डहाणूत पंचायत समितीवर हजारो आदिवासींचा घेराव; योग्य दर न दिल्यास महामार्ग रोखण्याचा इशारा


लोकनेता न्युज नेटवर्क

पालघर (सतेंद्र मातेरा) :- डहाणू तालुक्यात आज लाल बावट्यांचा संताप उफाळून आला. मूलभूत अधिकार आणि शेतकऱ्यांच्या न्याय्य मागण्यांसाठी भारताचा मार्क्सवादी लेनिनवादी लाल बावटा पक्षाच्या नेतृत्वाखाली पंचायत समितीवर तुफान सत्याग्रह आंदोलन छेडण्यात आले.

या आंदोलनात हजारो आदिवासी शेतकरी, मजूर आणि कार्यकर्ते सहभागी झाले होते. पंचायत समिती समोर भव्य मोर्चा काढत घोषणाबाजीने संपूर्ण परिसर दणाणून गेला. “आमचा हक्क आम्हालाच हवा!, शेतकऱ्यांच्या घामाला योग्य दर द्या!” अशा घोषणांनी डहाणू शहर लाल झालं.

आंदोलनाचे नेतृत्व तालुका सहसचिव किरण दुबळा, सविता महालोडा आणि रामजी बरड यांनी केले. संपूर्ण लढ्याचे मार्गदर्शन पक्षाचे जिल्हा सहसचिव शेरू वाघ यांनी केले. त्यांनी प्रशासनाला ठणकावून सांगितले की,

> “आदिवासी शेतकऱ्यांच्या गवत-पावलीला योग्य भाव मिळाला नाही, तर राष्ट्रीय महामार्ग ठप्प करून आम्ही राज्य सरकारला उत्तर द्यायला भाग पाडू!”

शिस्तबद्ध पण आक्रमक आंदोलनामुळे पंचायत समिती परिसरात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. आंदोलनकर्त्यांनी विविध मागण्यांचे निवेदन प्रशासनाला सादर केले. मात्र त्यांनी स्पष्ट इशारा दिला की — “मागण्या पूर्ण झाल्याशिवाय आम्ही संघर्ष मागे घेणार नाही.”

या आंदोलनाद्वारे लाल बावटा पक्षाने पुन्हा एकदा आदिवासी आणि शेतकरी वर्गाच्या मूलभूत हक्कांसाठी आपला जाज्वल्य लढाऊ स्वर दाखवला आहे. डहाणूतील हा सत्याग्रह केवळ आर्थिक हक्कांसाठी नव्हे, तर “समान न्याय आणि सन्मानाच्या जीवनासाठी” आदिवासी जनतेचा बुलंद आवाज ठरला आहे.

------------------------------------------

🪀 सर्व महत्त्वाच्या बातम्या मिळवा WhatsApp वर लोकनेता न्यूज ला जॉईन व्हा व शेअर करायला विसरू नका👉 https://lokneta.in/

0/Post a Comment/Comments