीय मुलां/मुलींच्या विभागीय वसतिगृहातील विद्यार्थ्यांसाठी सायबर सेक्युरिटी कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते.
या कार्यशाळेत शाहू महाविद्यालयातील बी. एस्सी. सी. एस. तृतीय वर्षातील ‘सायबर वॉरियर्स’ ओमकार सूर्यवंशी व अर्जुन चव्हाण या विद्यार्थ्यांनी माहिती तंत्रज्ञानामुळे सध्या घडत असलेले विविध सायबर गुन्हे जसे की फिशिंग, डिजिटल अरेस्ट, आर्थिक फसवणूक, सोशल मीडियाद्वारे फोटो किंवा वैयक्तिक माहितीचा गैरवापर यांसारख्या सायबर गुन्ह्यांची माहिती विविध उदाहरणे देऊन सांगितले. तसेच, अनोळखी मेसेजेस व लिंक्सवर क्लिक न करणे, वैयक्तिक माहिती शेअर न करणे, आणि अशा गुन्ह्यांची सायबर सेलमध्ये नोंदणी कशी करावी, तसेच 1930 या हेल्पलाईन क्रमांकाबद्दल माहिती दिली.
याप्रसंगी श्री. अविनाश देवसटवार (उपायुक्त, समाज कल्याण, लातूर), श्री. यादव गायकवाड (सहा. आयुक्त, समाज कल्याण, लातूर), श्री. दत्ता बारगिरे (संचालक, विजय अकॅडमी, लातूर), श्री. विलास औटे आणि वसतिगृहातील इतर पदाधिकारी, स्टाफ व विद्यार्थी उपस्थित होते. त्यांनी या उपक्रमाचे कौतुक करून पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या.
________________________
Post a Comment