लोकनेता न्युज नेटवर्क
निलंगा (इस्माईल शेख) :- महाराष्ट्र राज्य बियाणे महामंडळ (महाबीज), अकोला यांच्याकडून अनुदानावरील बियाण्याचा पुरवठा अद्यापपर्यंत लातूर जिल्ह्यात झाला नाही. ऑक्टोबर महिना संपत आला असताना, निलंगा तालुक्यासह जिल्ह्यातील शेतकऱ्यांना रब्बी हंगामासाठी आवश्यक बियाण्याची प्रतीक्षा लागली आहे. शेतकऱ्यांनी निलंग्यातील महाबीज डीलरांकडे बियाण्याची चौकशी केली असता, “अनुदानावरील बियाणे अद्याप आलेले नाही, आल्यानंतर देऊ” असे उत्तर मिळाले. मात्र दुकानदारांनी दुकानात अनुदानावरील बियाण्याचे दरपत्रक लावलेले दिसते, त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये गोंधळ आणि नाराजी निर्माण झाली आहे. तालुक्यात सध्या महाबीजचे एकूण सहा डीलर कार्यरत आहेत — पाच खाजगी व एक सहकारी. तरीही कोणत्याही डीलरकडे प्रत्यक्ष बियाण्याचा साठा उपलब्ध नाही. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये “दरपत्रक आहे पण बियाणे नाहीत” अशी टीका सुरू आहे.
रब्बी हंगाम धोक्यात:-
कृषी विद्यापीठ व कृषी खात्याच्या शिफारसीनुसार हरभरा, ज्वारी, करडई यांसारख्या रब्बी पिकांची पेरणी १५ ऑक्टोबरपूर्वी व्हावी अशी सूचना आहे. पण बियाणे उपलब्ध नसल्यामुळे अनेक शेतकऱ्यांची पेरणी उशिरा सुरू आहे. अतिवृष्टी आणि खरीपातील नुकसानीनंतर शेतकऱ्यांचा पूर्ण आधार आता रब्बी हंगामावर आहे. महाबीजचे बियाणे विश्वसनीय असल्यामुळे त्याचीच मागणी जास्त आहे, पण कंपनीचा पुरवठा न झाल्याने शेतकऱ्यांना खाजगी कंपनींचे बियाणे अधिक किमतीत विकत घ्यावे लागत आहेत.
शेतकऱ्यांचा रोष वाढतोय:-
“महाबीजकडून बियाणे आले नाही, पण दरपत्रक लावले आहे हे शेतकऱ्यांची दिशाभूल करणारे आहे,” असे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. डीलरांना शेतकऱ्यांच्या रोषाला सामोरे जावे लागत आहे. दिवसेंदिवस तापमान वाढत असून ओल कमी होत आहे, त्यामुळे शेतकरी घाईघाईत पेरणी करत आहेत. परंतु बियाणे उपलब्ध न झाल्याने त्यांची हतबल अवस्था निर्माण झाली आहे.
शासनाने तात्काळ हस्तक्षेप करावा:-
शेतकरी वर्गातून मागणी होत आहे की, शासनाने तातडीने या प्रकरणाची दखल घेऊन महाबीजकडून अनुदानावरील बियाण्यांचा पुरवठा तात्काळ सुरू करावा, जेणेकरून आर्थिक संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांचा रब्बी हंगाम वाया जाणार नाही.
------------------------------------------
🪀 सर्व महत्त्वाच्या बातम्या मिळवा WhatsApp वर लोकनेता न्यूज ला जॉईन व्हा व शेअर करायला विसरू नका👉 https://lokneta.in/

Post a Comment