बारूळ–कॅम्प रस्त्याच्या कामात त्रुटी; नागरिकांचा संताप पाहता उपविभागीय अधिकाऱ्यांचे हस्तक्षेप




लोकनेता न्युज नेटवर्क

कंधार (अविनाश कदम) :- कंधार–बारूळ–नरसी या राज्य मार्गावरील बारूळ हिंदू स्मशानभूमी ते बारूळ कॅम्प शिवाजी महाराज पुतळ्यापर्यंत सुरू असलेल्या सिमेंट काँक्रीट आणि डांबरीकरणाच्या रस्त्याच्या कामात गंभीर त्रुटी समोर आल्याने नागरिकांत संतापाची लाट पसरली आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वतीने कोट्यवधी रुपयांचा निधी खर्चून हे काम सुरू असून, योग्य खोदकाम न करता थेट मुरूम टाकून लेव्हलिंग करून डांबरीकरण व सिमेंट काँक्रीट टाकण्याचे प्रकार सुरु असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे.

या मार्गावर पुलाचे कामही सुरू असून, त्या कामासाठी आणलेले सिमेंट पाईप हे तडे गेलेले (क्रॅक झालेले) असल्याचे निदर्शनास आले आहे. याशिवाय रस्त्याची रुंदी ठरलेल्या मापापेक्षा कमी असल्याचेही स्पष्टपणे दिसून येत आहे. या कामाचे कंत्राट फौजी कन्स्ट्रक्शन यांना देण्यात आले आहे. तालुक्याच्या दृष्टीने हा रस्ता अत्यंत महत्त्वाचा आणि मुख्य मार्ग असल्याने कामाची दर्जाहीन पद्धत पाहून स्थानिक नागरिक, वाहनचालक आणि शेतकऱ्यांमध्ये रोष व्यक्त होत आहे.

या संदर्भात जेव्हा नागरिकांनी कंत्राटदाराचे अभियंता वाघमारे यांना विचारले की खोदकाम का केले जात नाही, तेव्हा त्यांनी उत्तर दिले की "या रस्त्याखाली मानार प्रकल्पाची पाईपलाईन गेली असून ती फुटण्याची शक्यता आहे; त्यामुळे खोदकाम टाळले आहे." हे उत्तर नागरिकांना अजिबात पटले नाही आणि त्यांनी तात्काळ काम थांबवण्याची मागणी केली.

या पार्श्वभूमीवर नागरिकांनी जिल्हाधिकारी, तहसीलदार व कार्यकारी सार्वजनिक बांधकाम विभाग अभियंता यांना निवेदन सादर करून सदरचे काम थांबवावे, दोषी कंत्राटदारावर कारवाई करावी आणि शासनाच्या निधीचा अपव्यय रोखावा, अशी मागणी केली. तसेच मागणी न मानल्यास आमरण उपोषणाचा इशाराही दिला.

नागरिकांचा वाढता विरोध आणि तक्रारींची दखल घेत कंधारचे उपविभागीय अधिकारी सुमित पाटील तसेच कनिष्ठ अभियंता अजय चमकुरे यांनी बारूळ येथे भेट देऊन नागरिकांशी संवाद साधला. त्यांनी संबंधित काम योग्य खोदकाम करून आणि दर्जेदार पद्धतीनेच पूर्ण केले जाईल, असे आश्वासन दिल्याने नागरिकांनी थोडासा दिलासा व्यक्त केला आहे.

------------------------------------------

🪀 सर्व महत्त्वाच्या बातम्या मिळवा WhatsApp वर लोकनेता न्यूज ला जॉईन व्हा व शेअर करायला विसरू नका👉 https://lokneta.in/

0/Post a Comment/Comments