लोकनेता न्यूज नेटवर्क
वाशिम (प्रतिनिधी) :-
'वर्षेदनेरी कोटदवाळी
याडीतोणं 'मेरा'
ह्या शुभेच्छासह आमच्या दिवाळीचं आगमन होते!
अमावस्येची विशेष रात्र...
जेवणावळी आटोपताच
अविवाहित मुली एकत्र येऊन
नववस्त्रं परिधान करून
आणि मातीचे पसरट दिवे घेऊन
घरोघरी जातात
'मेरा' मागतात
शुभेच्छा देतात
दुसरा दिवस गायीगोदनांचा
शेणाचे किल्ले बनवतात
बरुवा, लांबडी, सुगंधित रानफुलं त्यात रोवतात
किल्ल्यांची पूजा करतात
गीतं गातात
'धबूकार' देतात
वर्षात कुणाची मयत झाली असल्यास
नायक, कारभारी अन् तांडाप्रमुख सांत्वन करतात
आणखी खूपकाही असते दिवाळीत!...
परंतु, एवढ्यात वर्षांनुवर्षे
दुष्काळच दुष्काळ सलगी करताहेत
तांड्याची विविधरंगी संस्कृती
हवालदिल होत आहे
दिवाळी निरोप घेते न घेते तोच
वेठबिगारी, ऊसतोडणी आणि रोजंदारीसाठी
तांडेचे तांडे रिते होताहेत
व्यसनाधीनतेनं तांडे पोखरले जाताहेत
अंधश्रद्धांच्या जळवा त्यांना लपेटताहेत
एकीकडं मंदिरं रंगताहेत
अन् शाळा बंद पडताहेत
आता पोशिंदाच काय,
शिक्षित तरुणही फासाला लटकताहेत
आणि नेते करताहेत आश्वासनांची
कोरडी वृष्टी
ओलांडली पंच्याहत्तरी स्वातंत्र्याची तरीही
भटकंती आहे कायमच
कधी संपेल यातनापर्व अन्
ओरबाडणाऱ्या क्रूर विवचंना?
भारत आणखीही विकसित होईल
तांडा मात्र कोसो दूर राहल?
डॉ. विजय जाधव.
राजस्थान महाविद्यालय, वाशीम
संपर्क: ९८८१५२७६६०...
------------------------------------------
🪀 सर्व महत्त्वाच्या बातम्या मिळवा WhatsApp वर लोकनेता न्यूज ला जॉईन व्हा व शेअर करायला विसरू नका👉 https://lokneta.in/

Post a Comment