पालघर गोठणपूर गावदेवाची विटंबना : आदिवासी समाजात तीव्र संताप, आरोपींवर कठोर कारवाईची मागणी



[ गावदेव मंदिरातील लाद्या तोडून मूर्तींची विटंबना; वडाचे झाड तोडून गावदेव परंपरेचा अवमान — आरोपींना तात्काळ अटक न झाल्यास आदिवासी एकता परिषदेचा रास्ता रोकोचा इशारा ]

लोकनेता न्यूज नेटवर्क

पालघर (सतेंद्र मातेरा) :- पालघर तालुक्यातील गोठणपूर येथे गावदेवाच्या मंदिरात झालेल्या विटंबनेच्या घटनेनंतर आदिवासी समाजामध्ये प्रचंड संताप व्यक्त केला जात आहे. आदिवासी एकता परिषदेच्या शिष्टमंडळाने, स्थानिक गावकऱ्यांसह, घटनास्थळी भेट देऊन तपासणी केल्यानंतर धक्कादायक बाबी उघडकीस आल्या आहेत.

शिष्टमंडळाच्या माहितीनुसार, गावदेव मंदिरातील लाद्या तोडण्यात आल्या असून गेल्या वर्षी गावदेवाच्या स्थानी असलेले मोठे वडाचे झाडही तोडण्यात आले आहे. या झाडावर दरवर्षी गावदेवाचा झेंडा रोवण्याची परंपरा होती. एवढ्यावरच न थांबता काही अज्ञात व्यक्तींनी गावदेवातील वाघ्या व अन्य देवतांच्या मूर्तींवर पारई आणि हातोड्याने प्रहार करून त्यांची डोळे काढून टाकल्याचे निदर्शनास आले आहे.

ही घटना अत्यंत गंभीर असून ती केवळ देवस्थानाची नव्हे, तर आदिवासी समाजाच्या श्रद्धेची विटंबना असल्याचे आदिवासी एकता परिषदेकडून सांगण्यात आले आहे. “आपल्या देवांचा हा अपमान आम्ही खपवून घेणार नाही,” असे मत आदिवासी एकता परिषदेचे प्रतिनिधी डॉ. सुनील पऱ्हाड यांनी व्यक्त केले.

२० ऑक्टोबर २०२५ रोजी, सोमवार दुपारी ३:१५ वाजता, पालघर रेल्वे स्टेशनसमोरील DySP कार्यालयात आदिवासी एकता परिषदेच्या प्रतिनिधीमंडळाने भेट देऊन घटनेचा तपशीलवार अहवाल सादर केला. या घटनेत संबंधित आरोपींवर अत्याचार प्रतिबंधक कायद्यानुसार (Atrocity Act) गुन्हा नोंदवून तात्काळ अटक करण्यात यावी, अशी मागणी परिषदेकडून करण्यात आली.

दरम्यान, सोमवारी सर्व आदिवासी बांधवांनी पालघर पोलिस स्टेशन येथे मोठ्या संख्येने उपस्थित राहून आपल्या देवांच्या विटंबनेविरुद्ध सुरू असलेल्या लढ्यात सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले होते.

सदर प्रकरणी पालघर नगर परिषदेचे नगरसेवक दिनेश पांडुरंग बाबर यांनी जिल्हाधिकारी व जिल्हा पोलीस अधीक्षक यांना लेखी पत्र देऊन त्वरीत कारवाईची मागणी केली असली, तरी अद्याप कोणतीही ठोस कारवाई झालेली नाही.

स्थानिक समाजात या घटनेनंतर प्रचंड अस्वस्थता निर्माण झाली असून, प्रशासनाने त्वरित कठोर कारवाई न केल्यास अशा घटना इतर गावांमध्येही घडू शकतात, अशी भीती व्यक्त केली जात आहे. त्याचबरोबर आरोपींवर कारवाई न झाल्यास सात दिवसांच्या आत रस्त्यावर उतरून ‘रास्ता रोको’ आंदोलन छेडले जाईल, असा इशारा डॉ. सुनील पऱ्हाड यांनी दिला आहे.

------------------------------------------

🪀 सर्व महत्त्वाच्या बातम्या मिळवा WhatsApp वर लोकनेता न्यूज ला जॉईन व्हा व शेअर करायला विसरू नका👉 https://lokneta.in/

0/Post a Comment/Comments