लोकनेता न्युज नेटवर्क
पालघर (सतेद्र मातेरा) :- क्रांतिसूर्य भगवान बिरसा मुंडा यांच्या १५० व्या जयंती महोत्सवाच्या निमित्ताने राष्ट्रीय जनजाती गौरव सप्ताह भव्य प्रमाणात साजरा करण्यासाठी नियोजन बैठकीचे आयोजन गुरुवार, दिनांक १६ ऑक्टोबर रोजी पालघर मधील मनोर येथील बिरसायत भवन येथे करण्यात आले. या बैठकीत आदिवासी समाजातील महिला व पुरुष कार्यकर्त्यांचा मोठ्या संख्येने सहभाग होता.
भारत सरकारने १५ नोव्हेंबर हा दिवस राष्ट्रीय जनजाती गौरव दिवस म्हणून घोषित केला असून, दरवर्षीप्रमाणे यंदाही मनोर येथे हा दिवस विविध सांस्कृतिक, वैचारिक आणि सामाजिक कार्यक्रमांच्या माध्यमातून उत्साहात साजरा होणार आहे. मात्र या वर्षीचे औचित्य विशेष ठरणार आहे, कारण बिरसा मुंडा यांच्या जयंतीचे हे १५० वे वर्ष आहे.
जिल्हास्तरावर साजरा होणाऱ्या या जयंती महोत्सव सप्ताहात आदिवासी परंपरा, संस्कृती आणि इतिहासाचे दर्शन घडविणारे विविध उपक्रम, जनजागृती रॅली, आदिवासी कलावंतांचे सादरीकरण, विचारगोष्टी, नृत्यस्पर्धा आणि समाजएकतेचा संदेश देणारे कार्यक्रम आयोजित करण्यात येणार आहेत.
या बैठकीत कार्यक्रमाचे स्वरूप, जबाबदाऱ्या, तसेच आयोजनासाठी लागणारी तयारी यावर सविस्तर चर्चा करण्यात आली. बैठकीदरम्यान कार्यकर्त्यांनी एकमुखाने “बिरसा मुंडा अमर रहे” आणि “जय आदिवासी, जय भारत” अशा घोषणांनी सभागृह दणाणून टाकले.
मनोर येथे होणारा हा भव्य महोत्सव केवळ आदिवासी समाजापुरता मर्यादित न राहता, संपूर्ण जिल्ह्याच्या जनतेसाठी प्रेरणादायी ठरणार आहे, असा विश्वास आयोजकांनी व्यक्त केला.
------------------------------------------
🪀 सर्व महत्त्वाच्या बातम्या मिळवा WhatsApp वर लोकनेता न्यूज ला जॉईन व्हा व शेअर करायला विसरू नका👉 https://lokneta.in/

Post a Comment