चारोटी टोल नाक्यावर मोठी कारवाई — महाराष्ट्रात बंदी असलेला ₹७.४७ लाखांचा गुटखा जप्त


लोकनेता न्युज नेटवर्क

पालघर (सतेंद्र मातेरा) :- डहाणू, दि. 8 ऑक्टोबर — नवी मुंबई विमानतळाच्या उद्घाटनाच्या पार्श्वभूमीवर सुरू असलेल्या वाहतूक व सुरक्षा तपासणी मोहिमेदरम्यान डहाणू तालुक्यातील चारोटी टोल नाक्यावर पोलिसांनी मोठी कारवाई करत महाराष्ट्रात बंदी असलेला सुगंधित पान मसाला व गुटखा जप्त केला आहे. या कारवाईत ₹७,४७,६२३ किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.

गुजरातहून मुंबईकडे येणाऱ्या वाहनांच्या तपासणीदरम्यान इनोव्हा क्रिस्टा (MH-48-AQ-0101) ही संशयास्पद गाडी पोलिसांच्या नजरेत आली. वाहनाच्या काचांवर काळ्या फिल्म असल्याने पोलिसांनी चालकाला चौकशीसाठी थांबवले. वाहनचालकाने उडवाउडवीची उत्तरे दिल्याने पोलिसांनी अधिक तपास केला असता, गाडीत प्रतिबंधित गुटखा आणि पान मसाला आढळून आला.

या प्रकरणात गाडी चालक दिशान रमजावा शेख (वय २५, रा. वज्रेश्वरी) याला अटक करण्यात आली असून, त्याच्याविरुद्ध BNS कलम १२३, २२३, २७४, २७५ तसेच अन्न सुरक्षा व मानके कायदा २००६ अंतर्गत कलम २३, २७ आणि ३० नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ही कारवाई महामार्ग पोलिस निरीक्षक संतोष खानविलकर, पोलीस नाईक वैभव शिंगाडे यांच्या सहकार्याने, कासा पोलिस ठाण्याचे निरीक्षक अविनाश मांदळे व उपनिरीक्षक किशोरी पवार यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.

या घटनेचा पुढील तपास सुरू असून, पोलिसांनी गुटखा तस्करीच्या साखळीचा मागोवा घेण्यास सुरुवात केली आहे. महाराष्ट्रात गुटखा विक्रीवर बंदी असतानाही गुजरातमार्गे अशा तस्करीच्या घटना वाढत असल्याने पोलिसांनी सीमावर्ती भागात तपासणी अधिक कडक करण्याचे संकेत दिले आहेत.

 ------------------------------------------

🪀 सर्व महत्त्वाच्या बातम्या मिळवा WhatsApp वर लोकनेता न्यूज ला जॉईन व्हा व शेअर करायला विसरू नका👉 https://lokneta.in/

0/Post a Comment/Comments