आईची राख शेतात विसर्जित करून मराठा सेवा संघाच्या विचाराने झाडे लावून दिला सामाजिक संदेश...



लोकनेता न्युज नेटवर्क

कौठा (प्रभाकर पांडे) :- प्रसिद्ध व्याख्याते, लेखक रमेश पवार सर व शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय छत्रपती संभाजी नगर येथील प्रा. गणेश पवार यांच्या मातोश्री शिवाजी पवार यांच्या पत्नी सौ. लक्ष्मीबाई शिवाजीराव पवार यांचे दि. २३ ऑक्टोबर २०२५ रोजी दुःखद निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर काटकळंबा ता.कंधार येथे २३ तारखेलाच दुपारी तीन अंत्यसंस्कार करण्यात आले. अंत्यसंस्कारासाठी सर्व क्षेत्रातील खूप मोठा जनसमुदाय उपस्थित होता. 

माझी सावली, माझी माऊली माझी आई नाव लक्ष्मीबाई साक्षात लक्ष्मी त्यांच्या अफाट कष्टातून, परिश्रमातून, उच्च संस्कारातून, सुसंस्कृत विचारातून आम्हा दोघा भावंडाना घडवण्याचे, चांगल्या दर्जाचे शिक्षण, चांगले संस्कार आमच्यात रूजवले आम्हाला नोकरीला लावून समाजात सन्मानाने उभे करण्याचे काम माझ्या माईने मोठ्या कष्टातून बाबांच्या साथीने केले आज आम्ही जे काही आहोत त्याचे सर्व श्रेय माझ्या आई- बाबांना जाते.माझी आई अशी अचानक गेल्याने संपूर्ण माझा गाव,पाहुणे, मित्र परिवार, सर्व क्षेत्रातील सामाजिक, राजकीय, शैक्षणिक, सांस्कृतिक, अधिकारी, कर्मचारी,पत्रकार, माझे मार्गदर्शक, स्नेही जण हळहळले, शोक व्यक्त केला.

आमच्या काटकळंबा निवासस्थानी भेटी देवून आमचे सांत्वन करून आम्हाला धीर दिला. आमची माय सर्व पाहुण्याना सर्वाना घेवूनचालणारी मोठ्या मनाची, मोठ्या अंतःकरणाची प्रत्येकाच्या मदतीला धावून जाणारी प्रत्येक कार्यात पुढे राहणारी सातवी शिकलेली शिक्षणाबद्दल प्रचंड प्रेम, योग्य सल्ला देणारी, मार्ग दाखवणारी,सर्व समाजाच्या सुखदुःखात खारीचा वाटा उचलणारी गावला हवीहवीशी वाटणारी माय आज आमच्यात नाही. तिला पुढे खूप काही आनंदाचे क्षण बघायचे होते. परंतू नियतिला ते मान्य नव्हते. आम्ही तिला वाचवण्यासाठी सर्वेतोपरी प्रयत्नाची पराकाष्ठा केली परंतू नियतीने आमच्या आनंदी कुटुंबावर शेवटी दुःखाचा घाला घातला आणि आईला आमच्यातून हिरावून घेतले. आम्ही आईच्या आदर्शाने आणि संस्कारातून जीवनात मार्गक्रमण करीत आलोय आणि यापुढेही करणार.....

आईची राख शेतात विसर्जित करून 

जगद्गुरू संतश्रेष्ठ तुकोबाराय यांच्या वचना प्रमाणे "वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे" 

याप्रमाणे झाडे लावून विनम्र अभिवादन करून आशीर्वाद घेतले.

----- शिवाजीराव पवार 

----- प्रा. गणेश पवार 

----- रमेश पवार

------------------------------------------

🪀 सर्व महत्त्वाच्या बातम्या मिळवा WhatsApp वर लोकनेता न्यूज ला जॉईन व्हा व शेअर करायला विसरू नका👉 https://lokneta.in/

0/Post a Comment/Comments