लोकनेता न्युज नेटवर्क
एरंडोल (प्रतिनिधी) :- शरीराला अन्नपाणी जसे गरजेचे असते त्याचप्रमाणे मन सक्षमतेसाठी वाचन आवश्यक असते.वाचनाने ज्ञानात भर तर पडतेच पण स्वतःचे जग आणि जगणे तो सुंदर करू शकतो.व्यक्तिमत्व विकासात वाचनाचे महत्व अनन्यसाधारण असून वाचनाची श्रीमंती भौतिक श्रीमंतीच्या तुलनेत केव्हाही अक्षर ठरते.असे मत प्रतिपादन एरंडोल नगर वाचनालयाचे कार्याध्यक्ष कवी प्रा.वा.ना.आंधळे यांनी काल दि.१५ ऑक्टोबर २०२५ रोजी एरंडोल नगर वाचनालय आयोजित वाचन प्रेरणा दियानिमित्त उपस्थितांसमोर केले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी वाचनालयाचे अध्यक्ष जगदीश ठाकूर होते.त्यांनीच कार्यक्रमाच्या आयोजनासंदर्भाचा विचार मांडीत प्रास्ताविक केले.
याप्रसंगी वाचनालयाचे गेल्या पन्नास वर्षांपासून सभासद असणाऱ्या अशा नियमित वाचकांचा सत्कार करण्यात आला.त्यात वैद्यकीय क्षेत्रातील नामवंत डॉ.के.ए. बोहरी, माजी नगर सेवक सुरेश खुरे,बालाजी उद्योग समुहाचे प्रमुख दिनेशजी काबरा,डॉ.सुहास अग्निहोत्री,शरद चौधरी,दगडू सोनार,प्रेमसिंग ठाकूर,मधुकर रोकडे,नरेंद्र पाटील,तुकाराम कुडोळ, योगेश महाले याना शाल पुस्तक व पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला.
वाचनालयाचे अध्यक्ष जगदीश ठाकूर यांनी वाचन संस्कृती ही समाज व राष्ट्रहितासाठी किती आवश्यक आहे असे सांगत आज रोजी वाचनालयात भरवलेल्या पुस्तक प्रदर्शनासह वाचनालयाच्या माध्यमातून असे विविध अभिनव उपक्रम वर्षभरात घेऊन वाचनाभिरुची वाढीस लावू हा विश्वास व्यक्त केला.तर चिटणीस रविंद्र लाळगे सर यांनी डॉ.अब्दुल कलाम यांच्या समृद्ध वाचनावर भाष्य करीत वाचनाचे महत्व विशद केले.सत्काराला उत्तर देतांना सत्कारार्थी डॉ.बोहरी यांनी मी माणूस म्हणून जे घडलो ते केवळ वाचनाभिरुचिमुळे असे सांगत मी पन्नास वर्षात हजारो पुस्तके वाचून झाल्याचे समाधान त्यांनी व्यक्त केले.
कार्यक्रमाचे संचलन कवी पत्रकार तथा वाचनालयाचे संचालक प्रवीण महाजन यांनी केले. कार्यक्रमास सर्व संचालक डॉ.पळशीकर,परेश बिर्ला,सहचिटणीस संतोष वंजारी,गुरुदास पाटील,ग्रंथपाल देवेंद्र वंजारी,कर्मचारी अग्निहोत्री,गोकुळ मोरे व वाचक बहुसंख्येने उपस्थित होते.आभार संचालक परेश बिर्ला यांनी मानले
------------------------------------------
🪀 सर्व महत्त्वाच्या बातम्या मिळवा WhatsApp वर लोकनेता न्यूज ला जॉईन व्हा व शेअर करायला विसरू नका👉 https://lokneta.in/

Post a Comment