लोकनेता न्युज नेटवर्क
पालघर (सतेंद्र मातेरा) :- पालघर जिल्ह्यातील अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असून, या संकटग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने आर्थिक मदत द्यावी, अशी ठाम मागणी बोईसर विधानसभा मतदारसंघाचे आमदार विलास तरे यांनी केली आहे. त्यांनी अपर जिल्हाधिकारी तथा अपर जिल्हा दंडाधिकारी भाऊसाहेब फटांगरे यांना लेखी निवेदन देऊन हा मुद्दा जोरदारपणे मांडला. यावेळी शिवसेना (एकनाथ शिंदे गट) चे पालघर जिल्हा प्रमुख वसंत चव्हाण यांच्यासह पक्षाचे अन्य पदाधिकारी उपस्थित होते.
आमदार तरे म्हणाले की, पालघर जिल्हा हा आदिवासी बहुल आणि शेतीप्रधान जिल्हा असून, बहुतेक शेतकरी वर्गाचा प्रमुख उदरनिर्वाहाचा स्रोत म्हणजे भात शेती आहे. या भागातील शेती पूर्णपणे पावसावर अवलंबून आहे. मात्र यावर्षी ऑक्टोबर महिन्यात झालेल्या अवकाळी पावसाने भात पिकाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान केले आहे.
भाताच्या कापणीच्या हंगामातच झालेल्या मुसळधार पावसामुळे अनेक ठिकाणी पिके आडवी झाली, पाण्याखाली गेली, तर काही ठिकाणी रोपे सडली आहेत. तसेच फळबाग, फुलबाग आणि भाजीपाला पिकांवरही गंभीर परिणाम झाला आहे. परिणामी शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका बसला आहे.
आमदार तरे यांनी सांगितले की, “अनेक शेतकऱ्यांनी बियाणे, खत आणि मजुरीसाठी कर्ज घेतलेले आहे, मात्र पिकांचे नुकसान झाल्याने त्यांच्यावर आर्थिक संकट कोसळले आहे. अशा परिस्थितीत शासनाने तात्काळ महसूल व कृषी विभागामार्फत पंचनामे करून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना नैसर्गिक आपत्ती अनुदान योजनेतून आर्थिक मदत द्यावी.”
या प्रसंगी जिल्हा कृषी अधिकारी निलेश भागेश्वर, निवासी उप जिल्हाधिकारी सुभाष भागडे, उप जिल्हाधिकारी महेश सागर, तसेच शिवसेना जिल्हा प्रमुख वसंत चव्हाण उपस्थित होते.
आमदार विलास तरे यांच्या या निवेदनामुळे शेतकऱ्यांमध्ये शासनाने मदतीच्या निर्णयाची लवकरात लवकर अंमलबजावणी करावी, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
------------------------------------------
🪀 सर्व महत्त्वाच्या बातम्या मिळवा WhatsApp वर लोकनेता न्यूज ला जॉईन व्हा व शेअर करायला विसरू नका👉 https://lokneta.in/


Post a Comment