लोकनेता न्युज नेटवर्क
पालघर (सतेंद्र मातेरा) :- दि. १६ ऑक्टोबर २०२५ पालघर मधील तलासरी तालुक्यातील लोकप्रिय पर्यटन स्थळ असलेल्या धरण परिसराला अखेर पुन्हा एकदा पर्यटकांसाठी खुलं करण्यात आलं आहे. काही दिवसांपूर्वी सुरक्षा आणि देखभाल कारणास्तव प्रशासनाने धरण परिसरातील प्रवेश बंद केला होता. मात्र आज दिनांक १६ ऑक्टोबर रोजी डहाणू विधानसभा क्षेत्राचे आमदार विनोद निकोले यांनी धरण परिसराची पाहणी करून अधिकाऱ्यांसोबत चर्चा घेतली. या चर्चेनंतर अधिकाऱ्यांनी तत्काळ पर्यटकांना पुन्हा प्रवेश देण्याचे आदेश दिल्याने परिसर पुन्हा खुला झाला.
आमदार निकोले यांनी पाहणीदरम्यान धरण परिसरातील नैसर्गिक सौंदर्य, पर्यावरणीय समतोल आणि पर्यटनाच्या दृष्टीने असलेल्या संभाव्यतेचा आढावा घेतला. त्यांनी सांगितले की, “तलासरी तालुक्यात पर्यटनवृद्धीसाठी आणि स्थानिक रोजगारनिर्मितीसाठी धरण परिसराचे सुशोभीकरण, तसेच बोटिंगसारख्या सुविधांचा विकास गरजेचा आहे.” यासाठी त्यांनी संबंधित विभागाला बोटिंग सुविधा आणि सुशोभीकरणाचा सविस्तर प्रस्ताव तयार करून मंजुरीसाठी पाठविण्याचे निर्देश दिले आहेत.
आमदार निकोले म्हणाले, “या उपक्रमामुळे स्थानिक तरुणांना रोजगाराच्या नव्या संधी उपलब्ध होतील. तसेच तलासरीच्या नैसर्गिक सौंदर्याचा लाभ घेत स्थानिक अर्थव्यवस्थेलाही चालना मिळेल.”
या पाहणीदरम्यान माजी उपसभापती नंदकुमार हाडळ, उपसरपंच मारिया वाडू, ग्रामपंचायत सदस्य, अधिकारी तसेच परिसरातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. धरण विभागाच्या अधिकाऱ्यांनी आमदारांना परिसरातील देखभाल, सुरक्षाव्यवस्था व भविष्यातील विकास आराखड्याची सविस्तर माहिती दिली.
स्थानिक नागरिकांनी आमदार निकोले यांच्या या पुढाकाराचे स्वागत करत समाधान व्यक्त केले. “धरण परिसर पुन्हा खुला झाल्याने स्थानिक नागरिक आणि पर्यटक दोघांनाही मोठा दिलासा मिळाला आहे. बोटिंग सुरू झाल्यास डहाणू तलासरी पर्यटनाला नवी ओळख मिळेल,” असे नागरिकांनी सांगितले.
या निर्णयामुळे तलासरी तालुक्यातील पर्यटनविकासाला नवा आयाम मिळण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.
------------------------------------------
🪀 सर्व महत्त्वाच्या बातम्या मिळवा WhatsApp वर लोकनेता न्यूज ला जॉईन व्हा व शेअर करायला विसरू नका👉 https://lokneta.in/

Post a Comment