लोकनेता न्युज नेटवर्क
बीड (पांडुरंग हराळे) :- दि-२७ बीड जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले असून, सरकारकडून जाहीर करण्यात आलेली केवळ ८५ रुपये प्रति गुंठा इतकी मदत शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळणारी ठरत आहे. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना भरीव मदत द्यावी, बागायती शेतकऱ्यांवर अन्याय होऊ नये, तसेच सोयाबीनची हमीभावाने खरेदी आणि भावांतर योजना लागू करण्यात यावी, या प्रमुख मागण्यांसाठी सामाजिक कार्यकर्ते तथा मुख्य प्रचार प्रमुख बीड जिल्हा माहिती आधिकार कार्यकर्ता महासंघ महाराष्ट्र राज्य डॉ.गणेश ढवळे लिंबागणेशकर यांच्या नेतृत्वाखाली आज दि.२७. सोमवार रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर “सोयाबीनची होळी आणि सरकारच्या नावाने शिमगा” करत लक्ष्यवेधी आंदोलन.
मुख्य मागण्या :-
(अ) अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना भरीव मदत द्यावी
सरकारने जाहीर केलेली ८५ रुपये गुंठा मदत अत्यल्प आहे. त्यामुळे सरकारने नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना भरीव आर्थिक मदत जाहीर करावी.
तसेच बागायती क्षेत्रधारकांना जिरायती क्षेत्राप्रमाणेच मदत देणे अन्यायकारक आहे. बीड जिल्ह्यात सुमारे २ लाख हेक्टर बागायती क्षेत्र असून, जिल्हा प्रशासनाने केवळ १८ हजार हेक्टर क्षेत्र गृहीत धरले आहे, हा अन्याय तातडीने दूर करण्यात यावा.
(आ) सोयाबीनची तातडीने हमीभावाने शासकीय खरेदी सुरू करावी
सोयाबीन पिकावर उत्पादन खर्च वाढला असून मजुरी, गुत्ते पद्धतीने काढणी या खर्चामुळे शेतकरी तोट्यात जात आहे.
सध्याच्या घडीला बाजारात सोयाबीनला फक्त ₹३५०० ते ₹३८०० प्रति क्विंटल दर मिळत आहे, तर केंद्र सरकारचा हमीभाव ₹५३३८ प्रति क्विंटल आहे.
म्हणून सरकारने तातडीने नाफेड शासकीय खरेदी केंद्रे सुरू करून शेतकऱ्यांची आर्थिक लूट थांबवावी.
(इ) मध्यप्रदेशप्रमाणे “भावांतर योजना” सुरू करावी
मध्यप्रदेश सरकारने यंदापासून “भावांतर योजना” लागू केली असून, बाजारभाव हमीभावापेक्षा कमी मिळाल्यास ती तफावत शासन शेतकऱ्यांना भरून देत आहे.
महाराष्ट्र शासनाने या योजनेचा आदर्श घेऊन राज्यातही “भावांतर योजना” लागू करावी, अशी मागणी आंदोलनातून करण्यात आली.
डॉ.गणेश ढवळे लिंबागणेशकर
मो.नं.८१८०९२७५७२.
------------------------------------------
🪀 सर्व महत्त्वाच्या बातम्या मिळवा WhatsApp वर लोकनेता न्यूज ला जॉईन व्हा व शेअर करायला विसरू नका👉 https://lokneta.in/

Post a Comment