पालघर (सतेंद्र मातेरा) :- दिवाळीच्या पार्श्वभूमीवर पालघर डहाणू मधील आंबिवली (खडकीपाडा) येथील नॉलेज डेव्हलपमेंट ग्रुप (KD ग्रुप) तर्फे विविध विद्यार्थी स्पर्धा आणि सांस्कृतिक कार्यक्रमाचे भव्य आयोजन करण्यात आले. समाजातील लहानग्यांपासून ते तरुणांपर्यंत सर्व वयोगटातील विद्यार्थ्यांनी या उपक्रमात उत्स्फूर्त सहभाग नोंदवत परिसरात ज्ञान, कला आणि आनंदाचे वातावरण रंगविले.
कार्यक्रमाची सुरुवात सकाळच्या सत्रात विविध विद्यार्थ्यांच्या स्पर्धांनी झाली. चित्रकला, निबंध लेखन, पत्रलेखन, संगीत खुर्ची आणि वकृत्व अशा अनेक उपक्रमांमध्ये आजूबाजूच्या गावांतील ९० हून अधिक विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. स्पर्धकांची इयत्ता २ री ते ४ थी, ५ वी ते ८ वी आणि ९ वी ते १२ वी अशा तीन गटांत विभागणी करण्यात आली होती. प्रत्येक गटातील विजेत्या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र, पेन आणि आकर्षक बक्षिसे प्रदान करण्यात आली, तर सर्व सहभागी विद्यार्थ्यांना वही, पेन आणि शैक्षणिक साहित्य देऊन प्रोत्साहन देण्यात आले.
संध्याकाळच्या सत्राची सुरुवात धरती आबा बिरसा मुंडा यांच्या प्रतिमेचे पूजन करून करण्यात आली. मार्गदर्शन सत्रात TTSF पालघर जिल्हाध्यक्ष श विलास बेलकर, ॲड. विराज गडग, अशोक भोईर, पत्रकार नितिन बोंबाडे सर, आदिवासी कवी मोहन गुहे, ॲड. सुनंदा बेलकर, प्रकाश भोईर, प्रमिला भोईर आणि अरविंद बेंडगा या मान्यवरांनी विद्यार्थ्यांना आणि पालकांना शिक्षणाचे महत्त्व, व्यक्तिमत्व विकासाचे मूल्य आणि सामाजिक जाणीवेचे मोल समजावून सांगितले.
यानंतर झालेल्या सांस्कृतिक कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी नृत्य, नाट्य, गायन आणि विविध कलाप्रकारांद्वारे आपली प्रतिभा सादर केली. या रंगारंग सादरीकरणांनी उपस्थितांचे मन जिंकले.
या कार्यक्रमाच्या यशामागे KD ग्रुपचे कार्यकर्ते महेश गुहे, विजय गुहे, संतोष गुहे, राहुल गुहे, सचिन गुहे, विलास गुहे, प्रतिक भोईर, रोहिदास भोईर, बारक्या भोईर, अनिल भोईर, रोहित गुहे आणि जयेश गुहे यांची मेहनत आणि टीमवर्क महत्त्वाचे ठरले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक सुधीर भोईर यांनी केले, तर सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन विजय गुहे यांनी केले. दिवसभर वातावरण उत्साहपूर्ण, प्रेरणादायी आणि सांस्कृतिक उर्जेने भारलेले राहिले.
[ या कार्यक्रमाचा उद्देश आदिवासी ग्रामीण भागातील विद्यार्थाना शिक्षणात गोडी निर्माण व्हावी त्याचबरोबर शैक्षणिक दृष्ट्या वेगवेगळ्या क्षेत्रात मुलांना सहभाग घेता यावा, मनोबल वाढावे म्हणून. K D ग्रुप ने वर्षाकाठी एक दिवस वेळ काढून
जवळच्या शाळकरी मुलासाठी देण्यात आला. ]
------------------------------------------
🪀 सर्व महत्त्वाच्या बातम्या मिळवा WhatsApp वर लोकनेता न्यूज ला जॉईन व्हा व शेअर करायला विसरू नका👉 https://lokneta.in/

Post a Comment