गावाकडच्या सटी (चंपाषष्ठी)


लोकनेता न्यूज नेटवर्क

प्रत्येक गावाची आणि परिसराची विविध सणांच्या बाबतीत एक आगळी वेगळी ओळख आहे. त्यात महाराष्ट्राच्या विविध जिल्ह्यात आणि परिसरात अशा भरपूर लोक परंपरा अजूनही अबाधित असून त्याद्वारे समाजात विविध सण-समारंभ संपन्न होतांना ग्रामीण संस्कृतीचा सुगंध सर्वत्र दरवळत असतो. असाच महाराष्ट्रात चंपाषष्ठीचा उत्सव मोठ्या उत्साहात विविध प्रकारे साजरा केला जातो. हा सण आमच्या गावाकडे लहानपणी मोठ्या उत्साहात साजरा केला जात असे.

           आमच्या मराठवाड्यात गोजेगावाकडे चंपाषष्ठी या सणाला सटी म्हणतात. मला आजही आठवतेय की; गावाकडे हा सण दोन दिवस साजरा केला जात असे. सटीच्या अगोदरच्या दिवशी म्हणजे षष्ठीच्या अगोदर पंचमीला माय नागदिवे करायची. पंचमीला माय आमच्या स्वतःच्या घरीच जोगवा मागायची. जोगवा मागतांना तिच्या हातातील ताटात दोन टिपर म्हणजे मोठाले ज्वारी आणि सजगुऱ्याचे (बाजरी) असे दिवे असायचे. जोगवा मागण्यापूर्वी माय आमच्यापैकी एकाला पीठ घेऊन दारात उभं करायची आणि “जोगवा, जोगवा” असं म्हणत पाच वेळेस आमच्याच दारात जोगवा मागायची. मग आम्ही मायला थोडं थोडं पीठ वाढायचो. मायच्या ताटातील दोन्ही नाग दिव्याच्या वातीच्या जागी दिव्याला नाक काढलेले असायचे. त्या नागदिव्याला नाकाच्या जागी कुंकू लावलेल्या वाती असायच्या आणि त्यावर हरभऱ्याच्या भाजीची पाने असायची. जोगवा मागल्यानंतर माय नाग दिव्याचा उपवास सोडायची. त्या नागदिव्यांच्या वातीवर माय पितळेचे ताट धरून ठेवायची. थोड्यावेळाने त्या पितळेच्या ताटाला काजळी यायची. बस्स, मायचे काम व्हायचे. रात्री झोपताना माय घरातील गायीच्या तुपात पितळेच्या ताटाची काजळी मिसळून काजळ करून आमच्या डोळ्यात घालायची. आम्ही झोपलेलो असतांना ते आमच्या लक्षातही यायचे नाही. दुसऱ्या दिवशी म्हणजेच सटीच्या दिवशी आम्ही आरशात पहायचो तेंव्हा आमचे डोळे काळे कुट्ट झालेले असायचे. सकाळी मोठे दादा आम्हाला “काजळे बैल” म्हणून चिडवायचे आणि मग माय त्यांच्यावर रागवायची. नागदिवे म्हणजे नागाची पूजा. आपण सार्वजन नागवंशीय आहोत याचे आणि निसर्ग पूजेचे हे द्योतक! म्हणजेच वर्षातून दोनदा नागपूजा व्हायची, एक नागपंचमीला आणि दुसरी नागदिव्याला! दोन्हीही काळ शेतकरी खरीप आणि रब्बी पेरणी सुरु होण्याचे, त्यामुळे नागपुजेला विशेष महत्व असायचे आणि नंतर आम्हाला साप हा शेतकऱ्याचा मित्र असतो हे विज्ञानाच्या पुस्तकात वाचायला मिळाले.

         सटीचा (चंपाषष्ठी) चा सण संपूर्ण गावभर मोठ्या उत्साहात साजरा व्हायचा. आम्ही उठायच्या आत मायचं घर सारवणं आणि दारात सडा झालेला असायचा. गावातील जवळपास सर्वच घरी चार महिने म्हणजे आषाढी एकादशी नंतर येणाऱ्या पौर्णिमेपासून ते चंपाषष्ठीपर्यंत वांगे आणि कांद्याची पाथ खात नसायचे आणि आजपण आम्ही हे पाळतो. यामागे वैज्ञानिक कारण असावे. हा मंदाग्नीचा काळ आहे. या चार महिन्यात माणसाने हलके अन्न खावे. असो. अगोदरच्या दिवशीच माय-बाबा-दादा सटीची तयारी करायचे. आमच्या घरी दोन खंडी गाई आणि एक दोन कुत्रे असायचेच. सटीच्या दिवशी सकाळीच बाबांची देवपूजा झाली की तळी उचलायचा कार्यक्रम असायचा. शेजारचे पाजारचे माणसं एकमेकांच्या घरी तळी उचलायला जायचे. आमच्या घरी येटाळीतले, भावकीचे, सोयरे चार-पाचजण यायचे. देवपूजा झालेली असायची. बाबा देव्हाऱ्यासमोर खाली जमिनीवर घोंगडी अथरायचे. त्या घोंगडीवर पूजेचे ताट ठेवले जायचे. त्या ताटात गव्हाचे शिजवून केलेले पाच-सात दिवे असायचे. त्याला आरती म्हणतात. माय आरती लावून देत असे. त्यानंतर बाबा देव्हाऱ्यातील खंडोबा देवाला आरतीच्या ताटात ठेवायचे. मग सगळे चार-पाच जण डोक्यावर टोपी-रुमाल घेऊन त्या खंडोबा देव ठेवलेल्या आरतीच्या ताटाला हाय लावून ताट उचलायचे. उचलतांना हातातील भंडार अर्थात हळद खंडोबा देवावर उधळत, “येळकोट येळकोट जय मल्हार!” असं पाच वेळा म्हणून खंडोबा देवाची तळी उचलायचे. तळी उचलणं झाली की सर्वजण एकमेकांना भंडार लावायचे. ही परंपरा आजही आम्ही मोठ्या सन्मानाने जपतो. त्यानंतर गावभर लोक एकमेकांच्या घरी तळी उचलायला जायचे.

        खंडोबा हे आमच्या पंचक्रोशीतील जवळपास सर्वच गावाचे कुलदैवत! आमच्या गावच्या उत्तरेला जो डोंगर आहे त्या माळावर जुने हेमाडपंथी खंडोबाचे स्तूपवजा मंदिर असून सटीच्या दिवशी माळावरील खंडोबाला प्रत्येक घराचा भरीत पानग्याचा नैवेद्य असतोच. एवढेच काय आमच्या शेतात सुद्धा एक खंडोबाचे मंदिर आहे. त्या खंडोबाला सुद्धा गोजेगाव, चीमेगाव, धार, माथा, भगवा इत्यादी गावातील लोक सटीला वांग्याचे भरीत-पानग्याचा (बाजरी) नैवेद्य, आरती वाहतात. पानगा म्हणजे बाजरीचा नैवेद्य. गावाकडे बाजरीला सजगुरे म्हणत असायचे आणि ते आमच्याकडे खाल्ले जात नसत. बैलाच्या खाण्यात सजगुरे टाकून दिले जायचे. हिरवे, कडसर लागल्यामुळे लहान मुले तर अजिबात बाजरी खात नसत. आमच्या माळावर आणि शेतातसुद्धा खंडोबाचे मंदिर आहे, याचा अर्थ आमचे आजोबा-पणजोबा खंडोबा देवाला मानणारे होते; म्हणूनच आमच्या बाबांचे नाव खंडुजी ठेवले असावे. अगोदरच्या काळी आपल्या घराण्याच्या परंपरा मुलाबाळांचे नावे ठेवूनच जपल्या जायच्या. माझा जन्म आषाढी एकादशीच्या द्वादशीचा, म्हणून आमच्या माय-बाबांनी माझे नाव विठ्ठल ठेवले.

           तळी उचलल्यानंतर माय देवाला भरीत पानग्याचा नैवेद्य ठेवायची. मारोतीच्या पारावरचा नैवेद्य वाहून आले की; तब्बल चार महिन्यानंतर आम्हाला वांग्याचे भरीत खायला मिळायचे. चुलीतल्या खवखव आहारात भाजलेले वांगे, ते कुस्करून त्यात कांद्याची पाथ टाकून ते भरीत तव्यावर झणझणीत फोडणी दिलेले असायचे. सोबत सजगुऱ्याची (बाजरी) भाकर असायची. गावाकडच्या मायच्या हाताच्या चुलीवरच्या भरताची आठवण आली की आजही तोंडाला पाणी सुटते! एकदम चवदार जेवण झालं की; आम्ही वावरातील खंडोबाच्या नावानं बाजूला काढून ठेवलेले नैवेद्य आणि आरती घेऊन जायचो. आता दुपार झालेली असायची. वावरात बाल्या कुत्रं वाट पहाट असायचं. आम्ही पळूपळू वावरात जायचो. खंडोबा देवाला नैवद्य वाहून बाल्याला भंडार लावून पानगा खाऊ घालायचो. बाल्या माझा जिवलग मित्र होता. नुसता माझ्या अंगावर उड्या मारायचा अन मी त्याच्यावर बसून मस्त वावरात फिरायचो. पाच वाजता आम्ही अन बाल्या वावरातल्या खंडोबाच्या मंदिरात जाऊन लोकांनी देवाला वाहिलेल्या आरतीचा मस्त आस्वाद घ्यायचो. लय चवदार लागायची देवा जवळची आरती!

            आज मागे वळून पाहतांना हे सर्व आठवले की; वेडे मन भूतकाळात शिरते. तेंव्हाचे वावर जांब, पपई, लिंबोणी, खारकी बोर इत्यादी झाडांनी सजलेलं असायचं. आज गावाकडे माय-बाबा नाहीत. खायला सर्वकाही आहे पण ती चव नाही. वावर जाग्यावर आहे मात्र त्याचे तुकडे झालेत. बसायला एक झाड नाही. विहिरीवर ते जुनं चाफ्याचं खोड वाट पाहत उभं आहे बाकी विहिरीच्या भोवतालची जांबाची, हदगा, पपई, लिंबोणी, बोरीची झाडे काळाच्या पडद्याआड गेलीत. मी गावाकडे जातो तेंव्हा एकटाच विहिरीवर जाऊन बसतो आणि विहिरीच्या भवतालचा परिसर आठवत असतो. आज सटी अर्थात चंपाषष्ठी असल्यामुळे ते बालपण आठवलं. तो काळ आणि त्याच्या अविस्मरणीय आठवणी सर्वकाही मनःपटलावर घोंगावत सर्रकन निघून गेल्या! मग काय करणार? आठवलं ते लिहितो. विरेचन, बस्स! येळकोट येळकोट जय मल्हार!   

प्रा.डॉ.विठ्ठल खंडुजी जायभाये

कै.रमेश वरपुडकर महाविद्यालय, सोनपेठ

जि.परभणी (महाराष्ट्र)

मो 9158064068.

------------------------------------------

🪀 सर्व महत्त्वाच्या बातम्या मिळवा WhatsApp वर लोकनेता न्यूज ला जॉईन व्हा व शेअर करायला विसरू नका👉 https://lokneta.in/

0/Post a Comment/Comments