लोकनेता न्युज नेटवर्क
परभणी (दत्तात्रय कराळे) :- निवडणूक विभागात काम करणाऱ्या एका लिपिकाने आपल्या खासगी मोबाईलवरुन फोटोंसह मतदार याद्या व्हायरल करुन त्या बदल्यात मोठ्या प्रमाणात तोडपाणी करण्याचा गोरखधंदा तेजीने चालविला होता. अत्यंत गोपनीय असे हे प्रकरण परंतु संगणक मध्ये स्वतंत्र फोल्डर तयार करुन अंतिम याद्या राजकीय पक्षांच्या मित्रांना पुरविल्या जातात याची भणक अचानक चव्हाट्यावर येताच प्रचंड खळबळ माजली गेली. तथापि सदर प्रकरण आपल्या अंगलट येऊ नये, यांची दक्षता घेत त्या भीतीने संबंधित मुख्याधिकाऱ्यांनी या प्रकरणी लिप्त लिपिकास तात्काळ निलंबित करुन मी मात्र साजूक तुपासारखा असल्याचे प्रयत्न त्यांनी केल्याचे बोलले जात आहे. परंतु या गंभीर प्रकरणाची तात्काळ सखोल चौकशी झाल्यास वास्तव बाहेर येऊ शकेल असंही बोललं तर आश्चर्य वाटू नये.
याप्रकरणी खळबळजनक अशी जी माहिती प्राप्त झाली आहे ती अशी की, मानवत नगरपालिकेच्या निवडणूक विभागात सचिन सोनवणे नावाचा लिपिक कर्तव्यावर आहे. निवडणूक म्हटलं की, डोकं चालवून नवनवीन असे आर्थिक स्त्रोत निर्माण करायचे असतात. जेवढी गरज आपल्याला असते, किंबहुना त्यापेक्षा अधिक प्रमाणात गरजवंताला असते. नेमका संधीचा गैरफायदा घेत सचिन सोनवणे याने काही राजकीय मित्रांशी हातमिळवणी करीत आर्थिक हितसंबंधांचे संधान साधले. त्यातूनच ही नामी युक्ती सुचली गेल्यास नवल ते कसले ?
निवडणूक विभागातील संगणकामध्ये फोटोंसह असलेल्या मतदार याद्यांचे एक स्वतंत्र फोल्डर बनवून अंतिम मतदार यादीची ती सॉफ्ट कॉपी सचिन सोनवणे याने आपल्या खासगी मोबाईलवरुन कार्यालयाबाहेरील संबंधित व्यक्तींना पाठवण्याचा गोरखधंदा सुरू केला होता. त्या बदल्यात मोठ्या प्रमाणात आर्थिक तोड-पाणीही सुरु झाले होते.
परंतु पाण्यातला बुडबुडा हा कधी ना कधी बाहेर येणारच. तसंच कायदा धाब्यावर बसवून गोपनीय अशी महत्वाची संगणकीय माहिती मोठ्या मिळकतीच्या बदल्यात बाहेर जातेय याची भणक लागताच त्याचा अचानक स्फोट झाला. ज्यामुळे प्रचंड खळबळ माजली गेली.
एवढं मोठं प्रकरण कार्यालयातून होत असताना मुख्याधिकारी आणि त्यांचे ओएस यापैकी ते माहीत नसेल असे होणारच नाही. परंतु हे प्रकरण आपल्या अंगलट येऊ नये याची वेळीच दक्षता घेत मुख्याधिकारी महेश गायकवाड यांनी सचिन सोनवणे यांच्यावर तात्काळ कारवाईचा बडगा उगारत त्याला सेवेतूनही निलंबित केले. याप्रकरणी निवडणूक निर्णय अधिकारी तथा मानवतचे तहसीलदार माचेवाड यांनी ही माहिती पत्रकार परिषदेतून दिली. तथापि हा विषय जेवढा नाजूक आहे, तेवढाच अधिक गुंतागुंतीचा आणि आर्थिक हितसंबंधांशी जोडला गेला आहे. त्यामुळे या प्रकरणाची शहानिशा व सखोल चौकशी सुध्दा होणे तेवढेच महत्त्वाचे आहे. अन्यथा कोणाच्या पोटावर पाय कशाला द्यायचा म्हणून तहसीलदार माचेवाड यांनी 'पांडुरंगाची' भूमिका न निभावता कर्तव्याला प्राधान्य देणे आवश्यक ठरणार आहे. तसे न झाल्यास हे प्रकरण दाबले गेले म्हणून त्यांच्यावरही पापाचे क्षालन करण्याची पाळी येऊ शकेल, असं म्हटलं तर गैर ठरणार नाही.
राज्यात सर्वत्र निवडणूक विषयक तयारीची धावपळ जोमाने सुरु झाली आहे. तशीच ती मानवत नगरपालिकेतही होणे स्वाभाविक आहे. निवडणूक प्रक्रियेचाच एक भाग म्हणून प्रभाग निहाय अशा बिनचूक मतदार याद्या तयार करण्याची जबाबदारी लिपिक असलेल्या सचिन सोनवणेवर सोपवण्यात आली होती. मतदार याद्या व अन्य निवडणूक कामकाजाविषयी सततच्या बैठका, व नियोजन याबाबत सततची धावपळ सुरु असल्याने प्रत्येकाला स्वतंत्र जबाबदारीचे भान कसे राखायचे याविषयीच्या सूचना देण्यात आल्या होत्या. परंतु वरिष्ठांच्या आदेशाला ठेंगा दाखवत सचिनने एक नोव्हेंबर दरम्यान जे कारस्थान चालविले होते, ते निश्चितच विश्वासाला तडा देणारे आणि आर्थिक हितसंबंधात बरबटलेले होते. हे प्रकरण चव्हाट्यावर येताच शहरात सर्वत्र प्रचंड खळबळ माजली गेली. ज्यामुळे २ नोव्हेंबरला सचिनवर निलंबनाची कारवाई करणे भाग पडले. दरम्यान, या प्रकरणात आणखी किती जणांचे हात ओले झाले आहेत, यांचाही तपास होणे गरजेचे आहे. खरोखरच यात आर्थिक तोडपाणी नव्हते तर मग कोण कशाला एवढी रिस्क घेतली असती, ज्यामुळे नोकरीवरही पाणी सोडावे लागले.
------------------------------------------
🪀 सर्व महत्त्वाच्या बातम्या मिळवा WhatsApp वर लोकनेता न्यूज ला जॉईन व्हा व शेअर करायला विसरू नका👉 https://lokneta.in/

Post a Comment