🇮🇳 शौर्याचा ८५ वर्षांचा अभिमान – महार रेजिमेंट


लोकनेता न्यूज नेटवर्क 

पुणे (जयदिप बगाडे) :- भारताच्या सैनिकी इतिहासात १ ऑक्टोबर १९४१ हा दिवस सुवर्णाक्षरांनी कोरलेला आहे. कारण याच दिवशी विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या दूरदृष्टीतून, न्यायासाठीच्या संघर्षातून आणि निर्धारातून *महार रेजिमेंट* ची स्थापना झाली. ब्रिटिशांच्या "मार्शल – नॉन मार्शल" या भेदभावी संकल्पनेला छेद देत बाबासाहेबांनी मागास समाजातील लोकांसाठी सैन्यातील दरवाजे खुले केले. हा निर्णय फक्त सैन्याच्या दृष्टीनेच नाही तर सामाजिक समतेच्या दृष्टीनेही एक क्रांतिकारी टप्पा होता.

शौर्याच्या गाथा

स्थापनेनंतर लगेचच दुसऱ्या महायुद्धाच्या रणांगणावर महार रेजिमेंटने आपले शौर्य दाखवले. बर्मा, बलुचिस्तान फ्रंटियरपासून ते पर्शिया पर्यंत रणांगणावर महार जवानांची छाप उमटली. मशीनगन हाताळणारी पहिली भारतीय रेजिमेंट म्हणून त्यांची ओळख झाली. Vickers Gun सारख्या अत्याधुनिक तंत्रज्ञानाला वेगाने आत्मसात करून शत्रूंना पराभूत करणे हे महार रेजिमेंटचे मोठे वैशिष्ट्य ठरले.

मानवतेचे रक्षण

युद्धभूमीवर जशी ही रेजिमेंट पराक्रमी ठरली, तशीच मानवी संवेदनशीलतेतही ती आदर्श ठरली. भारत-पाक फाळणीच्या काळात, जेव्हा देशभरात हाहाकार माजला होता, तेव्हा विस्थापित मुस्लिमांना सुरक्षिततेने पाकिस्तानात पोहोचवण्याचे कार्य महार रेजिमेंटने केले. एवढेच नव्हे तर पाकिस्तानहून परतणाऱ्या हिंदू व शीख बांधवांना सुखरूप भारतात आणण्याची जबाबदारीही तिने निभावली.

स्वातंत्र्योत्तर काळातील पराक्रम

गोवा मुक्ती आंदोलन, चीन युद्ध, १९७१ चे पाकिस्तानविरुद्धचे युद्ध, कारगिल युद्ध अशा सर्व लढायांमध्ये महार रेजिमेंटचे योगदान अविस्मरणीय आहे. प्रत्येक युद्धभूमीवर, प्रत्येक मिलिटरी ऑपरेशनमध्ये महार जवानांनी निर्भीडपणे शौर्य दाखवले.

बाबासाहेबांचे दृष्टीकोन – आजची प्रेरणा

बाबासाहेबांनी फक्त एक रेजिमेंट उभी केली नाही, तर समाजातील शोषित, परिश्रमी आणि निडर लोकांना आत्मसन्मानाचा एक सशक्त प्लॅटफॉर्म दिला. त्या प्लॅटफॉर्मवरून महार रेजिमेंटने आपल्या कर्तृत्वाचा ध्वज जगभर फडकवला.

आजचा दिवस

आज महार रेजिमेंटचा ८५ वा वर्धापन दिन आहे. या निमित्ताने आपण सर्वांनी त्यांच्या शौर्य, त्याग आणि मानवतेच्या कार्याला वंदन केले पाहिजे. महार रेजिमेंट म्हणजे फक्त एक सैनिकी तुकडी नव्हे, तर ती भारताच्या सामाजिक न्यायाची, सैनिकी शौर्याची आणि राष्ट्रप्रेमाची जिवंत परंपरा आहे.

महार रेजिमेंट स्थापना दिन चिरायू होवो.. जय हिंद!!!! 🇮🇳

0/Post a Comment/Comments