शेकडो कार्यकर्त्यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात पक्षप्रवेश.


लोकनेता न्युज नेटवर्क

पालघर (सतेंद्र मातेरा) :- “पालघर जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष संपायला नव्हे, तर वाढायला लागलाय. जिल्ह्यात आमदार नसताना देखील पक्षाची संघटना मजबूत झाली आहे, हेच आमच्या कार्यकर्त्यांचे बळ आहे. आपण घड्याळाचे उमेदवार आहोत, त्यामुळे वेळ पाळणे आपले बंधन आहे. अजित दादा दिलेला शब्द नेहमी पाळतात; तेच खरे ‘दादा’ आहेत, आणि त्यांच्यासारखे कोणी होऊ शकत नाही,” असे प्रतिपादन अन्न व औषध प्रशासन मंत्री व पालघर संपर्कमंत्री नरहरी झिरवाळ यांनी केले.

ते डहाणू येथील दशश्री माळी हॉलमध्ये शुक्रवारी पार पडलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या पालघर जिल्हा कार्यकर्ता मेळाव्यात प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते.

मंत्री झिरवाळ म्हणाले, “आदिवासी व मागासवर्गीय विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्ती दुप्पट करताना अजित दादांनी सर्वच वर्गातील विद्यार्थ्यांना त्याचा लाभ देण्याचा निर्णय घेतला. हा त्यांचा न्याय्य आणि संवेदनशील दृष्टिकोन दाखवतो. विरोधक ‘लाडकी बहिण योजना’ बंद होईल असे म्हणतात, पण जोपर्यंत दादा आहेत, तोपर्यंत ती योजना बंद होणार नाही. दादांचे पालघर जिल्ह्यावर विशेष प्रेम असून, म्हणूनच मला या जिल्ह्याचा संपर्कमंत्री नेमण्यात आले आहे.”

त्यांनी पुढे सांगितले की, “अवकाळी पावसामुळे आमदार दौलत दरोडा उपस्थित राहू शकले नाहीत, पण ते जिल्ह्यातील संघटनेबाबत तितकेच जागरूक आहेत.”

या मेळाव्यात झिरवाळ यांच्या उपस्थितीत जिल्ह्यातील शेकडो कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला.

प्रमुख प्रवेशकर्त्यांमध्ये यतीन नम, प्रसाद पाटील, हेमंत धनमेहेर यांसह अनेक कार्यकर्त्यांचा समावेश होता. या प्रवेशामुळे जिल्ह्यातील पक्ष संघटनेला नवचैतन्य प्राप्त झाले आहे.

जिल्हाध्यक्ष आनंदभाई ठाकूर यांनी आपल्या भाषणात सांगितले की,

“पालघर, डहाणू, विक्रमगड आणि वाडा हे राष्ट्रवादी काँग्रेसचे बालेकिल्ले आहेत. पक्षाने शंकर नाम, कृष्णा घोडा यांसारखे नेतृत्व दिले आहे. त्यामुळे मित्रपक्षांनी आम्हाला गृहीत धरू नये. जिल्ह्याला आमदार नाही म्हणून आम्ही हातावर हात धरून बसलेलो नाही; सत्ता नसली तरी सत्तेचे वाटेकरी आहोत.”

त्यांनी स्पष्ट केले की, “आघाडीत संघटनेचे नुकसान झाले, तेच युतीत होऊ नये यासाठी वरिष्ठ नेतृत्वाने विशेष लक्ष द्यावे.”

वसई–विरार जिल्हाध्यक्ष राजाराम मुळीक यांनीही मेळाव्यात बोलताना सांगितले,

“जिल्ह्यात आमदार नसल्याने नेतृत्वाचे दुर्लक्ष झाले. मित्रपक्षांनी आमचा वापर करून घेतला आणि जबाबदारी आल्यावर त्यांची भाषा बदलली. मात्र आता आम्ही नव्या जोमाने संघटन उभी करणार आहोत.”

महिला जिल्हाध्यक्षा रोहिणी शेलार यांनी सांगितले की, “जिल्ह्यात महिलांचा मोठ्या प्रमाणावर सहभाग वाढत आहे. अनेक विकासकामे राष्ट्रवादी काँग्रेसच्या माध्यमातून यशस्वीरीत्या राबविली गेली आहेत.”

या मेळाव्यात करण ठाकूर, सतीश वैद्य, जयेश शेलार, विपुल राऊत, स्वाती राऊत, शैलेश करमोडा, संतोष मराठे, जितेंद्र पटेल, हरेश मुकणे, पांडुरंग बेलकर, जाधव सर, विलास सुमडा, रवींद्र संखे, सुजय वडे, अजित संखे, मुक्ताताई भोसले, भाऊ साबळे आदी मान्यवर उपस्थित होते.

डहाणू, तलासरी, वाडा, पालघर, जव्हार आणि मोखाडा तालुक्यांमधून कार्यकर्त्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.

मेळाव्यातून स्पष्टपणे दिसून आले की पालघर जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची संघटना नव्या जोमाने पुढे जात आहे. अजित दादांच्या नेतृत्वाखाली पक्ष पुन्हा एकदा जनतेच्या मनात स्थान मिळवेल, असा विश्वास कार्यकर्त्यांनी व्यक्त केला.

------------------------------------------

🪀 सर्व महत्त्वाच्या बातम्या मिळवा WhatsApp वर लोकनेता न्यूज ला जॉईन व्हा व शेअर करायला विसरू नका👉 https://lokneta.in/

0/Post a Comment/Comments