शासन निर्णय होळी आंदोलनात शेतकऱ्यांचा संताप; शासनाला अल्टिमेटम



लोकनेता न्यूज नेटवर्क

जिवती (सय्यद शब्बीर जागीरदार) :- दि. १६ ऑक्टोबर अतिवृष्टी आणि पूरग्रस्त शेतकऱ्यांसाठी राज्य सरकारने ९ आणि १० ऑक्टोबर रोजी जाहीर केलेल्या शासननिर्णयातील अन्यायकारक तरतुदींचा निषेध करत आज शेतकरी संघटनेतर्फे राज्यभरात जिल्हाधिकारी कार्यालयासमोर शासन निर्णय होळी आंदोलन करण्यात आले.

आंदोलनादरम्यान शासननिर्णयाची प्रतीकात्मक होळी करून शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करावा, हेक्टरमागे किमान ५० हजार रुपयांची मदत तत्काळ जाहीर करावी, तसेच ९ व १० ऑक्टोबरच्या फसव्या पॅकेजमध्ये सुधारणा करावी, या मागण्या करण्यात आल्या. चंद्रपूर जिल्ह्यातील गोंडपिपरी तालुक्याला अतिवृष्टी असूनही मदत यादीतून वगळले आणि सातबारा बंद आदेश काढत जिवती तालुक्यातील शेतकऱ्यांना मदतीपासून वंचित ठेवण्यात येत असल्याचा आरोप अॅड. दीपक चटप यांनी केला. विहीर दुरुस्तीची मदत पूर्वी १ लाख रुपये होती. ती मदत आता ३० हजार रुपयांवर आणली आहे. कोरडवाहू व बागायती पिकांसाठी देण्यात येणाऱ्या मदतीत घट आहे. विदर्भासह राज्यातील बहुधारक (३ हेक्टरपेक्षा जास्त शेती असणारा शेतकरी) यांच्यावर मोठा अन्याय झाला असून सरकारचे पॅकेज म्हणजे आकड्यांची हेराफेरी असल्याचे ते म्हणाले.

जिवती तालुक्यात शेकडो शेतकऱ्यांचे सातबारा बंद आदेश सप्टेंबर-ऑक्टोबर महिन्यात तहसीलदार यांनी मनमानीपणे काढले आहे. याबाबत स्थानिक लोकप्रतिनिधी मौन बाळगून आहे. बड्या व्यापाऱ्यांना शेतकऱ्यांच्या जमिनी देण्याचा हा डाव आहे का ? असा सवाल स्वभाप जिल्हाध्यक्ष निळकंठ कोरांगे यांनी केला . तसेच जून ते ऑगष्ट महिन्यात अतिवृष्टीने शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. त्या कालावधीनंतर सातबारा बंद झालेल्या शेतकऱ्यांचेही पंचनामे करू नका असे आदेश देणाऱ्या जिवती तहसीलदार रूपाली मोगरकर यांचा देखील शेतकऱ्यांनी निषेध नोंदविला. त्या संदर्भात फेरविचार करण्याची मागणी देखील केली. प्रशासन व शासन शेतकरी प्रश्नांविषयी संवेदनशील न झाल्यास आगामी काळात परिस्थिती आणखी बिकट होईल असे मत शेतकरी संघटनेचे नेते दिलीप देठे यांनी व्यक्त केले. 

या आंदोलनात माजी आमदार ॲड. वामनराव चटप यांच्या मार्गदर्शनात शेतकरी संघटना युवा आघाडी प्रदेशाध्यक्ष ॲड. दीपक चटप, माजी समाजकल्याण सभापती निळकंठ कोरांगे, अॅड. प्रफुल आस्वले, सुनील बावणे,शालिकराव माऊलीकर,अनुप कुटेमाटे, शेषराव बोंडे, दिलीप देठे, शब्बीर जागीरदार, नरसिंग हामणे,भाऊजी कन्नाके, विनायक महाकुलकर,गणेश कदम,मारोती बोथले,कपिल इद्दे, रामकृष्ण सांगळे, नरेंद्र मोहारे,अनिल आत्राम, मदन सातपुते, भारत खामणकर, मधुकर चिंचोलकर,मंगेश मोरे,प्रभाकर मोरे,सुरेश आस्वले,सूरज भस्की, गोवर्धन आत्राम, मनोज कोपावार, सूरज गव्हाणे, वैभव अडवे,उत्पल गोरे,वैभव कोरडे,सौरभ मादासवार आदींसह मोठ्या संख्येने शेतकरी उपस्थित होते.

------------------------------------------

🪀 सर्व महत्त्वाच्या बातम्या मिळवा WhatsApp वर लोकनेता न्यूज ला जॉईन व्हा व शेअर करायला विसरू नका👉 https://lokneta.in/

0/Post a Comment/Comments