लोकनेता न्युज नेटवर्क
पालघर (सतेद्र मातेरा) :- दि. १६ ऑक्टोबर २०२५ दीपावलीच्या पार्श्वभूमीवर स्वयंसहायता गटातील महिलांनी बनवलेल्या पारंपरिक वस्तूंना जिल्हा परिषद पालघर येथे भरघोस प्रतिसाद मिळाला आहे. महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान ‘उमेद’ अंतर्गत उभारण्यात आलेल्या फराळ, दिवे, उटणे आणि सजावटीच्या वस्तूंच्या स्टॉल्सवर पहिल्याच दिवशी तब्बल ३३,००० रुपयांची विक्री झाली.
जिल्हा परिषद पालघरच्या मुख्य प्रवेशद्वारावर हे स्टॉल्स १६ ऑक्टोबरपासून सुरू झाले असून, उद्घाटनाच्या दिवशीच नागरिक, अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. या उपक्रमाला भेट देत जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेच्या प्रकल्प संचालिका डॉ. रूपाली सातपुते यांनी महिला उद्योजिकांशी संवाद साधला आणि त्यांच्या प्रयत्नांचे कौतुक केले.
डॉ. सातपुते म्हणाल्या, “या महिला स्वयंसहायता गटांनी बनवलेल्या वस्तूंमध्ये दर्जा आणि कलात्मकता आहे. अशा उपक्रमांमुळे ग्रामीण भागातील महिलांना आर्थिक सक्षमीकरणाची दिशा मिळते. जिल्हा परिषद अधिकारी आणि कर्मचारी यांनी पुढाकार घेऊन या वस्तू खरेदी कराव्यात, हेच महिलांसाठी खरे प्रोत्साहन ठरेल.”
उमेद अभियानांतर्गत विविध गटांनी पारंपरिक दिवे, सेंद्रिय उटणे, घरगुती फराळ, सजावटीच्या वस्तू आणि पर्यावरणपूरक भेटवस्तू तयार केल्या आहेत. या स्टॉल्सच्या माध्यमातून महिलांना आपली उत्पादने थेट ग्राहकांपर्यंत पोहोचवण्याची संधी मिळत आहे.
डॉ. सातपुते यांनी सांगितले की, “हा उपक्रम १७ ऑक्टोबरपर्यंत जिल्हा परिषदेच्या मुख्य प्रवेशद्वारावर सुरू राहणार आहे. नागरिक, अधिकारी आणि कर्मचारी यांनी भेट देऊन ‘उमेद’च्या महिलांना प्रोत्साहन द्यावे. त्यांच्या प्रयत्नांना आधार मिळाल्यास ग्रामीण अर्थव्यवस्था बळकट होईल.”
या विक्री उपक्रमात महिला गटांच्या आत्मविश्वासात वाढ झाली असून, स्थानिक प्रशासनाकडूनही सकारात्मक प्रतिसाद मिळत आहे. ‘उमेद’ अभियानाच्या माध्यमातून ग्रामीण महिलांचे आत्मनिर्भरतेकडे वाटचाल दृढ होत असल्याचे चित्र या उपक्रमातून स्पष्ट दिसून आले.
------------------------------------------
🪀 सर्व महत्त्वाच्या बातम्या मिळवा WhatsApp वर लोकनेता न्यूज ला जॉईन व्हा व शेअर करायला विसरू नका👉 https://lokneta.in/

Post a Comment