लोकनेता न्यूज नेटवर्क
पालघर सतेंद्र मातेरा) :- दिवाळीच्या सणासुदीत जेव्हा सर्वत्र आनंद, उत्साह आणि रोषणाईचे वातावरण आहे, त्याच काळात पालघर मधील डहाणू तालुक्यातील गोवणे गावातील सामाजिक कार्यकर्ता विलास सुमडा आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी एक वेगळा आणि हृदयस्पर्शी उपक्रम राबवला.
नरक चतुर्दशीच्या दिवशी विलास सुमडा आणि त्यांच्या टीमने वणई, चंद्रनगर, दाभले आणि गोवणे या गावांमधील अपंग, निराधार, विधवा, वृद्ध तसेच दाभले गावातील सर्पदंशाने मृत झालेल्या चिमुकलीच्या कुटुंबाला आणि बोटीत काम करत असताना मृत्यू झालेल्या मजुराच्या कुटुंबाला जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करून दिवाळीचा आनंद वाटला.
या उपक्रमाअंतर्गत गरजू कुटुंबांना तांदूळ, गहू, डाळ, साखर, साबण, बिस्कीट आणि कपडे अशा दैनंदिन जीवनातील आवश्यक वस्तूंचे वाटप करण्यात आले. या माध्यमातून सणासुदीच्या काळात ज्यांना आधाराची गरज आहे, अशा कुटुंबांना मदतीचा हात देण्याचा प्रयत्न करण्यात आला.
वाटपावेळी लाभार्थ्यांच्या चेहऱ्यावर उमटलेला आनंद पाहून कार्यकर्त्यांनाही समाधान लाभले. “हा आनंदच आमच्यासाठी खरी दिवाळी आहे,” असे विलास सुमडा यांनी सांगितले.
या सामाजिक उपक्रमात नवश्या काटेला, हर्षला सुमडा, सुनीता घोडा, नितीन धडपा आणि विकास करमोडा या सामाजिक कार्यकर्त्यांनी हातभार लावून सहकार्य केले. सर्वांनी मिळून गावोगाव फिरून लाभार्थ्यांच्या घरी भेट देत वस्तूंचे वाटप केले.
या कार्यकर्त्यांच्या समाजहितैषी भूमिकेचे कौतुक करत गावकऱ्यांनी त्यांचे उत्स्फूर्त स्वागत केले आणि मनःपूर्वक आभार प्रदर्शन केले.
या उपक्रमाद्वारे विलास सुमडा व त्यांच्या सहकाऱ्यांनी दाखवून दिले की दिवाळी फक्त फटाक्यांची किंवा प्रकाशाची नसून मानवतेच्या आणि सहानुभूतीच्या प्रकाशाची असते. समाजातील वंचित घटकांसाठी हात पुढे करून त्यांनी दिवाळीचा खरा अर्थ जपला.
------------------------------------------
🪀 सर्व महत्त्वाच्या बातम्या मिळवा WhatsApp वर लोकनेता न्यूज ला जॉईन व्हा व शेअर करायला विसरू नका👉 https://lokneta.in/


Post a Comment