लोकनेता न्यूज नेटवर्क
पालघर (सतेंद्र मातेरा) :- पालघर मधील डहाणू तालुक्यातील दाभाडी हटिचामाळ येथे एक हृदयद्रावक घटना घडली असून, येथील रहिवासी अलका कासम भावर (वय अंदाजे ९ वर्षे) या चौथीतील विद्यार्थिनीचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. ही घटना २१ ऑक्टोबर २०२५ रोजी सायंकाळी साडेचार वाजता चळणी परिसरातील नदीकाठी घडली.
मिळालेल्या माहितीनुसार, अलका हिचे शिक्षण अरविंद आश्रम शाळा, दादडे येथे सुरू होते. शाळा सुटल्यानंतर ती इतर मुलांसह चळणी नदीकाठी गेली असता, पाण्याचा प्रवाह अचानक वाढल्याने ती नदीत वाहून गेली. उपस्थितांनी तिला वाचवण्याचा आटोकाट प्रयत्न केला, मात्र तो निष्फळ ठरला.
स्थानिक शिक्षक रविंद्र गिंभल सर आणि ग्रामस्थांनी तातडीने तिला बाहेर काढून प्राथमिक आरोग्य केंद्र, सायवन येथे नेले. मात्र डॉक्टरांनी तपासणी करून अलका मृत असल्याचे घोषित केले.
यानंतर पोस्टमॉर्टेमसाठी कासा हॉस्पिटल येथे मृतदेह हलवण्याची तयारी सुरू करण्यात आली. परंतु या प्रक्रियेत शववाहिनी (ॲम्बुलन्स) उपलब्ध करून देण्यास संबंधित आरोग्य अधिकाऱ्यांनी टाळाटाळ केल्याने वातावरण तणावपूर्ण झाले.
ही परिस्थिती लक्षात घेता, आमदार विनोद निकोले यांनी स्वतः घटनास्थळावर हस्तक्षेप केला. रात्रीच्या सुमारास मुसळधार पावसात त्यांनी सायवन उपकेंद्रात धाव घेतली आणि डॉक्टरांशी प्रत्यक्ष चर्चा करून तातडीने ॲम्बुलन्सची व्यवस्था केली. तसेच त्यांनी डहाणू तहसीलदार सुनील कोळी यांच्याशी संपर्क साधून पंचनामा त्वरित करण्याच्या सूचना दिल्या.
आमदार निकोले यांनी मृत अलका भावरच्या कुटुंबीयांशी संवाद साधून शोक व्यक्त केला आणि शासनामार्फत आर्थिक मदत मिळावी यासाठी संबंधित विभागांशी चर्चा करून आवश्यक सहकार्य करण्याचे आश्वासन दिले.
या घटनेने दाभाडी व परिसरात हळहळ व्यक्त होत असून, अरविंद आश्रम शाळेतील शिक्षक व विद्यार्थी शोकमग्न झाले आहेत. यावेळी चळणी ग्रामपंचायतीच्या सरपंच सरीता भोये, शिक्षक, पालक व अनेक ग्रामस्थ उपस्थित होते.
अलका भावरच्या निधनाने संपूर्ण परिसरात शोककळा पसरली असून, लहान वयात हरपलेले हे कोवळे जीवन सर्वांच्या मनाला चटका लावणारे ठरले आहे.
------------------------------------------
🪀 सर्व महत्त्वाच्या बातम्या मिळवा WhatsApp वर लोकनेता न्यूज ला जॉईन व्हा व शेअर करायला विसरू नका👉 https://lokneta.in/

Post a Comment