लोकनेता न्यूज नेटवर्क
अर्धापूर (संदीप कदम) :- मागील काही दिवसांपासून सातत्याने होत असलेली हळदीच्या दरातील घसरण अखेर थांबली आहे. बाजारात पुन्हा तेजीचे संकेत दिसत असून, शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर समाधान झळकत आहे.वाशिम आणि रिसोड कृषी उत्पन्न बाजार समित्यांमध्ये हळदीच्या दरात तब्बल हजार रुपयांपर्यंतची वाढ नोंदविण्यात आली आहे.रिसोड कृषी उत्पन्न बाजार समितीत सोमवारी हळदीला कमाल १३ हजार १०० रुपये प्रति क्विंटल दर मिळाला. यावेळी कांडी हळद ११ हजार ते १३ हजार १०० रुपये, तर गहू हळद १० हजार ८०० ते १२ हजार २०० रुपये प्रति क्विंटल या दरम्यान विकली गेली. या वाढत्या दरांमुळे शेतकऱ्यांमध्ये पुन्हा एकदा उत्साहाचे वातावरण आहे.दरम्यान, वाशिम कृषी उत्पन्न बाजार समितीत मागील शुक्रवारी हळदीला कमाल १२ हजार ५०१ रुपये प्रति क्विंटल इतका दर मिळाला होता. म्हणजेच, अवघ्या तीन दिवसांत हळदीच्या दरात ५०० रुपयांची वाढ नोंदवली गेली आहे.शेतकऱ्यांच्या म्हणण्यानुसार, मागील महिन्याभरात हळदीचे दर कमी झाल्याने तोटा होत होता. मात्र, सध्याची दरवाढ शेतकऱ्यांना दिलासा देणारी ठरत आहे. यामुळे येत्या काळात शेतकरी हळदीच्या लागवडीकडे पुन्हा आकर्षित होतील, असा अंदाज व्यक्त केला जात आहे.
व्यापाऱ्यांच्या मते, देशभरातील बाजारात हळदीची मागणी वाढू लागल्याने आणि सणासुदीच्या काळात वापर वाढत असल्याने दर वाढीचा कल दिसत आहे. शिवाय, काही भागांत उत्पादनात घट झाल्याने पुरवठा कमी पडत आहे, हेही दरवाढीचे एक कारण मानले जात आहे.
------------------------------------------
🪀 सर्व महत्त्वाच्या बातम्या मिळवा WhatsApp वर लोकनेता न्यूज ला जॉईन व्हा व शेअर करायला विसरू नका👉 https://lokneta.in/

Post a Comment