लोकनेता न्युज नेटवर्क
परभणी (दत्तात्रय कराळे) :- आगामी २ डिसेंबर रोजी होणाऱ्या नगरपरिषदा व नगरपंचायतीच्या निवडणुका अंतिम टप्प्यात असून प्रचाराची रणधुमाळीही तशी पूरती शिगेला पोहोचली आहे. आश्चर्याची बाब म्हणजे आतापर्यंत सत्ताधारी आणि पारंपारिक विरोधक म्हणून एकमेकांच्या विरोधात लढतांनाचे अनुभव आपण घेतले आहेत.परंतु होवू घातलेल्या या निवडणूकीत मात्र सत्तेतील सहयोगीच एकमेकांचे कट्टर विरोधक बनले गेले आहेत.बहुधा हे विदारक चित्र मराठवाड्यातील बहुतांश जिल्ह्यात असल्यास आश्चर्य वाटू नये.
राज्यात यापूर्वी झालेल्या लोकसभा व विधानसभा निवडणुकीत भाजप, शिंदे शिवसेना आणि अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचा समावेश असलेल्या महायुतीशी उबाठा, शरद पवार यांची राष्ट्रवादी आणि कॉंग्रेस समाविष्ट महाविकास आघाडीचीच विशेषतः कडवी लढत राहिली आहे. उर्वरित छोटे छोटे पक्ष, संघटना, रिपाईंच्या विविध चळवळी मात्र परिस्थिती बघून निर्णय घेत असत. त्यात कोणी सत्ताधाऱ्यांच्या वळचणीला असतं तर कोणी स्वतंत्र किंवा आघाडीतील घटक पक्षांबरोबर आपले राजकीय सूत जुळवून घेत असत. फार फार तर निवडणूक काळात तटस्थ राहिलेले कांहीं पक्ष निकालानंतर कोणाला सहकार्य करायचे ते ठरवत असत. परंतु यावेळेचे चित्र वेगळेच असून जे कालपर्यंत तुझ्या गळा, माझ्या गळा म्हणून आनंदाने सत्तेचा मलिदा ओरबडणारे सहयोगीच एकमेकांचे कट्टर विरोधक बनले गेल्याने आश्चर्य वाटते स्वाभाविक आहे.
कधीकाळी शांततेचं प्रतिक ठरणाऱ्या पुरोगामी महाराष्ट्रात बिहारसारखी चिंताग्रस्त अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. प्रचाराची पातळीच नव्हे तर एकंदरीत निवडणूक प्रणालीच अगदी खालच्या थराला जाऊन पोहोचली आहे. प्रारंभी एका मतदार संघात नोंदविलेली मतदारांची नांव दुसरीकडे आढळून आली आहेत. याहीपेक्षा पुढे जाऊन सांगायचे झाल्यास एखाद्या पक्षाला नको असलेली विरोधकांची एक गठ्ठा मतं फोडून ती प्रसंगी गायब करण्यापर्यंतची मजल गेल्याचे अनेक प्रकार आढळून आले आहेत. त्यानंतर एकमेकांचे उमेदवार पळविणे, एवढंच नाही तर निवडणूकीत उभे राहूच नये म्हणून म्हणून विशेषतः महिला उमेदवारांना धमकावणे, शिवीगाळ करणे, विनयभंगासारख्या घटना घडवून आणणे, जीवे ठार मारण्याच्या धमक्या देणे आणि जीवघेणे हल्ले करणे यासारखे भयंकर प्रकार यावेळी प्रामुख्याने घडले आहेत. घडवले जात आहेत. पुरोगामी महाराष्ट्राला न पटणारी व अशोभनीय अशी ही अश्लाघ्य कृती येणाऱ्या ३-४ दिवसांमध्ये आणखी काय काय घडवून आणू शकेल, हे दिसून येणारच आहे. ते काहीही जरी असले तरी ते एक भयाणक वास्तव म्हणता येईल.
निवडणुकीच्या या रणधुमाळीत कोणत्याही परिस्थितीत सत्ता मिळवायची च्, या इर्षेने लढणारे सत्तेतील हेच घटक पक्ष विशेषतः भाजपा आणि शिंदे शिवसेना गटातील बहुतांश आमदार, नेते, पदाधिकारी व कार्यकर्ते सुध्दा एकमेकांवर पातळी सोडून गंभीर आरोप करीत आहेत. एकमेकांचं राजकीय करिअर संपवण्याची भाषा करीत आहेत. ज्यांनी काल परवापर्यंत गळ्यात गळे घालून सत्तेचा मलिदा ओरबाडला आहे, तेच आज एकमेकांच्या जीवावर उठत आहेत. अब्रूची लक्तरे काढीत आहेत. पैशाचा पाऊस पाडताना दिसत आहेत. सत्तेतील हेच सहयोगी राजकीय आरोपांच्या गंभीर उभ्या दोऱ्या काढून भविष्यातील राजकीय वाटा अडचणीच्या करीत आहेत एवढे मात्र खरे. त्यामुळे पारंपारिक विरोधक पक्षांना टीका करण्याची संधीच मिळत नसावी.
मराठवाड्यातील नांदेड, परभणी, हिंगोली, लातूर, बीड, धाराशिव, जालना आणि छत्रपती संभाजी नगर या सर्वच जिल्ह्यांत भाजपाने सत्तेतील सहकारी पक्ष असलेल्या अजित पवार राष्ट्रवादी आणि शिंदे शिवसेनेच्या विरोधात प्रखर अशा ताकदीने शेड्डू ठोकत आव्हानात्मक परिस्थिती निर्माण केली जात आहे. नांदेड जिल्ह्यातील लोहा, देगलूर, मुखेड,बिलोरी, कंधार, हिमायत नगर, हिंगोली जिल्ह्यातील कळमनूरी, औंढा, परभणी जिल्ह्यातील गंगाखेड, पूर्णा, परभणी, जिंतूर, पाथरी, बीड जिल्ह्यातील बहुतांश ठिकाणी तर गंभीर परिस्थिती असल्याचे चित्र विषद केले जात आहे.
दरम्यान, होवू घातलेल्या या नगरपरिषदा आणि नगरपंचायतीच्या निवडणुकांमधील लागणारा निकाल हीच पुढील राजकीय यश-अपयशाची नांदी ठरणार असल्याचे गृहीत धरुनच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे विश्वसनीय नेते तथा भाजपाचे तडफदार प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण, कांहीं मंत्री, अनेक पदाधिकारी प्रयत्नांची पराकाष्ठा करीत आहेत. अहोरात्र शर्थीचे प्रयत्न करीत आहेत. मी जो काही आहे, तो केवळ आणि केवळ भाजपामुळेच, मग त्यासाठी वाटेल ते करु शकतो, असा निर्धार रवींद्र चव्हाण यांनी केला आहे. राज्यातील बहुतांश नगरपरिषदा व नगरपंचायतीच्या भाजपाचीच एकहाती सत्ता राहिली जाईल, जणू असाच चंग बांधून चव्हाण यांनी आर-पारचा संकल्प सोडला आहे. नांदेड जिल्ह्यात अशोकराव चव्हाण, परभणी जिल्ह्यात मंत्री मेघना बोर्डीकर, बीडमध्ये पंकजा मुंडे इ.नेत्यांनी प्रयत्नांची पराकाष्ठा चालविली आहे. त्यामुळे मुख्यमंत्री फडणवीस यांची छाती फुलून येते स्वाभाविक आहे. दरम्यान, नांदेडमधील लोहा-कंधारसह काही तालुक्यांमध्ये अजित पवार गटाचे प्रतापराव पाटील चिखलीकर, बीडमधील मराठा लॉबी व इतरांनी तर परभणीत उबाठा सेनेचे नेते खा.संजय जाधव व आ.राहूल पाटील आणि मविआचे घटक पक्ष यांनी संयुक्तपणे उभे केलेले आव्हान भाजपा कशी पेलणार, याकडे अनेकांचे लक्ष लागून राहिले आहे. एकूणच काय तर मराठवाड्यात बहुतांश ठिकाणी सत्तेतील सहयोगी भाजपा, राष्ट्रवादी आणि शिंदे सेना या तीन्ही पक्षांमधला संघर्ष कमालीचा टोकाला गेला आहे. त्यामुळे अत्यंत चुरशीच्या ठरलेल्या या निवडणुकांकडे केवळ राज्याचेच नव्हे तर देशाचे लक्ष लागले जाणे स्वाभाविक आहे. परिणामी ही वेळ फडणवीस आणि चव्हाण या दोन्ही नेत्यांसाठी प्रयत्नांची पराकाष्ठा ठरणार आहे.
------------------------------------------
🪀 सर्व महत्त्वाच्या बातम्या मिळवा WhatsApp वर लोकनेता न्यूज ला जॉईन व्हा व शेअर करायला विसरू नका👉 https://lokneta.in/

Post a Comment