लोकनेता न्युज नेटवर्क
देगलूर (अमोल कुमार शिंदे) :- देगलूर शहरातील मोढा मैदानावर पार पडलेल्या काँग्रेसच्या पक्षप्रवेश सोहळ्याने शहराच्या राजकीय समीकरणात मोठा बदल घडवून आणला. राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) मधील महत्त्वाचे नेतृत्व असलेले अविनाश निलमवार, राष्ट्रवादी अजित पवार गटाचे दिव्यांग सेलचे प्रदेश कार्याध्यक्ष रामदास पाटील सुमठाणकर आणि माजी उपनगराध्यक्ष बालाजी रोयलवार यांनी आपल्या असंख्य समर्थकांसह काँग्रेसमध्ये जाहीर प्रवेश करून शहराच्या राजकारणात नवा अध्याय लिहिला. या प्रवेश सोहळ्याचे उद्घाटन काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या हस्ते करण्यात आले.
या कार्यक्रमामुळे काँग्रेस पक्षाला देगलूरमध्ये प्रचंड बळ मिळाल्याचे पाहायला मिळाले. ४ माजी नगराध्यक्ष, ८ विद्यमान नगरसेवक, २३ माजी नगरसेवक, तसेच माजी जिल्हा परिषद व पंचायत समिती पातळीवरील नेतृत्वासह शेकडो कार्यकर्त्यांनी काँग्रेसचा हात धरताच मैदान घोषणांनी दणाणून गेले. उत्साह, टाळ्या, जल्लोष आणि काँग्रेसची तरुणाई यांनी मोढा मैदानात विजयी वातावरण निर्माण केले होते.
प्रवेशानंतर बोलताना अविनाश निलमवार यांनी स्पष्ट शब्दांत सांगितले की, देगलूरचा जनादेश हा केवळ सत्ता किंवा पदासाठी वापरला जाणारा नाही. तो विश्वास आणि विकासाचा करार आहे. काही जणांनी वैयक्तिक फायद्यासाठी भूमिका बदलल्या, पण आम्हाला लोकांमध्ये राहून लोकांसाठी राजकारण करायचे आहे. देगलूरच्या सर्व पैलूंना जोडणारा, सर्व समाजघटकांना समान स्थान देणारा विचार काँग्रेसमध्ये आहे आणि म्हणूनच आमचा मार्ग काँग्रेसचा आहे.
रामदास पाटील सुमठाणकर यांनीही यावेळी पक्षप्रवेशाचे कारण स्पष्ट करताना सांगितले की, राजकारण हे एका खुर्चीसाठी नसते. ते जनतेच्या समस्या, त्यांच्या लढाया आणि त्यांच्या भावनांशी जोडलेले असते. काँग्रेस हा संघर्ष, मूल्ये आणि समाजसेवेचा पक्ष आहे. आम्ही लोकांसाठी आहोत आणि लोकांमध्येच राहू.
प्रवेश सोहळ्यात बोलताना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी सांगितले की, देगलूरकडे आता संपूर्ण राज्याचे लक्ष आहे. येथे अनुभवी आणि तरुण नेतृत्व एकत्र आले आहे. हे केवळ पक्षप्रवेश नाही, तर शहराच्या भविष्यासाठी घेतलेले मोठे पाऊल आहे. आगामी निवडणुका, संघटनात्मक ताकद आणि जनतेची बाजू घेण्याची तयारी अशा सर्व पातळ्यांवर काँग्रेस आता अधिक बळकट होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
मोढा मैदानावर पार पडलेला हा सोहळा पाहणाऱ्यांच्या मनात एकच भावना स्पष्ट दिसत होती – देगलूरच्या राजकारणात आता नवे वारे वाहत आहेत. काँग्रेस पक्षात उत्साह, चैतन्य आणि प्रबळ ताकद निर्माण झाली असून पुढील राजकीय घडामोडींकडे संपूर्ण शहराचे लक्ष लागून राहणार आहे..
------------------------------------------
🪀 सर्व महत्त्वाच्या बातम्या मिळवा WhatsApp वर लोकनेता न्यूज ला जॉईन व्हा व शेअर करायला विसरू नका👉 https://lokneta.in/

Post a Comment