फडणवीस-चव्हाण यांच्याकडून होतेय शिंदेंची राजकीय कोंडी ! तर नाईक पिता-पुत्राकडून होतेय दमकोंडी ?


लोकनेता न्युज नेटवर्क

परभणी (दत्तात्रय कराळे) :- ठाणे जिल्हा हा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं होम पिच म्हणजेच हक्काचा जिल्हा आहे. जिल्ह्यातील आगामी नगरपरिषदा नगरपंचायतीच्या निवडणुकांसाठी राज्याचे वनमंत्री गणेश नाईक यांची प्रभारी पदी नियुक्ती करुन प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी पूरती कोंडी केली आहे. विशेष म्हणजे रवींद्र चव्हाण हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे ते अत्यंत जवळचे व विश्वसनीय असून त्यांच्याच सांगण्यावरून हा निर्णय चव्हाण यांनी घेतल्याचे बोलले जात आहे. 

       राज्यात महायुतीचं सरकार असून उपमुख्यमंत्री असलेले एकनाथ शिंदे हे त्याच महायुती सरकारचा घटक पक्ष आहे. सत्तास्थानी असलेल्या या तिन्ही पक्षांनी मिळून ही निवडणूक लढणे अपेक्षित होते. तथापि महापालिका वगळता अन्य सर्व निवडणुका या स्वबळावर लढवल्या जाणार असल्याचे दस्तूरखुद्द मुख्यमंत्र्यांनीच सांगितले आहे. जेथे जमेल तेथे मैत्रीपूर्ण लढती आणि जेथे सूत जुळणारी नाही, तेथे मात्र स्वबळाचा नारा, या पध्दतीने या निवडणूका लढवल्या जातील हेच यातून स्पष्ट होत आहे. तथापि जेथे शिंदे यांचे होम पिचड आहे किंवा त्यांच्या शिवसेनेचे प्राबल्य आहे, तेथे मात्र स्वतंत्रपणे लढून भाजपा शिंदे आणि त्यांच्या सेनेची दमछाक करणारी असल्याचे आता लपून राहिलेले नाहीये. 

       विशेष म्हणजे वनमंत्री असलेले गणेश नाईक यांचंही तसं शिंदे यांचेशी कोणतंही सख्ख्य नसल्याचं सर्वश्रुत आहे. सत्तेमध्ये भागीदारी असूनही मागील काही काळात नाईक यांनी शिंदे यांच्या विरोधात बरेच निर्णय घेतले आहेत. मुख्यमंत्री असताना शिंदे यांनी आपला जिल्हा सातारा येथे काही महत्त्वाचे प्रोजेक्ट पास केले होते. तर काही ठिकाणी कामही सुरू केले होते. परंतु सुरु केलेली कामे थांबवली तर काही ठिकाणचे ते प्रोजेक्ट्स रद्द करुन गणेश नाईक यांनी शिंदे यांना अनेकदा जबरी धक्का दिला आहे. त्यामुळे अगोदरच जिव्हारी लागलेले ते प्रसंग अजून ताजे आहेत. किंबहुना त्या जखमा अद्याप तरी ताज्या आहेत.‌ असं असूनही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शिंदेंची जेथे जेथे राजकीय प्राबल्य आहे, तेथे त्यांचं खच्चीकरणच करायचं, जणू असंच कारस्थान चालविल्याचं दिसून येत आहे. 

     याहीपेक्षा पुढे जाऊन आणखी सांगायचे झाल्यास नाईकपुत्र तथा माजी खासदार संजीव नाईक यांची सुध्दा नवी मुंबईसह ठाणे जिल्ह्याचे निवडणूक प्रमुखपदी नियुक्ती करुन आणखी एक तगडा झटका दिला आहे. एकूणच या खेळीमुळे ठाणे जिल्ह्याच्या राजकारणात नाईक पिता-पुत्र आणि शिंदे पिता-पुत्र या दोघांमधून साधा विस्तव सुध्दा जात नाहीये, असंच म्हणता येईल. 

       उपमुख्यमंत्री असलेल्या एकनाथ शिंदे यांचेशी जुळवून घेणे अपेक्षित असताना त्यांचं राजकीय खच्चीकरणच अधिक प्रमाणात केलं जातं असल्याने ठाणे जिल्ह्यात प्रचंड खळबळ माजली आहे. या निवडणुकीच्या माध्यमातून टाकली जाणारी ठिणगी आगामी मुंबई महापालिका निवडणुकीतही दिसून आल्याशिवाय राहणार नाही, ही काळ्या दगडावरची पांढरी रेष आहे. 

       मुंबई, ठाणे, कल्याण-डोंबिवली, नाशिक आणि आणखी काही महत्त्वाच्या महापालिकांमध्ये शिंदे यांच्याच शिवसेनेची सत्ता राहिली आहे. बहुतांश त्या सर्व ठिकाणी आपलीच सत्ता कायम राहिली जावी यासाठी शिंदे व पक्षाकडून शर्थीचे प्रयत्न केले जात आहेत. परंतु मिनी विधानसभा असलेल्या मुंबईसह ठाणे, कल्याण-डोंबिवली, नाशिक, अमरावती, नागपूर, छत्रपती संभाजी नगर, परभणी, नांदेड आणि वसई-विरार या सर्व महत्वाच्या महापालिका कोणत्याही परिस्थितीत बळकायच्या, जणू असाच निर्धार देवेंद्र फडणवीस आणि रवींद्र चव्हाण यांनी चालविला आहे, हे मुळीच नाकारता येणार नाही. आश्चर्याची बाब म्हणजे ही सर्व तयारी विधानसभा निवडणुकीचा निकाल लागला गेला, अगदी तेव्हापासूनच ही पायाभरणी सुरु केली आहे. 

      सर्वप्रथम नगरपरिषदा, नगरपंचायती, त्यानंतर जिल्हा परिषदा व पंचायत समित्या आणि त्यानंतर शेवटचा टप्पा म्हणजेच महापालिका, अशी एकेक करून सर्व सत्तास्थानं भाजपा शिंदेंकडून बळकावण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे. मग त्यासाठी साम-दाम-दंड-भेद आणखी काय काय वापरणे आवश्यक असेल ती सर्वकाही अस्त्र वापरली जातील यात शंकाच नसावी. भाजपा आणि शिवसेनेमधला हा अटीतटीचा संघर्ष शेवटी कोणत्या थराला जाऊ शकेल, हे सुध्दा सांगणे कठीणच असणार आहे. मग मात्र युती राहिली काय आणि संपूष्टात आली काय, याचं भाजपाला काहीच सोयरसुतक नसणार आहे. मागील विधानसभा निवडणुकीच्या वेळीच आम्ही भाजपाचा हा गर्भीत इशारा निदर्शनास आणण्याचा प्रयत्न केला होता. परिणामी वाढलेल्या दिल्ली वाऱ्या आणि निर्माण परिस्थितीनंतरही शिंदे यांनी बोध घेणे अपेक्षित होते, परंतु त्याला अन्य कोणता पर्याय सुध्दा समोर नसल्याने अखेर जे जे होईल, ते ते पहावे... अशीच परिस्थिती एकनाथ भाऊंकडे शिल्लक आहे असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही..!

------------------------------------------

🪀 सर्व महत्त्वाच्या बातम्या मिळवा WhatsApp वर लोकनेता न्यूज ला जॉईन व्हा व शेअर करायला विसरू नका👉 https://lokneta.in/

0/Post a Comment/Comments